डिजीटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अडचणींना आता फुटणार वाचा ; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पुण्यात ऐतिहासिक गर्जना!


डिजीटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अडचणींना आता फुटणार वाचा; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पुण्यात ऐतिहासिक गर्जना !

पुणे : पत्रकारिता म्हणजे काय? आजच्या काळात विचाराल तर कुणी म्हणेल ‘धंदा’ आहे, कुणी म्हणेल ‘इव्हेंट’ आहे, तर कुणी म्हणेल ही केवळ सत्तेच्या दारात शेपूट हलवणारी वृत्ती आहे! पण,  पुण्याच्या ‘गोल्डन ज्युबिली’च्या सभागृहात जो माहोल होता, जे विचार मांडले गेले आणि जो निर्धार व्यक्त झाला, ते पाहून छातीठोकपणे म्हणावसं वाटतंय की—”मरण पावले असतील पांढरपेशे कागदशूर, पण पत्रकारांच्या हक्कासाठी रक्त आटवणारे ‘खऱ्या अर्थाने’ मर्दांचे नेतृत्व अजून जिवंत आहे!”

सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत पत्रकारांच्या संघटनांचे पेव फुटले आहे. पावसाळ्यात जशा भूदबड्या उगवतात, तशा रोज नवीन संघटना जन्माला येतात. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लेटरपॅड छापून झाले की यांचं काम संपलं! पत्रकारावर हल्ला झाला की निषेधाचे दोन शब्द बोलायला यातील अनेकांच्या तोंडात ‘दही’ जमते. अशा वांझोट्या संघटनांच्या गर्दीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही संघटना म्हणजे वाळवंटातल्या ओलिवासारखी किंवा रखरखत्या उन्हातल्या वडाच्या झाडासारखी वाटते!

संदीप काळेंचा ‘विठ्ठली’ तडाखा !

या बैठकीचे केंद्रस्थान होते ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष श्री. संदीप काळे साहेब. काळे साहेबांचे भाषण म्हणजे शब्दांचे नुसते कारंजे नाहीत, तर तो अन्यायाविरुद्ध पेटलेला ‘वणवा’ आहे! त्यांनी उपस्थित डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संपादकांशी संवाद साधताना थेट मर्मावर बोट ठेवले. डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकाराला आजही ‘उपरा’ समजण्याची जी मानसिकता काही सरकारी बाबू आणि प्रस्थापित व्यवस्थेत आहे, तिचा त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

संघटना कशी असावी, यावर भाष्य करताना काळे साहेबांनी एक अत्यंत मोलाचे विधान केले, ते म्हणाले, “आपल्याकडे लोकांनी यावं म्हणून आपण कुणाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही, तर आपलं काम बघून लोकांनी स्वतःहून आपल्याकडे आलं पाहिजे!” त्यांच्या या एका वाक्यातच संघटनेची ताकद आणि कामाची पावती दिसून आली.

जुने गेले, आता ‘तरुण’ रक्ताचा धग हवा !

महाराष्ट्रात संघटनांची उणीव नाही, पण ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ जे काम करतेय, त्याला तोड नाही! आजच्या तरुण, तडफदार आणि ‘स्मार्ट’ पत्रकारांनी जर आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर या संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. केवळ गळ्यात प्रेस कार्ड अडकवून मिरवणारे ‘फेसबुकिया’ पत्रकार होण्यापेक्षा, संकटाच्या वेळी ढाल बनून उभी राहणारी ही संघटना आपलीशी करणे ही काळाची गरज आहे.

आयोजनाचा ‘अजहर’ थाट !

एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन कसे असावे, याचा वस्तुपाठच ‘मेरा भारत टाईम्स’चे संपादक अजहर बाबा कादरी, शोएब अन्सारी आणि उस्मान शेख यांनी घालून दिला. पुण्याच्या या बैठकीत प्रत्येक पत्रकाराला सन्मानाने स्थान मिळाले. पत्रकारांच्या प्रश्नांवर असा वैचारिक ‘यज्ञ’ पेटवल्याबद्दल हे आयोजक खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत.

थोडक्यात सांगायचे तर…

ज्यांना केवळ ‘जी हुजुरी’ करणारी पत्रकारिता मान्य आहे, त्यांनी खुशाल घरी बसावे. पण, ज्यांना स्वाभिमानाने जगायचे आहे, ज्यांच्या लेखणीत अजूनही धार शिल्लक आहे आणि ज्यांना संकटाच्या वेळी संघटनेची तादक पाठीशी हवी आहे, त्यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा हात धरावा. कारण, ही संघटना म्हणजे पत्रकारांचा केवळ आवाज नाही, तर तो अन्यायाचा जबडा फाडणारा ‘हुंकार’ आहे!

मेहबूब सर्जेखान संपादक :

प्रेस मीडिया लाईव्ह, पुणे

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!