कॉक्रोच जनता पार्टीचे दहा दिवस 


कॉक्रोच जनता पार्टीचे दहा दिवस 

————————–

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

डिजिटल अवकाशामध्ये १६ मे२०२६ रोजी स्थापन झालेल्या’ सीजेपी ‘ ने अर्थात (कॉक्रोच जनता पार्टीने ) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेले दहा दिवस हा धुमाकुळ सुरू आहे.हा धुमाकुळ आभासी आहे. पण तो आपल्या दिशेने बाण सोडून हैराण करत आहे असा भास काहींना होतो आहे. अर्थात ‘ ” ये डर भी अच्छा डर है”.वास्तविक

भारतीय राजकारणात ‘बीजेपी ‘चा गेल्या दोन दशकाहून अधिक काळ बोलबाला आहे. अलीकडे पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकीनंतर बीजेपी भारताच्या सत्तर टक्के भूभागावर आपली सत्ता राखून आहे हे दिसून आले. असे असतानाही सोशल मीडियावर सर्वांत जास्त फॉलोअर्स असणाऱ्या बीजेपीची जागा सीजेपी ने घेतली आहे.तीही अवघ्या पाच दिवसात. हा वेग अचंबित करणारा आहे.

या पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके हे मूळचे महाराष्ट्रीयन पण सध्या अमेरिकेत शिकत आहेत. तीस वर्षीय हा तरुण बोस्टन विद्यापीठांमध्ये जनसंपर्क क्षेत्रातील पदवीचे शिक्षण घेत आहे. तसेच नोकरीच्याही शोधात आहे. अभिजित दीपके पूर्वी आम आदमी पार्टीशी संबंधित होता हा मुद्दा जाणीवपूर्वक पुढे आणला जात आहे. त्यामुळे एक राजकीय नॅरेटीव सेट करणारे राजकारण आकाराला येऊ पाहत आहे . पण त्याच्या पार्टीने उचललेले प्रश्न महत्त्वाचे आहेत की नाही हा मुद्दा आहे.आणि त्याचा विचार करावा लागेल.

भारताचे सरन्यायाधीश मा.सूर्यकांत यांनी १५ मे २०२६ रोजी एका वकिलाने पदोन्नतीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना बनावट पदव्या घेऊन वकिली क्षेत्रात येणाऱ्यांना आणि पदवीधारकांना उद्देशून ‘ ‘परजीवी’ आणि ‘ झुरळ ‘असा शब्दप्रयोग केला होता. तसेच त्याचा संबंध बेरोजगारीशी जोडलेला होता. ही मंडळी माध्यमे, समाजमाध्यमे व्यापतात आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात. तसेच व्यवस्थेवर हल्ले करतात असेही त्यांनी म्हटले होते.वास्तविक भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे.नोकरीच्या एका जागेसाठी हजारो, लाखो अर्ज येतात हे वास्तव आहे. अशावेळी बेरोजगारांना झुरळाची उपमा देणे ही केवळ चूक नव्हे तर पराकोटीची असंवेदनशीलताही आहे. पण त्यामुळे झुरळ माध्यमांच्या आणि विचारांच्याही केंद्रस्थानी आले.

