पन्हाळ्यात ‘जनसुराज्या’चा कणा मोडला ; विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा ‘गुलाल’!


पन्हाळ्यात ‘जनसुराज्या’चा कणा मोडला ; विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा ‘गुलाल’!

कोल्हापूर : कोल्हापूरच्या लाल मातीत राजकारणाचे आखाडे काही नवे नाहीत, पण यंदा पन्हाळा आणि हातकणंगलेच्या मैदानात जे काही घडलंय, त्याने भल्याभल्यांची दांडी गुल झाली आहे! ज्या विनय कोरेंनी आजवर पन्हाळ्याच्या दऱ्याखोऱ्यांत आपल्या शब्दाची आण आणि जनसुराज्याचा बाणा मिरवला, त्यांच्याच हक्काच्या ‘सातवे’ आणि ‘पोर्ले’च्या घरात राष्ट्रवादीने असा काही सुरुंग लावलाय की, जनसुराज्याचा सुराज्य डळमळीत झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

पोर्लेत कोरेंचा दारूण पराभव!
‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्या कोल्हापुरात यावेळी राष्ट्रवादीने ‘असं काही केलंय’ की विनय कोरेंना विचार करण्याची वेळ आली आहे. पोर्ले मतदारसंघात तर राष्ट्रवादीने असा काही भीमपराक्रम केलाय, की जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सर्व जागा पदरात पाडून घेतल्या. ज्या मतदारसंघाला कोरे आपला अभेद्य गड समजत होते, तिथे राष्ट्रवादीच्या घड्याळाने असा काही गजर केला की जनसुराज्याचे कार्यकर्ते अवाक झाले! पोर्लेत झालेला हा विजय म्हणजे केवळ जागा जिंकणे नव्हे, तर कोरेंच्या वर्चस्वाला दिलेले हे थेट आव्हान आहे.

सातवेमध्ये जयंत पाटलांचा डंका..!

दुसरीकडे सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातही तीच तऱ्हा! राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी जनसुराज्याचा पत्ता कट करत विजयाचा झेंडा रोवला आहे. केवळ जिल्हा परिषदच नव्हे, तर सातवे आणि माले या दोन्ही पंचायत समितीच्या जागांवर राष्ट्रवादीने विजयाचा गुलाल उधळला. बालेकिल्ला शाबूत राखण्यात कोरे सपशेल अपयशी ठरल्याचे या निकालांवरून स्पष्ट दिसत आहे.

मात्र, जनसुराज्याचे इंजिन पूर्णपणे रूळावरून घसरलेले नाही. कोडोली आणि कुंभोजच्या जनतेने मात्र कोरेंची साथ सोडलेली नाही. अत्यंत प्रतिष्ठेच्या कोडोली मतदारसंघात अमरसिंह पाटलांनी विजय खेचून आणत कोरेंची थोडीफार लाज राखली आहे. तर कुंभोजमध्ये शीतल प्रवीण यादव यांनी तब्बल १९७४ मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीच्या नाकावर टिच्चून जनसुराज्याचा झेंडा फडकवला आहे. टोप परिसरातही जनसुराज्याचे वर्चस्व कायम असले, तरी सातवे आणि पोर्लेतील पराभवाची सल विनय कोरेंना काळजाला बोचणारी ठरेल, यात शंका नाही!

थोडक्यात काय, तर पन्हाळ्याच्या राजकारणात आता नवी समीकरणं लिहू लागली आहेत. कोरेंच्या सत्तेच्या किल्ल्याला राष्ट्रवादीने दिलेला हा धक्का आगामी काळात काय वादळ निर्माण करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!