दिल्लीचे तख्त’ की ‘वॉशिंग्टनची चूल’? भारत म्हणजे अमेरिकेची ५१ वी जहागीर आहे काय?


रशियन तेलाच्या ‘परवानगी’वरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी-जयशंकरांच्या ‘छाताडावर’ प्रहार.!

 भारत हा एक सार्वभौम देश आहे की अमेरिकेच्या अंगणात राबणारा एखादा गडी आहे?” असा संतप्त सवाल विचारण्याची वेळ आज या देशावर आली आहे. निमित्त ठरले आहे ते रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेने भारताला दिलेल्या तथाकथित ‘३० दिवसांच्या मुभा’ प्रकरणाचे! या प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची पुरती ‘धुलाई’ केली असून, “भारत हे अमेरिकेचे ५१ वे राज्य झाले आहे का?” असा बोचरा सवाल विचारून दिल्लीच्या तख्ताला पार हलवून सोडले आहे.

स्वदेशीचा आव आणि परकीयांची पायघडी!

एकीकडे ‘विश्वगुरू’ होण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे आपण कोणाकडून तेल घ्यावे आणि कोणाकडून घेऊ नये, यासाठी व्हाईट हाऊसच्या तोंडाकडे पाहायचे, ही कोणती मर्दानगी? प्रकाश आंबेडकर यांनी थेट ‘ट्विट’चे शस्त्र उपसून सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणतात, “परवानगी देणारा अमेरिका कोण? आपल्या व्यापार धोरणांची चावी आपण अमेरिकेच्या हाती देऊन बसलो आहोत का?”

जयशंकर साहेब जगभर फिरून ‘आमचे धोरण स्वतंत्र आहे’ असे छातीठोकपणे सांगतात, पण प्रत्यक्षात मात्र अमेरिकेने ‘हो’ म्हटल्याशिवाय आपल्याकडील चुली पेटणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आंबेडकरांच्या या प्रश्नाने भाजपच्या ‘राष्ट्रवादाचा’ फुगा पार फुटून गेला आहे.

संघाचा वारसा आणि भाजपची शरणागती!

आंबेडकरांनी केवळ आजच्या धोरणांवरच ताशेरे ओढले नाहीत, तर भाजपच्या ‘डीएनए’वरच घाव घातला आहे. “स्वातंत्र्यापूर्वी ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ब्रिटिशांच्या टाचेखाली राहणे पसंत केले, तीच परंपरा आजचे भाजप सरकार अमेरिकेच्या चरणी लीन होऊन पुढे चालवत आहे,” असा जळजळीत आरोप त्यांनी केला आहे. साहेबांच्या या वाक्याने नागपूरपासून दिल्लीपर्यंत अनेकांच्या पोटात गोळा आला नसेल तर नवलच!

देश विकायला काढलाय की काय?

रशिया-युक्रेन युद्धाच्या धुराळ्यात भारताने स्वतःचे हित जपण्याऐवजी अमेरिकेच्या तालावर नाचणे सुरू केले आहे. तेल खरेदीसारख्या मूलभूत आर्थिक व्यवहारांवर जर परकीय सत्ता नियंत्रण ठेवणार असेल, तर मग १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळवलेली ती ‘स्वातंत्र्याची सनद’ गहाण ठेवली आहे का? असा रोखठोक प्रश्न आता विचारला जात आहे.

“अहो मोदीजी, जयशंकरजी… छाती ५६ इंचाची असो वा ५ इंचची, ती स्वाभिमानाने फुगली पाहिजे, अमेरिकेच्या भीतीने दडपली जाता कामा नये! भारताच्या परराष्ट्र धोरणाचा हा ‘बोरू’ अमेरिकेच्या शाईने चालणार असेल, तर या देशाच्या सार्वभौमत्वाची इतिश्री व्हायला वेळ लागणार नाही!”

वंचित बहुजन आघाडीने आता या विषयावर सरकारला उघडे पाडण्याचे ठरवले असून, दिल्लीतील हे ‘गुलामीचे’ राजकारण देशाला कुठे नेऊन ठेवणार, हाच आजचा सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे!

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!