कोंढव्याच्या ‘हिरव्या’ पडद्याआडचा काळा विकास..!
जनतेचा कडकडाट : मतदारांनो, ‘काम बोलत नाही, तर कचरा ओरडतोय.!’

पुणे : “पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ…” हे गाणं चित्रपटगृहात ठीक आहे, पण कोंढव्याच्या रस्त्यावर जेव्हा नगरसेवक हे गाणं गाऊ लागतात, तेव्हा समजायचं की दालमध्ये काहीतरी काळं नाही, तर संपूर्ण डाळच करपलेली आहे..! प्रभाग क्रमांक १९ (कोंढवा खुर्द-कौसर बाग) मधील सत्ताधाऱ्यांनी विकासाचा असा काही ‘पडदा’ लावला आहे की, साक्षात अल्लादीनचा दिवा जरी आणला तरी यांना झालेला कचरा दिसणार नाही.
कचऱ्याचे ढीग की विकासाची स्मारके?
आमच्या प्रतिनिधीने जेव्हा या प्रभागाचा फेरफटका मारला, तेव्हा दिसले की सत्ताधाऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा चक्क हिरवे पडदे लावले आहेत. कशासाठी? तर म्हणे ‘स्वच्छ कोंढवा, सुंदर कोंढवा’. अरे, लाज वाटू द्या! या पडद्यांमागे विकासाची गंगा वाहत नाहीये, तर कचऱ्याचे हिमालय उभे आहेत. जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी पडदे लावता, पण त्या पडद्यामागून येणारी दुर्गंधी आणि उघड दिसणारे कचऱ्याचे ढीग तुमच्या नाकर्तेपणाची साक्ष देत आहेत. ‘काम बोलता है’ अशा जाहिराती लावणाऱ्यांना आमचा सवाल आहे—तुमचं काम बोलत नाहीये, तर तो कचरा तुमच्या भ्रष्ट नियोजनावर ओरडून ओरडून टीका करतोय!
प्रशासनाचा ‘फाट्यावर’ मारलेला रुबाब! पी.एम.सी.च्या सफाई विभागाचा तर असा काही वचक बसलाय की, कचऱ्याचा ट्रक येतो आणि ढिगाला स्पर्शही न करता निघून जातो. याचा अर्थ स्पष्ट आहे—प्रशासनाने लोकप्रतिनिधींना ‘फाट्यावर’ मारलंय आणि लोकप्रतिनिधींनी जनतेला वाऱ्यावर सोडलंय. नाले तुंबलेले, रस्ते खड्ड्यांनी भरलेले आणि यावर उतारा म्हणून हे महाशय ‘हिरवे पडदे’ लावून स्वतःच्याच जाहिरातींचे फलक उभे करतात? यालाच का तुम्ही विकास म्हणता?
‘ना घर का, ना घाट का’—राजकीय कोलांटी उड्या.!
राजकीय परिस्थिती तर अजूनच हास्यास्पद आहे. राष्ट्रवादीच्या ज्या चार शिलेदारांनी ‘तुतारी’ सोडली आणि तिकडे उडी मारली, त्यांची अवस्था आता ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. प्रचाराच्या फलकांवरून अजितदादांचे फोटो गायब करून सुप्रियाताईंचे फोटो लावताना यांना साधी भीतीही वाटली नाही? जे स्वतःच्या नेत्याशी आणि पक्षाशी एकनिष्ठ राहू शकले नाहीत, ते जनतेशी काय प्रामाणिक राहणार? उद्या हे सत्तेसाठी कोणाच्याही मांडीवर जाऊन बसतील, अशी शंका आता कोंढव्याची जनताच व्यक्त करत आहे.
मुस्लिम समाजात संतापाची लाट! नंदा लोणकर यांनी एन.आय.बी.एम. आणि क्लाऊड नाईन परिसरातील दर्गा प्रकरणात जो काही पुढाकार घेतला, त्यामुळे मुस्लिम समाजात तीव्र नाराजी आहे. श्रद्धेच्या जागी राजकारण करणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नाही. काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद हेच सांगतोय की, कोंढव्याला आता ‘फसव्या’ पडद्यांची नाही, तर ‘खऱ्या’ हाताची गरज आहे.
जनतेचा इशारा: नगरसेवक महोदय, लक्षात ठेवा—पडद्याआड कचरा लपवता येईल, पण मतदारांचा राग लपवता येणार नाही. येत्या १५ तारखेला हाच जनता जनार्दन आपल्या मतपेटीतून असा काही ‘प्रहार’ करेल की तुमचे हे हिरवे पडदे कायमचे फाटून निघतील.
कोंढव्याच्या जनतेने ठरवलंय: “शब्दांवर जाऊ नका, चित्र डोळ्यांनी पहा!”




























