मराठवाड्याच्या समृद्धीची ‘लाईफलाईन’ अडकली दिल्लीच्या गल्ल्यात ; नेत्यांनो, आता तरी जागे व्हा !
मुखेड : प्रतिनिधी :
सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यांवर सत्तेची धुंदी चढली की त्यांना जनतेचे आक्रोश ऐकू येत नाहीत, याचा प्रत्यय सध्या मराठवाड्यात येत आहे. उदगीर-मुक्रमाबाद-देगलूर-बोधन हा रेल्वेमार्ग म्हणजे या भागाच्या विकासाची धगधगती ऊर्मी आहे, पण दुर्दैव असं की, हा जिव्हाळ्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे लालफितीच्या कारभारात आणि दिल्लीच्या वातानुकूलित दालनांत धूळ खात पडला आहे. ही प्रशासकीय सुस्ती मराठवाड्याच्या भविष्याचा गळा घोटणारी असून आता ही सहनशक्ती संपली आहे. एकेकाळी भास्करराव पाटील खतगावकरांसारख्या धुरंधर नेत्यांनी या मार्गासाठी रक्ताचं पाणी केलं, प्रसंगी दिल्लीपर्यंत संघर्ष केला. शेजारील राज्यांनीही या प्रकल्पाला सकारात्मकता दाखवली असतानाही महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ वाटाण्याच्या अक्षताच येत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, आजच्या नेत्यांकडे हा प्रश्न तडीला नेण्यासाठी लागणारी प्रबळ राजकीय जिद्द उरलेली नाही. निवडणुका आल्या की रेल्वेच्या स्वप्नांची गाजरे दाखवायची आणि नंतर जनतेला वाऱ्यावर सोडायचे, हा जुना खेळ आता या मातीतील जनता चालू देणार नाही.
गोणेगावच्या ‘लेंडी’ धरणाचे काम आता पूर्णत्वाकडे जात असून या पाण्यावर इथल्या शेतकऱ्यांच्या बागा फुलणार आहेत, स्वप्नं बहरणार आहेत. पण हा पिकलेला माल मुंबई, हैदराबाद किंवा बंगळुरूच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचणार कसा? जर स्वस्त आणि जलद रेल्वे वाहतूक उपलब्ध नसेल, तर लेंडी धरणाचे पाणी असूनही शेतकऱ्याच्या पदरात केवळ आर्थिक विवंचनाच पडेल. रेल्वे धावेल तरच इथल्या एमआयडीसीमध्ये उद्योगांचे चाक फिरेल, बेकारीचा भस्मासुर गाडला जाईल आणि तरुणांच्या हाताला सन्मानाचे काम मिळेल. रेल्वे संघर्ष समितीने आता मैदानात उतरण्याचा निर्धार केला असून हा लढा आता निकराचा होणार आहे. हा प्रश्न केवळ दोन शहरांना जोडण्याचा नसून मराठवाड्याचा वर्षानुवर्षांचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्याचा आहे. नेत्यांनो, दिल्लीच्या दरबारी मुजरे करण्यात आणि खुर्च्या उबवण्यात किती काळ घालवणार? मराठवाड्याच्या हक्काच्या रेल्वेसाठी तुमचा आवाज कधी फुटणार? तुमची ही अनास्था इथली जनता कधीही विसरणार नाही. आता कागदी घोडे नाचवणं थांबवा आणि प्रत्यक्ष रुळांवर काम सुरू करून दाखवा, अन्यथा हीच जनता तुम्हाला सत्तेच्या रुळावरून कायमचे खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा सडेतोड इशारा आहे!



