आपल्या वक्तव्याचा प्रचंड निषेध होऊ लागल्यावर सरन्यायाधीशांनी ” काही माध्यमांमध्ये माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला.तरुणांचा मला अभिमान असून ते विकसित भारताचे आधारस्तंभ आहेत.” असे म्हटले. मात्र तोपर्यंत बराच वेळ झालेला होता. याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उज्वल भुयान यांनीही ‘ विरोध दर्शवणाऱ्या व्यक्तींच्या अधिकाराचे रक्षण झाले पाहिजे.’असे म्हटले आहे हेही महत्वाचे आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म सरन्यायाधीशांच्या वरील विधानाच्या निमित्ताने झालेला असला तरी तो सत्ताधारी, विरोधी पक्ष, रोम जळत असताना फिडेल वाजवणाऱ्या विकृती, कमालीची विषमता निर्माण होत असताना समतेसाठी प्रयत्न न करणाऱ्या , मतदार आणि नागरिक असूनसुद्धा देशाच्या मूलभूत समस्यांपासून अलिप्तता दाखवणाऱ्या, या देशातील सर्व व्यवस्थांचे लाभ घेत असूनसुद्धा या देशाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या , सत्तेचे लोणी खायला मिळावे म्हणून सत्ताधारी पक्षात गेलेले सत्ता लंपट, गलेलठ्ठ पगार आणि गलेलठ्ठ पेन्शन मिळूनसुद्धा भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांशी बांधिलकी न मानणाऱ्या अशा सर्वांच्या विरोधातील असंतोष आहे. प्रत्येक दांपत्याने चार मुले जन्माला घाला पासून हे संविधान बदलून आम्हाला मनुस्मृती आणायची आहे अशी विधाने करणाऱ्या वाचाळावर काहीच कारवाई होत नाही त्यावरचीही ही प्रतिक्रिया आहे.

हा डिजिटल उद्रेक कदाचित तात्पुरता दडपलाही जाईलही. पण तो आणि त्यामागची कारणे फार काळ दुर्लक्षित करता येणार नाहीत.कारण हा संघर्ष ” ‘आहे रे आणि नाही रे ‘ वर्गाचा आहे हे गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे. हा पक्ष नोंदणीकृत नाही त्यामुळे त्याला घटना वगैरे नाही. मात्र त्यांनी हाती घेतलेले मुद्दे आपल्या घटनेला धरून आहेत हेही नाकारता येत नाही. अच्छे दिनसह दिलेल्या शेकडो आश्वासनांच्या खैरातीचे आजचे वास्तव काय ? हा प्रश्न ही झुरळ म्हणून संबोधली गेलेली माणसे विचारत आहेत.

देशप्रथम, राष्ट्रप्रथम वगैरे भाषा करत असताना त्या राष्ट्रप्रथममध्ये या देशातील १४५ कोटी जनतेच्या उज्वल भवितव्याचा विचार केंद्रस्थानी असला पाहिजे. त्यांच्या जाती,पाती, पंथ,धर्माचा विचार नव्हे. देशाचा सर्वांगीण विकास राष्ट्रप्रथम मध्ये अभिप्रेत आहे. श्रीमंती आणि गरिबी यातील अंतरात वाढ होणारी धोरणे राष्ट्रप्रथम या व्याख्येत बसत नसतात.तसे झाले तर राष्ट्रप्रथम हा शब्दप्रयोग संस्कृतीचा मुखवटा घालून अग्निवीर योजनेप्रमाणे ‘वापरा व फेका ‘ असा विकृतीदर्शक ठरतो. तसेच राष्ट्रप्रथमचा जयघोष करणाऱ्यांची भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी, राष्ट्र स्वतंत्र करतांना भूमिका काय होती याचाही विचार करावा लागतो. इतिहास दडवला म्हणजे इतिहास पुसला जात नसतो. देशांतर्गत धोरणे, परराष्ट्र नीती ,आर्थिक धोरणे, सामाजिक, सांस्कृतिक धोरणे ही सारी राष्ट्रप्रथम या भूमिकेला न्याय देणारी असावी लागतात.

सिजेपीला मिळणारा पाठिंबा हा केवळ एक ट्रेंड आहे म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. फॅशन पासून जीवनशैलीपर्यंत अनेक क्षेत्रात ट्रेंड असतात. त्यात नवीन काही नाही.तसेच ट्रेंड सोशल मीडियावरही असतात हे खरे. मात्र सिजेपीच्या लोकप्रियतेचा ट्रेंड मनोरंजनासाठीचा नाही तर राजकीय ,सामाजिक ,आर्थिक ,सांस्कृतिक जीवनातील मूलभूत बाबींबाबत विचार करणारा, मांडणारा आहे म्हणून तो सहजपणे दुर्लक्षित करणे घातक ठरेल. बहुसंख्य जनतेची नागरिक म्हणून जीवनाच्या सर्व बाजूंनी हेळसांड होत असेल तर जनता गप्प बसू शकत नाही. हा राजेशाही काळातीलही इतिहास आहे. आत्ता तर आपण लोकशाही व्यवस्थेत कार्यरत आहोत हे लक्षात घेतले पाहिजे.

