SOP चं घोंगडं भिजत, पुणेकरांचं मरण गल्लीबोळात नाचत ; केबल माफियांचे ‘रामराज्य’ की प्रशासनाचे ‘अंधेर नगरी’?
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कारभाराचं काय वर्णन करावं? “बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात” अशी अवस्था आज आपल्या विद्येच्या माहेरघराची झाली आहे. २१ एप्रिलला म्हणे आमच्या महापालिका आयुक्तांनी आणि त्यांच्या लवाजम्याने एक ‘बैठक’ घेतली. कसली तर म्हणे, ‘ओव्हरहेड केबल्स’ची शिस्त लावण्याची! अहो, शिस्त लावायला ती काय तुमची कचेरी आहे? ती तर पुणेकरांच्या जीवाशी चाललेली उघड उघड थट्टा आहे!
कागदी वाघ आणि उघड्या तारा !
‘आम आदमी पार्टी’ने आज प्रशासनाचा जो बुरखा फाडला आहे, तो पाहून कोणाही सुज्ञ पुणेकराचे रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही. महापालिका म्हणते, आम्ही SOP तयार करतोय. अरे, तुमची ही SOP म्हणजे काय सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे का? ती कागदावरच उबवली जाणार की कधी रस्त्यावर उतरणार? शहरातील केबल्सचे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही, अनधिकृत केबल्सचे जाळे कायम आहे— म्हणजेच प्रशासकीय फाईलींना फुटलेत पाय, पण पुण्याच्या रस्त्यावर मात्र मृत्यूची ‘हाय-हाय’ सुरू आहे!
केबल माफियांचे ‘रामराज्य’ आणि प्रशासनाचे ‘मौनव्रत’!
गल्लीगल्लीत वायर लोंबकळत आहेत, कोणाचा पाय अडकतोय, तर कोणाच्या गळ्याला फास लागतोय. उद्या एखादा निष्पाप जीव गेला की हेच अधिकारी मग ‘चौकशी समिती’चा आणखी एक कागदी घोडा नाचवणार! जर कारवाईचा पत्ता नाही, तर मग तुमच्या या बैठका म्हणजे केवळ चहा-बिस्किटांचा कार्यक्रम आहे का? असा रोखठोक सवाल आता विचारला जात आहे.
गेंड्याची कातडी कधी सोलणार ?
निरंजन अडागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या म्हणजे पुणेकरांच्या काळजाची हाक आहे. त्या बेकायदेशीर केबल्स तात्काळ कापून काढा! त्या ‘केबल माफियांना’ आणि त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा! पण छे, हे करायला जिगर लागते, केवळ जीआर (GR) काढून पोट भरत नसते.
सावधान पुणेकर.!
प्रशासनाची ही SOP म्हणजे ‘येरे माझ्या मागल्या’ प्रकारातली आहे. जोपर्यंत एखादा मोठा अनर्थ घडत नाही, तोपर्यंत ही कुंभकर्णी झोप उडणार नाही, असेच दिसते. “केबल कागदावर आणि मृत्यू रस्त्यावर” असा हा खेळ आता थांबलाच पाहिजे. पुणेकरांनो, आता डोळे उघडा, कारण तुमचं महानगरपालिका प्रशासन तर ‘SOP’च्या गुंगीच्या औषधात पार सुस्त पडलं आहे!



























