तारदाळकरांच्या वनवासाचा अंत; आवाडे यांच्या हस्ते रस्ता कामाचा श्रीगणेशा!


तारदाळकरांच्या वनवासाचा अंत ; आवाडे यांच्या हस्ते रस्ता कामाचा श्रीगणेशा..!

धुळधाणीतून सुटका : जलजीवनने पोखरलेले रस्ते आता कात टाकणार!

तारदाळ: प्रतिनिधी

‘जगावे तर वाघासारखे आणि लढावे तर अन्यायाविरुद्ध’ ही  शिकवण डोळ्यासमोर ठेवली, तर तारदाळच्या जनतेने आजवर जो नरक सोसला त्याला अंत नव्हता! जावाईवाडी हनुमान मंदिर ते खोबरे मळ्यापर्यंतचा रस्ता म्हणजे रस्ता उरला नव्हता, तो तर साक्षात यमलोकाची वाट बनला होता. जलजीवन योजनेच्या नावाखाली रस्ता काय उकरला आणि जनतेच्या नशिबात धुळीचे लोट काय आले! पण, ‘देर आहे, अंधेर नाही’ असं म्हणतात, अगदी तसंच घडलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर वयोवृद्ध नागरिकांचे कंबरडे मोडत होते, चिमुरड्या विद्यार्थ्यांची दप्तरे धुळीने माखत होती आणि वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. नागरिकांच्या या आक्रोशला अखेर आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी साद घातली आणि डीओआर बजेटमधून या रस्त्यासाठी निधीचा मार्ग मोकळा केला.

आवाडे पिता-पुत्रांचा धडाका!
आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका दिमाखदार सोहळ्यात माजी मंत्री प्रकाशतात्या आवाडे यांच्या शुभहस्ते या रस्ता कामाचा नारळ फुटला. जणू काही तारदाळच्या विकासाचा नवा अध्यायच यावेळी लिहिला गेला. “जनतेची सेवा हाच आमचा धर्म” हा बाणा मिरवणाऱ्या आवाडे पिता-पुत्रांनी पुन्हा एकदा शब्द पाळला, अशीच भावना यावेळी उपस्थितांमध्ये पाहायला मिळाली.

दिग्गजांची मांदियाळी

या मंगलप्रसंगी तारदाळच्या राजकारणातील आणि समाजकारणातील अनेक मातब्बर मंडळी उपस्थित होती. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, पंचायत समिती सदस्या सौ. प्रियांका खोबरे, माजी सरपंच यशवंत वाणी, सौ. अंजना शिंदे यांच्यासह सचिन पवार, प्रवीण पाटील, रणजीत पवार आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांनी या विकासाच्या गंगेचे स्वागत केले.

रस्त्याचे काम सुरू झाल्याने आता खड्डे आणि धुळीच्या साम्राज्यातून नागरिकांची मुक्तता होणार आहे. ज्या रस्त्याने आतापर्यंत फक्त ‘त्रास’ दिला, तोच रस्ता आता विकासाची ‘वेगवान’ वाट ठरणार, यात शंका नाही!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!