 

संसदीय लोकशाहीत कायदेमंडळ ,कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसार माध्यमे हे चार स्तंभ मानले जातात. संसद देशासाठी आणि विधानसभा राज्यासाठी कायदे करण्याचे काम करते. या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळावर असते. त्यामध्ये मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासन ,पोलीस यंत्रणा यांचा समावेश असतो.उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय या न्यायव्यवस्थेकडून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम अपेक्षित असते. प्रसार माध्यमांकडून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे तसेच सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असते. जेव्हा हे चारही स्तंभ आपापली जबाबदारी टाळतात , ती दुसऱ्यावर ढकलू पाहतात किंवा सत्ताशरण होतात तेव्हा असंतोषाची , उद्रेकाची परिस्थिती निर्माण होते. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विरोधी कायदे होत असतील, त्या कायद्यांची हडेलहप्पीने अंमलबजावणी होत असेल, न्यायालये मूलभूत न्याय देण्यासाठी विलंब लावत असतील अथवा वेळकाढूपणा करत असतील आणि या तिन्ही स्तंभांच्या जबाबदारीवर माध्यमे कोणतीही न्याय्य भूमिका घेणार नसतील किंवा त्यांच्या समर्थनार्थ किंचाळणार असतील तर जनता स्वयंस्फूर्तीने जागृत होते हाही जगाचा इतिहास आहे.कॉक्रोच जनता पार्टीला मिळणारा पाठिंबा या चारही स्तंभांच्या अकार्यक्षमतेकडे बोट दाखवणारा आहे. तसेच विरोधी पक्षांच्या कमजोरीचेही हे अपत्य आहे हे नाकारून चालणार नाही. आणि मुख्य म्हणजे सत्तास्थानी असलेले नेते चुकत आहेत असे ते ठासून सांगत आहेत. ही करोडो माणसे आहेत. आपल्या फॉलोअर्स पेक्षा प्रचंड मोठ्या संख्येने आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

वास्तविक सरन्यायाधीशांनी बोगस पदवीधारकांना उद्देशून झुरळ म्हटलेले होते. त्यामुळे ज्यांची पदवी बोगस आहे अशी वर्षानुवर्षे चर्चा होते , आरोप होतात त्यांना व त्यांच्या समर्थकांना राग यायला हवा होता.मात्र त्याऐवजी खऱ्या अर्थाने प्रामाणिक पदवीधारक, उच्च पदवीधारक असूनही बेरोजगार राहिलेल्या तरुणांनी झुरळ शब्दाविरुद्ध आवाज उठवला आणि डिजिटल स्वरूपात ही पार्टी जन्माला आली. बोगस पदवीधारक असा आरोप असणाऱ्यांचे समर्थक कॉक्रोच जनता पार्टीचेच विरोधक बनले असे चित्र आहे. एखादा पक्ष काही वर्षात जेव्हा देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील अथवा जगातील मोठा पक्ष असल्याचा दावा करतो तेव्हा त्या पक्षात आज मूळ विचारधारेचे लोक किती आहेत आणि अन्य विचारधारांचे आयात किती केले आहेत याचाही विचार सुज्ञ जनता करत असते. तसेच ही शुद्धीकरण प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते हे ही आता उघड गुपित आहे.कॉक्रोच जनता पार्टीचे पाठीराखे याचाही विचार करत असणारच.

