पाचशे फुटांच्या घरांना ‘चूना’ आणि थकबाकीदारांना ‘फुले’; हा कसला पुण्याचा विकास?


पाचशे फुटांच्या घरांना ‘चूना’ आणि थकबाकीदारांना ‘फुले’; हा कसला पुण्याचा विकास?

पुणे:  पुणे महानगरपालिकेच्या कारभाराचा पंचनामा करायचा झाला, तर तो ‘अंधेर नगरी आणि चौपट राजा’ असाच करावा लागेल. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी २०२६-२७ साठी जो अर्थसंकल्पीय ‘चापटपोळी’ वाढली आहे, त्यात पुणेकरांच्या खिशावर १० अधिक ५ टक्के करवाढीची उघड दरोडेखोरी प्रस्तावित केली आहे. ही करवाढ म्हणजे सामान्य पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे!

निवडणुकीपुरते ‘राम’ आणि नंतर ‘काम’ तमाम !

निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने ‘संकल्प पुण्याच्या विकासाचा’ असे छातीठोकपणे सांगत जाहीरनाम्यात गाजावाजा केला होता. “५०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना पूर्ण करमाफी देऊ,” असे आश्वासन देऊन पुणेकरांची मते पदरात पाडून घेतली. आता सत्ता उपभोगताना मात्र तो ‘शब्द’ म्हणजे केवळ सत्तेसाठी केलेली ‘जुमलेबाजी’ ठरली आहे. सामान्य माणसाला आश्वासनांचा ‘चूना’ लावायचा आणि स्वतःच्या शब्दाला हरताळ फासायचा, हाच का तुमचा विकास? असा संतप्त सवाल ‘आम आदमी पार्टी’ने पुणेकरांच्या वतीने विचारला आहे.

थकबाकीदारांचे ‘लाड’ आणि प्रामाणिकांचा ‘बळी’!
महापालिकेच्या तिजोरीचा हिशोब म्हणजे एक मोठा ‘झोल’ आहे. ७,७०० कोटी रुपयांची थकबाकी अजूनही वसूल झालेली नाही. हे थकबाकीदार नेमके कोण? ज्यांच्यावर कर लागू झाले नाहीत अशा व्यावसायिक मिळकतींचे धनी कोण? या बड्या धेंडांना ‘फुले’ वाहून त्यांचे लाड पुरवले जात आहेत, आणि जो प्रामाणिक करदाता आहे, त्याच्यावर करवाढीचे ‘ओझे’ टाकले जात आहे. २,८०० कोटींचे उद्दिष्ट असताना केवळ २,२०० कोटी जमा झाले, ही प्रशासनाची नालायकी नाही का? मग त्याची शिक्षा सामान्य पुणेकरांनी का भोगायची?

आप’ची गर्जना: “जुमलेबाजी थांबवा, शब्द पाळा!” गेल्या आठवड्यात महापालिकेच्या दारात ‘आम आदमी पार्टी’ने जे रणकंदन केले, ते पुणेकरांच्या मनातील संतापाचे प्रतीक आहे. मुकुंद किर्दत यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे की, “केवळ खुर्ची उबवण्यासाठी पुणेकरांना फसवे शब्द देऊ नका. ५०० स्क्वेअर फुटांच्या घरांना तातडीने करमाफी द्या आणि छोट्या मिळकतधारकांना दिलासा द्या!”

आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हे ‘लोकप्रतिनिधी’ जनतेच्या बाजूने उभे राहतात की पुन्हा एकदा प्रशासनाच्या सुरात सूर मिसळून पुणेकरांची मान कापतात, हे पाहायचे!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!