अग्रलेख : ‘आझम’चा निर्धार, नशामुक्त पुण्याचा हुंकार; अमितेश कुमारांचा सर्जिकल स्ट्राईक !
पुणे। विद्येचं माहेरघर म्हणून गाजलेल्या पुण्याला अलीकडे कोणाची दृष्ट लागली? मुठा-मुळे च्या संथ प्रवाहाकाठी वसलेलं हे पुण्यपट्टण अलीकडे ड्रग्जच्या विळख्यामुळे चर्चेत यावं, हे पाहून अंगाचा तिळपापड झाल्याशिवाय राहत नाही. पण, मंगळवारी आझम कॅम्पसमध्ये जे दृश्य दिसलं, ते पाहून काळजात एक नवी उमेद जागी झाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जेव्हा पुण्याच्या तरुणाईला नशामुक्तीची शपथ दिली, तेव्हा तो केवळ सोहळा नव्हता, तर तो अंमली पदार्थांच्या जाळ्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुकारलेला ‘एल्गार’ होता!
अमितेश कुमार हे साधे पोलीस अधिकारी नाहीत, तर ते अन्यायाविरुद्ध धडधडणारं ‘इंजिन’ आहेत. त्यांनी थेट विद्यार्थ्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं की, “आता नुसती खाकी वर्दी पुरणार नाही, तर प्रत्येक तरुणाला वर्दीशिवायचा पोलीस व्हावं लागेल.” किती हा करारी बाणा! पुण्याच्या रस्त्यावर जेव्हा गुन्हेगारांचे जाळे पसरू लागते, तेव्हा त्यांच्या मुसक्या आवळायला आता कायद्याच्या जोडीला या तरुणाईची ताकद उभी राहिली आहे. ज्यांच्या हातात उद्याचं भविष्य आहे, त्यांच्या हातात जेव्हा अमितेश कुमार ‘माहितीचे अस्त्र’ देतात, तेव्हा तो खऱ्या अर्थाने नशखोरांवर केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ ठरतो!
या रणसंग्रामात डॉ. आबेदा इनामदार यांची साथ मोलाची आहे. आझम कॅम्पसने आजवर हजारो विद्वान घडवले, पण आता हा कॅम्पस ‘व्यसनमुक्त समाजाचे पहारेकरी’ घडवणार आहे. महाराष्ट्र कॉस्मोपॉलेटन एज्युकेशन सोसायटीने या मोहिमेसाठी जे पाऊल उचललं आहे, ते पाहून इतर संस्थांनीही आता बोध घ्यायला हवा. आबेदा ताईंनी शब्दाचा शब्द दिलाय, की “पुण्याच्या रक्षणासाठी आमचा विद्यार्थी सदैव तत्पर असेल.” हे शब्द म्हणजे केवळ आश्वासन नाहीत, तर तो पुण्याच्या संस्कृतीचा हुंकार आहे.
रंजन कुमार शर्मा, मनोज पाटील, आर. राजा आणि राजलक्ष्मी शिवनकर यांसारखे खमके अधिकारी जेव्हा रणांगणात उतरतात, तेव्हा अमली पदार्थांच्या तस्करांची दाणादाण उडणार हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. लष्कर विभागाचे संतोष खेतमाळस असोत किंवा अवामी महाजच्या संगिता शिंदे अल्फान्सो; या सर्वांनी पुण्याच्या मातीशी इमान राखून हा लढा सुरू केला आहे.
आम्ही ठणकावून सांगतो, पुणं म्हणजे काही अमली पदार्थांचे अड्डे नाहीत. हे टिळकांचे पुणे आहे! इथे जो नशा असेल तो ज्ञानाचा असेल, कर्तृत्वाचा असेल! अमितेश कुमारांनी या पवित्र मातीत नशामुक्तीचे जे बीज पेरले आहे, त्याचा आता वटवृक्ष व्हायला हवा. ज्या दिवशी पुण्याचा प्रत्येक तरुण ड्रग्जच्या विरोधात उभा ठाकेल, त्या दिवशी या नशखोरांना पळता भुई थोडी होईल.
सावधान! अमली पदार्थांच्या दलदलीत पुण्याच्या भविष्याचा गळा घोटू पाहणाऱ्यांनो, आता तुमची खैर नाही. कारण आता पुण्याची तरुणाई नुसती शिकणार नाही, तर ती अमितेश कुमारांच्या सोबतीने गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी मैदानात उतरली आहे!





