कॉक्रोच जनता पार्टीने अवघ्या चार-पाच दिवसात समाज माध्यमातील फॉलोअर्सचा विक्रम करुन अधिकृत भारतीय राजकीय पक्षांचे सर्व विक्रम मोठ्या फरकाने मोडलेले आहेत. या फॉलोअर्स मध्ये सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगारांप्रमाणे

राजकारणापासून सिनेसृष्टीपर्यंत आणि शिक्षण क्षेत्रापासून क्रीडाक्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींचाही समावेश आहे हे लक्षात घ्यावे लागेल.कॉक्रोच जनता पार्टी असे नाव जरी धारण केलेली असले तरी हा उद्रेक केवळ राजकीय नाही तर तो सामाजिक आणि सांस्कृतिकही आहे असे दिसून येते. कारण अवघ्या चार-पाच दिवसात डिजिटल मीडियात आणि पर्यायाने प्रिंट मीडियात ही पार्टी ज्या पद्धतीने व वेगाने दखलपात्र बनली आहे त्याची नोंद घ्यावीच लागेल. ही अदखलपात्र घटना नसून तो व्यवस्थेमध्ये बदल व्हावा अशी आग्रही मागणी करणारा दखलपात्र हस्तक्षेप आहे. या आभासी पार्टीची दखल दृक श्राव्य आणि छापील माध्यमांना लेख ,अग्रलेख , विस्तृत बातम्या देत घ्यावी लागली.

कॉक्रोच जनता पार्टीने आपला पंचसूत्री जाहीरनामाही प्रसिद्ध केला. (१) सीजेपी सत्तेत आल्यास सरन्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर राज्यसभेवर संधी मिळणार नाही.(२) सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या राज्यात कोणत्याही व्यक्तीचे वैध मत रद्द केल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांना अटक केली जाईल.(३) खासदारांची संख्या न वाढवता महिलांना ३३ ऐवजी ५० टक्के आरक्षण मिळेल. याशिवाय मंत्रिमंडळातही ५० टक्के पदे महिलांसाठी राखीव असतील.(४)माध्यमांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून अंबानी आणि आदानी यांच्या मालकीच्या सर्व माध्यमसंस्थांचे परवाने रद्द केले जातील.गोदी मीडियाच्या अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल.(५) एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही आमदाराला किंवा खासदाराला वीस वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक लढवण्यास आणि कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्यात येईल. अचानक निर्माण झालेल्या डिजिटल माध्यमातून या अचानक पक्षाचा हा तातडीचा जाहीरनामा आहे. कदाचित हा जाहीरनामा विस्तारीतही केला जाईल. पण या पाच कलमांचा आशय पाहिला तर भारतीय तरुणाई व जनतेमध्ये सध्या कोणत्या प्रकारचा रोष आहे आणि जनतेला अग्रक्रम कशाला द्यावा वाटतो हे सुस्पष्टपणे दिसून येते.

एरवी आपल्या घरीदारी सर्रास फिरणाऱ्या आणि कॉक्रोच मारणाऱ्या स्प्रेच्या जाहिरातीतून टीव्हीवर दिसणाऱ्या मेलेल्या झुरळाला जेवढे हलक्यात घेतले जाते तेवढे हलक्यात कॉक्रोच जनता पार्टीला घेता येणार नाही. त्यांना तुकडे तुकडे गॅंग ,अर्बन नक्षल ,देशद्रोही अशी शेलकी विशेषणे लावता येणार नाहीत. तसेच केवळ स्प्रे मारून त्यांना मारता येईल या भ्रमात कोणीही राहू नये. कारण वेगळ्या अर्थाने झुरळांचा इतिहास आणि त्यांची लढाऊ वृत्ती ध्यानात घ्यावी लागेल.झुरळ हा सजीव सृष्टीतील प्राचीन कीटक आहे.झुरळे डायनॉसॉर पेक्षाही प्राचीन आहेत. वीस-पंचवीस कोटी वर्षांपूर्वीच्या झुरळांचे जीवाश्म सापडलेले आहेत.

