आचारसंहिता लागू ! कोल्हापुरात रात्रीतच इच्छुकांचे फलक हटवले

कोल्हापूर : निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर कोल्हापूर महापालिका प्रशासनाने शहरात तातडीने अंमलबजावणी करत सायंकाळपासून इच्छुकांनी लावलेले फलक काढण्यास सुरुवात केली. या धडक कारवाईमुळे अवघ्या एका रात्रीतच शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते आणि चौक मोकळे झाले आहेत.
महापालिका प्रशासनाने आचारसंहिता लागू होताच शहरातील विविध भागांत लावण्यात आलेल्या फलकांवर कारवाईचा बडगा उगारला. मध्यवस्तीतील भागातील बहुतांश फलक सायंकाळपर्यंतच काढून टाकण्यात आलेले दिसले. विशेष म्हणजे, प्रशासनाची कारवाई सुरू होण्यापूर्वीच काही इच्छुकांनी स्वतःहून विविध ठिकाणचे फलक काढून घेतले. मात्र, उपनगरांमधील फलक काढण्याच्या कामाला काहीसा उशीर झाला असून, उद्या पर्यंत सर्व ठिकाणचे फलक काढले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कर्मचारी नियुक्तीलाही वेग
एकीकडे फलक हटवण्याची कारवाई सुरू असतानाच, दुसरीकडे महापालिकेने निवडणूक कामासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेलाही वेग दिला आहे. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. उद्यापासून (ता. १६) संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेमणुकीचे आदेश दिले जातील, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून मिळाली आहे.


























