महाराष्ट्र हादरला ! बारामतीजवळ विमान कोसळून अजित पवारांचे निधन ; पाच जणांचा जागीच मृत्यू

बारामती | महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय..?
अजित पवार आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी बारामती दौऱ्यावर होते. मिळालेले माहितीनुसार, खासगी VSR कंपनीच्या विमानाने सकाळी ८:१० वाजता मुंबईहून उड्डाण केले होते. साधारण ४० मिनिटांच्या प्रवासानंतर विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ पोहोचले. लँडिंगची प्रक्रिया सुरू असतानाच शेवटच्या क्षणी विमानाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीपासून काही अंतरावर जाऊन कोसळले.

विमान अपघातातील मृतांची यादी:
या भीषण अपघातात विमानातील पाचही व्यक्तींचा मृत्यू झाला आहे:
माननीय अजित पवार
विदीप जाधव (मुंबई पीएसओ – हेड कॉन्स्टेबल)
कॅप्टन सुमित कपूर (पायलट)
कॅप्टन संभवी पाठक (पायलट)
पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट)
“अपघाताची सीबीआय चौकशी करा” – वकील नितीन सातपुते यांचा संशय
वकील नितीन सातपुते यांनी या अपघाताबाबत गंभीर संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “अजित पवार यांचा विमान अपघात संशयास्पद वाटत आहे. या अपघाताची हायकोर्टाचे न्यायाधीश आणि मानवी हक्क आयोगाकडून चौकशी होण्याची गरज आहे. या विमानात खरंच काही तांत्रिक समस्या होती की जाणीपूर्वक ते नादुरुस्त ठेवण्यात आले किंवा यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का? या सगळ्याबाबतही सीबीआयकडून चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
अपघाताचे कारण काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंगच्या स्थितीत असताना वैमानिकाने सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, त्याच निर्णायक क्षणी विमानात तांत्रिक बिघाड उद्भवला. लँडिंगदरम्यान विमानावरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तांत्रिक त्रुटीमुळे विमानाने दिशा बदलली असावी किंवा इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ब्लॅक बॉक्सवर तपास यंत्रणांची नजर
तपास यंत्रणांच्या मते, ‘ब्लॅक बॉक्स’ (Black Box) हाती आल्यानंतरच या दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल. विमानाच्या उड्डाणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतचा सर्व डेटा आणि वैमानिकांचे संभाषण यात रेकॉर्ड केलेले असते, त्यामुळे हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई ते बारामती हा प्रवास अजित पवारांच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरला. ही बातमी समोर येताच राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहेत.




