झुरळांच्या साडेचार हजार प्रजाती आहेत.त्याच्या प्रजातीनुसार झुरळ सहा महिने ते दोन वर्षापर्यंत जगते. घरोघरी आढळणारा हा अतिशय सामान्य कीटक अन्न,ओलावा आणि निवारा यांच्या शोधात असतो.तसेच साखरेसारख्या पदार्थाच्या गोड वासाकडे ती आकर्षित होतात. झुरळे गंध आणि ध्वनी ओळखू शकतात. झुरळ डोके तुटले तरी जवळपास एक महिना जगू शकते. त्याच्याकडे ही अनोखी क्षमता अथवा लढवू वृत्ती असते. डोके तुटले तरी लढणे आणि डोक्याशिवाय लढणे हे दोन्हीही यात गृहीत आहे.एका संशोधनानुसार आज पृथ्वीवर एका माणसामागे ३०० झुरळ आहेत.

महाराष्ट्र व संपूर्ण भारतात दमट आणि उबदार हवामानामुळे झुरळांची संख्या जास्त असते.

तसेच सहारा वाळवंटापासून अंटाक्र्टिकापर्यंत सर्वत्र झुरळे आढळतात. झुरळे सर्वभक्षी असून अन्नपदार्थ, कागद, कापड, चामडे वगैरे खातात तसेच कुरतडतात.झुरळांची उत्पत्ती २० – २५ कोटी वर्षांपूर्वी झाली असली तरी त्यांच्या शरीररचनेत फारसा बदल झालेला नाही. म्हणून त्यांना ‘जिवंत जीवाश्म’ असेही म्हणतात.सर्व कीटकांमध्ये झुरळे काटक मानली जातात. काही प्रजातीची झुरळे अन्नपाण्याविना महिनाभर जगू शकतात.

कडाक्याच्या थंडीतही ती टिकाव धरतात. एका प्रयोगात अर्धा तास पाण्यात बुडविल्यानंतरही झुरळे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे.

किरणोत्साराची जी मात्रा मनुष्यासाठी जीवघेणी ठरते तिच्यापेक्षा ६ ते १५ पट मात्रा झुरळे सहन करू शकतात.झुरळासंदर्भात कीटक म्हणून असलेल्या या शास्त्रीय माहितीकडे आजच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक वास्तवाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर झुरळ सहजपणाने झटकता अथवा मारता येत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची मुलाखत प्रकाशित झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना ही कल्पना नव्हे राग होता. सरन्यायाधीशांनी घटनेचे रक्षण करावे हे अपेक्षित असताना घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावणाऱ्यांच्या विरोधात ते कसे बोलतात ? हा प्राश्न मला पडला. त्यातून व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणारे सगळे कॉक्रोच एकत्र आले तर काय होईल ? असा विचार करून मी त्यावर प्रतिक्रिया देताना गमतीने ‘कोक्रोचे जनता पार्टी ‘ असा उल्लेख केला. पाठोपाठ ” धर्मनिरपेक्ष, समाजवादी ,लोकशाहीवादी आळशी ” असे घोषवाक्य तयार केले. या घोषवाक्याचा असाही अर्थ घेतला पाहिजे की,धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाही ही मूल्ये मानणारी माणसे संख्येने प्रचंड आहेत.मात्र या मूल्यांवर हल्ले होत असताना ती मूग गिळून गप्प आहेत.कारण ती आळशी आहेत, म्हणून संविधान विरोधी शक्ती वाढत आहेत. या पक्षाचा लोगोही तयार केला गेला.आणि या पार्टीत सहभागी होणाऱ्यांसाठी बेरोजगार ,आळशी, दिवसभर ऑनलाईन असणे आदी निकष लावण्यात आले. असे निकष पाळू शकणारे करोडो लोक तयार होतात हा सत्ता राबविणाऱ्याचा धोरणलकवा आहे. करोडो हाताना काम नाही हे वास्तव आहे. एकीकडे रोजगार वृद्धी करणारी धोरणे नाहीत आणि दुसरीकडे करदात्यांच्या पैशातून विकास करण्या ऐवजी रेवडी वाटप करणाऱ्या मोफत योजना आणि तिसरीकडे परधर्मद्वेषावर आधारित धर्मांधतेची पेरणी अशातून पिढीच्या पिढी आळशी बनणार नाही तर काय होणार?

