साडेतीन हजारांत ‘स्वर्गवास’! इचलकरंजी पालिकेचा अजब पण गजब निर्णय ; दाभोळेंनी वाजवला विजयाचा नगारा !
“लेखणीची धार आणि दाभोळेंचा वार; साडेतीन हजारांच्या निधीतून गरिबांच्या घराला दिलासा !”
इचलकरंजी: प्रतिनिधी
आजकालच्या महागाईच्या दुनियेत माणसाने ‘जगावे कसे?’ हा प्रश्न तर होताच, पण ‘मरावे कसे?’ हा त्याहून मोठा यक्षप्रश्न बनला होता. लाकडांचे भाव गगनाला भिडलेले आणि गोवऱ्यांनी सोन्याचा भाव खाल्लेला! अशा परिस्थितीत गरिबाने मरण्याचे धाडस करायचे म्हटले तरी खिशात ‘बजेट’ असावे लागायचे. पण इचलकरंजीच्या महासभेने मात्र एक ऐतिहासिक ‘पुण्यकर्म’ केले आहे. आता इचलकरंजीच्या नागरिकांना परलोकाच्या प्रवासासाठी महानगरपालिकेकडून रु. ३५००/- चा ‘बुकिंग चार्ज’ मिळणार आहे!
दाभोळेंचा ‘प्रहार’ आणि प्रशासनाचा ‘उद्धार’!
भाजपाचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापालिकेच्या दारात उभे राहून जो काही ‘निवदनी प्रहार’ केला, त्यापुढे प्रशासनाला झुकणे भाग पडले. “अहो, जिवंतपणी तुम्ही लोकांचे रक्त शोषताय ते पुरे झाले, आता किमान मेल्यावर तरी त्यांना शांतपणे निरोप द्या!” अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी सामान्य जनतेची कैफियत मांडली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि ‘रट्टेबाजी’मुळे अखेर पालिकेला जाग आली आणि हा ‘मरण-निधी’ मंजूर झाला.
मरण झाले ‘स्वस्त’ आणि नागरिक झाले ‘मस्त’!
या निर्णयामुळे आता किमान अंत्यसंस्कारासाठी कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही. साडेतीन हजार रुपये म्हणजे केवळ रक्कम नसून, दुःखाच्या प्रसंगी पालिकेने दिलेला ‘खांदा’ आहे. उमाकांत दाभोळे यांच्या प्रयत्नांमुळे आज शहरातील हजारो मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. दाभोळेंनी केवळ निवेदन दिले नाही, तर प्रशासनाच्या ‘तव्यावर’ अशी काही थाप मारली की निर्णय सुसाट बाहेर आला!
पत्रकारांची ‘लेखणी’ की ‘जादूची काठी’?
या विजयाचे श्रेय दाभोळेंनी अत्यंत दिलदारपणे पत्रकार बांधवांना दिले आहे. ते म्हणाले, “जर आमच्या पत्रकार बांधवांनी या विषयाला आपल्या लेखणीने ‘वाचा’ फोडली नसती, तर प्रशासनाने या फाईलला कधीच ‘तिलांजली’ दिली असती!” माध्यमांच्या या खंबीर पाठिंब्यामुळेच आज जनतेचा आवाज महासभेत गुंजला आणि निर्णय प्रक्रियेला गती मिळाली.
थोडक्यात पण गोड… एकूणच काय, तर इचलकरंजी पालिकेने घेतलेला हा निर्णय ‘स्तुत्य’ आणि ‘संवेदनशील’ आहे. आता फक्त पालिकेच्या बाबू लोकांनी हा निधी देताना मृताच्या नातेवाईकांना चपला झिजवायला लावू नयेत, म्हणजे या योजनेच्या उद्देशाचा ‘दशक्रिया विधी’ होणार नाही!
विजयाचा नगारा वाजला आहे, आता फक्त अंमलबजावणीची प्रतीक्षा!


























