पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा सोमवारी हातकणंगलेत ‘एल्गार’; तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण


राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या ११.८०% निधीची मागणी; अनुसूचित जातींच्या हक्कासाठी लढा तीव्र

हातकणंगले (प्रतिनिधी):

अनुसूचित जाती उपयोजनेचा (SCSP) निधी राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या ११.८०% इतका बंधनकारक करावा, निधीचा गैरवापर थांबवावा आणि लाभार्थी निवडीसाठी सामाजिक-आर्थिक जनगणनेचा आधार घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना, जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीने सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी हातकणंगले तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

या संदर्भात संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाच्या धोरणात्मक त्रुटींमुळे अनुसूचित जाती घटक विकासापासून वंचित राहत असल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या:

१. अर्थसंकल्पीय तरतूद: SCSP निधीची तरतूद केवळ वार्षिक योजनेवर न ठेवता ती राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या (Total Budget) ११.८०% इतकी बंधनकारक करण्यात यावी.

२. निधीचा पळवाट रोखा: ‘लाडकी बहीण’ योजना किंवा रस्ते-वीज यांसारख्या सर्वसाधारण योजनांचा खर्च SCSP निधीतून दाखवण्याची ‘लेखाविषयक पळवाट’ तातडीने बंद करावी. हा निधी केवळ विशेष कल्याणकारी योजनांसाठीच खर्च व्हावा.

३. लाभार्थी निकषात बदल: वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी २००२ सालच्या कालबाह्य दारिद्र्य रेषेऐवजी केंद्र सरकारप्रमाणे २०११ च्या सामाजिक-आर्थिक जनगणनेचा (SECC-2011) आधार घ्यावा.

पदाधिकाऱ्यांचा इशारा:

पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे. जिल्हाध्यक्ष मा. मच्छिंद्र रुईकर यांनी इशारा दिला आहे की, “शासन केवळ कागदोपत्री निधी दाखवून अनुसूचित जातींची फसवणूक करत आहे. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आगामी काळात लढा अधिक तीव्र केला जाईल.”

नियोजन आणि सहभाग:

या आंदोलनाचे नियोजन सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष बबन तांदळे, जिल्हा उपाध्यक्ष मा. संजय कांबळे, जिल्हा सरचिटणीस मा. नितेश कुमार दीक्षांत यांच्यासह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. छायाताई सातारकर, हुपरी शहर अध्यक्षा सौ. अर्चना कांबळे, हातकणंगले तालुका उपाध्यक्षा रेखा भोरे, रुपाली पालखे, शोभा कांबळे व तालुक्यातील सर्व पदाधिकारी करत आहेत.

सोमवारी सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या लाक्षणिक उपोषणात बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!