अभिजित दीपके यांनी अवघ्या चार पाच दिवसात एवढी मोठ्या प्रमाणात घडलेली घडामोड पुढे कशी वळण घेईल हे आत्ताच सांगणे घाईचे ठरेल हे स्पष्ट करत काही बाबी उल्लेखित केल्या आहेत. आणि अखेरीस मी घाबरणार नाही ,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेले अधिकार जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी बोलत राहणार हे स्पष्ट केले आहे.या पार्टीच्या मुख्य अकाउंटला २१ मे रोजी दुपारी १२ वाजता ब्रेक लावला गेला. इंस्टाग्राम अकाउंट २२ मे रोजी सकाळी नऊ वाजता हॅक केले गेले. पण त्यानंतर लगेचच ‘

कॉक्रोचेस नेव्हर डाय म्हणजे झुरळे कधीच मरत नसतात या घोषवाक्यासह पुनरागमन करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी केली. त्या नंतरही द कॉक्रोच युथ , कॉक्रोच इज बॅक,कॉक्रोच न्यूज, आय एम कॉक्रोच,कॉक्रोच पार्टी ऑफ इंडिया,कॉक्रोच जनता पार्टी ( Gen Z ) अशा विविध नावानी सक्रिय आहे.

या पार्टीला मिळणारा पाठिंबा पाहून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी, या पाठिराख्यात बहुसंख्य समर्थक पाकिस्तानमधील आहेत.अशा रीतीने पाकिस्तानमधील फॉलोअर्स मिळवणाऱ्यांची कीव वाटते असे ट्विट केले होते. त्यावर २३ मे रोजी अभिजीत दीपके यांनी एक स्क्रीन रेकॉर्डिंग शेअर केले त्यामध्ये त्यांनी दावा केला की ,पक्षाचे अकाउंट हॅक होण्यापूर्वी ९४.१ टक्के फॉलोअर्स भारतीय आहेत. १ टक्के अमेरिकेचे, ०.७ टक्के ब्रिटनचे ,तर कॅनडा व युएई मधील प्रत्येकी ०.६ टक्के फॉलोवर्स आहेत. आणि उर्वरित ३.७ टक्के जगातील अन्य देशातील आहेत.तसेच यावेळी त्यांनी असेही म्हटले आहे की,” सरकारला कॉक्रोचची इतकी भीती का वाटते ? पण सरकारची हुकूमशाही वृत्ती भारतातील तरुणांचे डोळे उघडत आहे. आम्ही स्वतःसाठी एका चांगल्या भविष्याची मागणी करत होतो. हाच आमचा एकमेव गुन्हा आहे.तुम्ही इतक्या सहजपणे सुटका करून घेऊ शकत नाही. सध्या आम्ही आमच्या एका नवीन घराच्या उभारणीवर काम करत आहोत.झुरळे कधीच मरत नसतात.”

गेल्या दोन वर्षात बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलन, नेपाळमधील जेन झी क्रांती, केनिया मधील फायनान्स बिल आंदोलन हे तरुणांनी घडवून आणले होते हे दुर्लक्षित करता येणार नाही. तसेच जर्मनीतून ध्रुव राठी, ऑस्ट्रेलियातून आर्पित शर्मा आणि अमेरिकेतून अभिजीत दिपके जेंव्हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडून सरकारकडे उत्तरे मागतात तेव्हा हे सर्वजण आपल्याच धर्माचे असतात हे लक्षात घेतले पाहिजे. फक्त ते मानव धर्माला प्राधान्य देतात ज्याचे महत्त्व मोठे आहे.

सरकार ही आंदोलने दडपण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी अनेक पावले उचलू शकेल. मात्र सरकारला तरुणांना न्याय देणारी धोरणेच आखावी लागतील .केवळ मुस्कटदाबीच्या आधारे हे दडपता येणार नाही. तसेच जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित धोरणे आखून ती अंमलात आणावी लागतील. जातीय – धार्मिक तेढ निर्माण करून आणि रेवडी वाटप करून फार काळ सत्ताकारण करता येत नसते हे लक्षात घ्यावे लागेल.

