खाकी वर्दीचा ‘भाडेकरू’ अध्याय संपणार! राज्य बँकेचा मदतीचा हात; ५ हजार पोलिसांच्या घराचं स्वप्न साकार

रात्रंदिवस जनतेच्या सुरक्षेसाठी बंदुकीच्या सावलीत उभा राहणारा पोलीस स्वतःच्या घरासाठी मात्र वर्षानुवर्षे भाड्याच्या खोलीत ‘सलाम’ ठोकत होता. गुन्हेगारांना पकडणाऱ्या हातात स्वतःच्या घराची चावी कधी येणार, हा प्रश्न अनेक पोलिसांच्या संसारात कायमच ड्युटीवर होता. अखेर राज्य सरकारने आणि राज्य सहकारी बँकेने मिळून तब्बल १ हजार ७६८ कोटींच्या अर्थसाहाय्याचा बिगुल वाजवत पोलिसांच्या घरकुलाच्या स्वप्नाला सरकारी शिक्का मारला आहे.
सरकारी फाईलींच्या धुळीत अडकलेल्या अनेक योजना जशा ‘उद्या पाहू’च्या कपाटात झोपतात, तशी ही योजना झोपली नाही, हेच तिचं मोठं यश म्हणावं लागेल. गेली कित्येक वर्षे पोलीस वसाहतींची अवस्था बिकट होती. कुठे छत गळत होते, तर कुठे पगार संपेपर्यंत भाड्याचा हप्ता संपत होता. अशा वेळी राज्य सहकारी बँकेने कमी व्याजदरात मदतीचा हात पुढे केल्याने हजारो पोलिसांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण आहे.
या योजनेत तब्बल ५ हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार असून, पोलिसांचं स्वतःचं घर असावं, हा विचार आता प्रत्यक्षात उतरू लागला आहे.
सामाजिक बांधिलकीचा ‘बँकिंग’ चेहरा
राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी या योजनेच्या अंमलबजावणीत अत्यंत सकारात्मक भूमिका बजावली आहे. या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की,
“राज्यातील पोलीस कुटुंबीयांच्या निवासाचा प्रश्न सुटावा, या सामाजिक भावनेतून आम्ही या प्रक्रियेत सहभागी झालो. व्यावसायिक सहकारी बँकिंगबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा आम्हाला आनंद आहे.”
त्यांच्या या भूमिकेमुळे या योजनेकडे केवळ एक आर्थिक व्यवहार म्हणून न पाहता, पोलिसांच्या कष्टाप्रती असलेली कृतज्ञता म्हणून पाहिले जात आहे.
संबंधित टॅग्स:
#PoliceHousing #MaharashtraPolice #VidyadharAnaskar #StateCooperativeBank #PuneNews #पोलीस_घरकुल #महाराष्ट्र_पोलीस #विद्याधर_अनास्कर #PressMediaLive



























