सावधान ! ‘इन्स्टंट लोन’च्या नावाखाली होतोय गेम; पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन


सावधान ! ‘इन्स्टंट लोन’च्या नावाखाली होतोय गेम; पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

चंद्रशेखर पात्रे :

पिंपरी: सोशल मीडियाच्या माध्यमातून तात्काळ आणि विनासायास कर्ज (Instant Loan) देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना आर्थिक गंडा घालणाऱ्या आणि त्यांची बदनामी करणाऱ्या टोळ्या सध्या सक्रिय झाल्या आहेत. पैशांच्या गरजेपोटी अनेक नागरिक या सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, “नागरिकांनी कोणत्याही बनावट लोन अ‍ॅप्सना बळी पडू नये आणि संशयास्पद एपीके (APK) फाईल्स डाऊनलोड करू नयेत,” असे जाहीर आवाहन पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

सायबर चोरट्यांची मोडस ऑपेरंडी (गुन्ह्याची पद्धत)

सायबर पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, हे भामटे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने नागरिकांची फसवणूक करतात. सोशल मीडियावरून तात्काळ कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांना एक लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये एक बनावट लोन अ‍ॅप  डाउनलोड होते.

हे अ‍ॅप इन्स्टॉल करताना नागरिकांचे कॉन्टॅक्ट्स, गॅलरी (फोटो/व्हिडिओ), लोकेशन आणि इतर वैयक्तिक माहितीची परवानगी घेतली जाते. सुरुवातीला अगदी अल्प रकमेचे कर्ज देऊन, त्यानंतर अव्वाच्या सव्वा व्याजाची मागणी केली जाते. पैसे देण्यास नकार दिल्यास, मोबाईलमधून चोरलेल्या फोटोंचा गैरवापर केला जातो. अनेक प्रकरणांमध्ये फोटो मॉर्फ करून (अश्लील बनवून) ते नातेवाईक आणि मित्रपरिवाराला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले जातात. या सामाजिक बदनामीच्या आणि शरमेच्या भीतीने नागरिक सायबर चोरट्यांना मोठा परतावा देत आहेत.

सायबर पोलिसांचा मोलाचा सल्ला

सर्वसामान्य नागरिकांनी सायबर गुन्हेगारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी:

कोणत्याही लोन अ‍ॅपची विश्वासार्हता आणि ते आरबीआय (RBI) नोंदणीकृत आहे का, हे आधी तपासावे.

अनोळखी व्यक्तींनी किंवा सोशल मीडियावरून पाठवलेल्या संशयास्पद लिंक्स किंवा APK फाईल्स कधीही डाऊनलोड करू नका.

अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी प्ले स्टोअरवरील त्याचे रिव्ह्यू आणि रेटिंग आवर्जून पाहावे.

मोबाईलमधील गॅलरी, कॅमेरा आणि कॉन्टॅक्ट्सच्या अनावश्यक परवानग्या  देणे टाळावे.

बदनामीच्या भीतीने किंवा दडपणाखाली न येता अशा प्रकारची फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.

फसवणूक झाल्यास येथे संपर्क साधा:

जर आपली किंवा आपल्या ओळखीच्या कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास, घाबरून न जाता तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन सायबर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!