कॉक्रोच जनता पार्टी हा तरुणांचा उद्रेक आहे.एखाद्या गोष्टीचा अचानक होणारा भडका, स्फोट किंवा अतिवेगवान प्रसार याला उद्रेक म्हणतात. त्याच प्रकारचा हा भावनांचा उद्रेक आहे.राग आणि दुःख अनियंत्रित करणारा हा उद्रेक आहे. हा दमन आणि शोषणविरोधाचा उद्रेक आहे.

हा उद्रेक नव्या माध्यमातून व्यक्त झालेला आहे. तो डिजिटल आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण सध्या मानवी जीवनामध्ये सर्व प्रकारची डिजिटल अपरिहार्यता आपण स्वीकारलेली आहे. आपले बहुतांश व्यवहार डिजिटल झाले आहे. आपण जन्माच्या अभिनंदनापासून भावपूर्ण श्रद्धांजलीपर्यंत सर्वत्र डिजिटलच झालो आहोत. अशावेळी डिजिटल माध्यमातून तयार झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीला दुर्लक्षित करता येणार नाही. कारण त्या पार्टीत कॉक्रोच प्रमाणेच जनताही अधोरेखित केलेली आहे. सोशल मीडियावरील प्रचाराला यश येत नसते असे म्हणावे तर काही राजकीय पक्षांच्या अनैसर्गिक वाढीत त्या पक्षाच्या आयटीसी सेलचे,सोशल मीडियाचे योगदान मोठे आहे हे नाकारून चालणार नाही.

या उद्रेकातून जन्मलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे भविष्य काय असेल ? हा भाग वेगळा आहे. मात्र या देशातील तरुणाई आपली अस्वस्थता, आपले प्रश्न, आपला आक्रोश लोकशाही मार्गाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारे मांडत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचा गांभीर्याने विचार न करता भारताला त्रास देण्यासाठी हे टूल किट वापरले जात आहे , यामागे विरोधी राजकीय शक्ती आहेत अथवा सत्ताधाऱ्यातीलच असंतुष्ट गट आहे असे म्हणणे म्हणजे मुख्य मुद्द्यापासून पलायन करणे आहे. परिस्थितीचे गांभीर्य नाकारल्यासारखे आहे. ” गिरने का डर उन्हे होता है उडान से डरते है, हम तो वो है जो तुफानो मे भी सफर करते है ” हे आभासी जगातील का होईना पण आजचे वास्तव आहे.

सध्या निवडणुकांना जे अत्यंत भ्रष्ट स्वरूप आलेले आहे त्यामुळे बहुसंख्य प्रामाणिक जनता दुखावली गेलेली आहे. लोकशाहीत लोक हे महत्त्वाचे असतात. मात्र आज लोक एकीकडे आणि शाही दुसरीकडे असे स्पष्टपणे विभाजन झाले आहे.

लोकांनाच गृहीत धरून अथवा त्यापैकी काहींना खरेदी करून ज्यावेळी सत्ता प्राप्त केली जाते तेव्हा बहुतांश सर्वसामान्य जनतेत सुप्त असंतोष आकाराला येत असतो. गैरमार्गाचा अवलंब करून विजयी झालेले सत्ताधारीही आपल्या विजयाचा आनंद प्रामाणिकपणे साजरा करू शकत नाहीत. कारण त्यांना हा विजय खोटा आहे, फसवा आहे हे माहिती असते हेही अलीकडे अनेकदा स्पष्ट झाले आहे. समाज माध्यमांवर विरोधी पोस्टची संख्या मोठी मात्र तरीही सत्तास्थानी बसण्याची किमया ही व्यवस्थेविरुद्ध असंतोष निर्माण करणारच.

