डॉक्टर, हिरव्या भाज्या खा म्हणता ; पण खिशातला हिरवा ‘गांधी’ कोठून आणायचा.?


डॉक्टर, हिरव्या भाज्या खा म्हणता ; पण खिशातला हिरवा ‘गांधी’ कोठून आणायचा?

मेहबूब सर्जेखान ज्येष्ट पत्रकार 
 साष्टांग नमस्कार, !

आजचा जमाना असा आला आहे की, माणसाने जगण्यासाठी खावे की खाण्यासाठी जगावे, हेच समजेनासे झाले आहे. त्यात आमचे डॉक्टर मंडळी! तब्येत जरा खाली-वर झाली की ही पांढऱ्या कोटातली फौज स्टेथोस्कोपची नळी कानाला लावून यमराजाच्या दूतासारखी उभी राहते.

दोन मिनिटांत दोनशेचा ‘चुना’!
आमच्या पोटात दुखो वा डोक्यात, डॉक्टरकडे पाऊल ठेवलं की पहिल्यांदा तो आपला ‘रक्तदाब’ तपासतो. हाताला तो पट्टा बांधून रबराचा फुगा असा काही जोरात दाबतात की, सामान्य माणसाचा बीपी नसला तरी तो डॉक्टरांच्या फीचा विचार करूनच वाढतो! आणि हे मशीन फिरवून आकडा पाहिल्याचे शंभर रुपये मात्र तिथेच ‘फिक्स’ होतात. त्यानंतर एखाद्या पुजाऱ्याने तीर्थाचा चमचा हातावर ठेवावा, तशा दोन-चार रंगीबेरंगी गोळ्या हातावर टेकवल्या की आणखी शंभर रुपये स्वाहा! म्हणजे रोगाचं निदान होण्यापूर्वीच खिशाला दोनशे रुपयांचा असा ‘इन्स्टंट’ चुना लागतो की, माणसाला आपला आजार विसरून खिशाच्या जखमेचीच वेदना जास्त होऊ लागते!
दुधाची तहान ताकावर… पण ताक तरी कोठे परवडतंय.?

आता या डॉक्टरांची फर्माईश बघा! साहेब म्हणतात, “अहो, रोज एक ग्लास दूध प्या, दुपारी जेवताना ताक प्या!” साहेब, तुमचं कॅल्शिअम वाढवताना आमचा ‘कॅश’ मात्र शून्यावर येतोय! दुधाचा दर लिटरला ७२ रुपयांवर जाऊन पोहोचलाय. म्हणजे रोजचा एक ग्लास दूध म्हणजे महिन्याचं बजेट कोलमडलं! ताकाची गोष्ट तर त्याहून भारी, ताक प्यायला गेलं तरी वेगळे पैसे मोजावे लागतात. आधीच महागाईचा दुष्काळ आणि त्यात दुधाचा हा तेरावा महिना! अशाने माणसाच्या हाडात ताकद येण्याऐवजी, खिशात फक्त खडखडाटच उरणार!

कुठे गेली ती पूर्वीची चव?
डॉक्टर साहेब, तुम्ही सांगता म्हणून आम्ही भाजी खायला तयार आहोत, पण त्या भाजीत पूर्वीचा ‘दम’ राहिलाय का? पूर्वीच्या भाज्या म्हणजे साक्षात अमृताचा घास असायचा! रानातून तोडून आणलेली ती मेथी, तो गावठी कोबी… चवीला असा की नुसत्या वासाने भूक लागावी! कोणतंही रसायन नाही, कोणतंही इंजेक्शन नाही. पण आज? आजचा भाजीपाला म्हणजे ‘आरोग्याचा विनाश’ करणारी फॅक्टरी झाली आहे!

आजच्या भाज्यांमध्ये चव नाही, फक्त विष आहे. चकाकी वाढवण्यासाठी रसायनांच्या बादल्यांमध्ये भाज्या न्हाऊ घातल्या जातात. तो हिरवा रंग पाहून वाटतं भाजी खातोय की पेंट? या रासायनिक प्रक्रियांमुळेच आज घराघरांत कॅन्सर, शुगर आणि ब्लड प्रेशरचे रुग्ण वाढू लागले आहेत. पूर्वीची भाजी ‘पोषक’ होती, आजची भाजी केवळ ‘विनाशक’ आहे!

खिशातला हिरवा ‘गांधी’ आणि महागडा शाकाहार

दोनशे रुपये घेऊन माणूस मंडईत शिरला की त्याला वाटतं आपण खूप मोठी श्रीमंती करतोय, पण बाहेर येताना हातात जेमतेम चार भाज्या येतात. खिशातला हिरवा ‘गांधी’ हिरव्या भाज्यांच्या ढिगाऱ्यात कधी गहाळ होतो, हे कळत नाही! दुसरीकडे २२० रुपयांना एक किलो चिकन येतं, ते रस्सा करून खाल्लं की घरातली पाच माणसं दोन दिवस तृप्त होतात. पाहुणा घरी आला की ‘पनीर’ करणे म्हणजे घराची लक्ष्मी गहाण ठेवण्यासारखं झालं आहे, त्यापेक्षा एखादी ‘कोंबडी’ आणली की पाहुणाही खुश आणि यजमानाचं बजेटही कोलमडत नाही!

थोडक्यात काय…

डॉक्टर साहेब, तुमचे सल्ले पुस्तकात आणि एसी केबिनमध्ये चांगले वाटतात, पण प्रत्यक्षात बाजारात गेल्यावर सामान्य माणसाची दातखीळ बसते. शाकाहार हृदयाला चांगला असेलही, पण तो खिशाला मात्र ‘हार्ट अटॅक’ आणणारा ठरत आहे. जोवर सामान्य माणसाच्या खिशातला ‘गांधी’ आणि बाजारातली ‘मेथीची जुडी’ यांचं नातं सुधारत नाही, तोवर तुमचे हे डाएट प्लॅन्स म्हणजे सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहेत!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!