जेव्हा सत्तेवर असलेला प्रस्थापित राजकीय पक्ष जनतेचे म्हणणे काय आहे ? , जनतेचे प्रश्न काय आहेत ? , जनतेचा अग्रक्रम कशाला आहे ?याचा विचार न करता आपली सामाजिक,राजकीय, आर्थिक ,सांस्कृतिक विचारधारा पुढे रेटत राहतो तेव्हा त्याचा सुरुवातीला निषेध केला जातो. मग विरोध केला जातो.या निषेधाची व विरोधाची जेव्हा दखल घेतली जात नाही तेव्हा जनता पर्याय शोधते.जनता सदैव आणीबाणीच्या कालखंडात राहू शकत नाही. आणीबाणी घोषित असो अथवा अघोषित ती उठवावी लागते. अन्यथा जनता ती उठवतेच हे दुर्लक्षून चालणार नाही.जनतेला राज्यघटनेची मूल्ये धोरणकर्त्यांच्या धोरणातून दिसावी लागतात. तो जनतेचा अधिकार आहे. किंबहुना जनतेने त्यासाठी सत्तेवर बसवलेले असते. लोकशाहीत मन की बात नाही जन की बात म्हत्वाची असते. देश भाषणबाजीवर नाही तर योग्य निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीवर पुढे जात असतो. हॅपिनेस इंडेक्स पासून प्रेस फ्रीडम पर्यंत जगात सर्वाधिक मागे राहून आणि देशाचे मुख्य चलन असलेला रुपया सतत घसरत जाऊन देश पुढे जाऊ शकत नाही हे वास्तव आहे.१४५ कोटी लोकसंख्येच्या देशात सत्तेने आपली राजकीय, सामाजिक, आर्थिक, संस्कृतिक धोरणे आखताना २९० कोटी हातांचाही विचार करावा ही अपेक्षा अनाठायी नाही. रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर ही जुनी म्हण आपण जाणतो.पण आता रिकामे हात आणि सत्तेला जाब ही नवी म्हण रूढ होत आहे. काही काळ आपण काही लोकांना फसवू शकतो, काही काळ आपण सर्व लोकांना फसवू शकतो पण सर्वकाळ सर्व लोकांना फसवू शकत नाही हे कॉक्रोच जनता पार्टीच्या निर्मितीतून व तिला मिळणाऱ्या आभासी पाठिंब्यातून सिद्ध झाले आहे . हा प्रवास पुढे काय व कसे वळण येईल हे आज सांगता येत नाही. पण प्रवास सुरू का झाला या कारणांचा विचार केला पाहिजे.मुद्दा कॉक्रोच जनता पार्टीच्या पाठिंब्याचा किंवा समर्थनाचा नाही. वास्तवात शेकडो पक्ष असताना हा आभासी पक्ष का तयार झाला व त्याला सर्वांपेक्षा आभासी पाठिंबा का मिळाला हा आहे. सामूहिक विवेकाला दुर्लक्षित करता येणार नाही. म्हणूनच त्याकडे विवेकाने पाहणे योग्य ठरेल.

हे सगळे होत असताना या विरोधात शनिवार ता.२३ मे रोजी राजा चौधरी या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी केलेल्या तोंडी निरीक्षणांचा गैरवापर करून त्याचा व्यवसायिक फायदा करून घेतला जात असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेनुसार न्यायालयात मांडलेल्या मुद्द्यांचा वापर ब्रँडिंग आणि प्रसिद्धीसाठी करणे चुकीचे आहे. या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची यावी आणि बनावट पदव्या वापरून प्रॅक्टिस करणाऱ्या बनावट वकिलांचा शोध घ्यावा अशी मागणीही या याचिकेत केली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची तातडीने सुनावणीची गरज नाही असे स्पष्ट केले आहे. एकूणच गेले दहा दिवस हे जे काही चालू आहे त्याला अल्पजीवी ,हास्यास्पद , बालिश प्रकार म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. आभासी आंदोलने रस्त्यावर खिळे ठोकून ,पाण्याचा मारा करून ,लाठीचार्ज करून संपवता येत नसतात. लोकाभिमुख निर्णय घेऊन आणि त्याची योग्य अंमलबजावणी करूनच ही आंदोलने शांत करावी लागतील हे लक्षात घेतले पाहिजे.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली सदतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ते म्हणून सुपरिचित आहेत.)


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!