२२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा ‘पेपरफुटी’चा काळा खेळ ; दोषींवर कठोर कारवाई कधी?
अशोक मासाळ
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा आणि करिअरचा पाया असलेली नीट (NEET) परीक्षा पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. २२ लाखांहून अधिक विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करून, पालकांनी पोटाला चिमटा काढून भरलेली फी आणि घेतलेले कर्ज यांचा विचार करून परीक्षा केंद्रावर पोहोचतात. मात्र, त्यांच्या मेहनतीची किंमत एका पेपरफुटीमुळे मातीमोल होते, तेव्हा केवळ एक परीक्षा रद्द होत नाही, तर लाखो कुटुंबांची स्वप्ने उद्ध्वस्त होतात. हा केवळ एखादा तांत्रिक बिघाड नसून देशाच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास हादरवणारा राष्ट्रीय प्रश्न आहे.
२०१७ पासून २०२४ पर्यंत वेळोवेळी या परीक्षेबाबत संशय निर्माण झाले आहेत. दरवेळी चौकशी समित्या नेमल्या जातात, काही दलालांना अटक होते आणि काही दिवसांनी सर्व प्रकरण शांत होते. मात्र, ज्यांनी या पेपरफुटीतून कोट्यवधी रुपये कमावले, ते आजही मोकळे फिरत आहेत. दुसरीकडे, प्रामाणिक विद्यार्थी मात्र मानसिक ताण आणि भविष्यातील अंधारामुळे नैराश्यात ढकलला जात आहे. आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. शेतीची कामे करून किंवा दागिने गहाण ठेवून पालकांनी जमवलेला पैसा जेव्हा अशा भ्रष्ट व्यवस्थेमुळे वाया जातो, तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या मानसिक अवस्थेचा विचार शासन करणार आहे का?
आज विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासापेक्षा “पेपर सुरक्षित राहील का?” ही भीती जास्त आहे. गुणवत्ता आणि मेहनतीपेक्षा पैसा आणि माफियांचा प्रभाव वाढताना दिसतोय, ही देशाच्या नैतिकतेसाठी चिंतेची बाब आहे. जर देशातील डॉक्टर घडवणारी सर्वात मोठी परीक्षाच पारदर्शक नसेल, तर भविष्यातील आरोग्य व्यवस्थेचे भवितव्य काय असेल? “अभ्यास करून उपयोग काय, जर पेपर आधीच विकला जात असेल?” हा तरुणांनी विचारलेला प्रश्न व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे.
आता केवळ निवेदने देऊन चालणार नाही, तर ठोस कृतीची गरज आहे. पेपरफुटी करणाऱ्यांना ‘राष्ट्रीय शैक्षणिक दहशतवाद’ मानून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटले चालवणे, त्यांच्या मालमत्ता जप्त करणे आणि त्यांना राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते मोडीत काढणे आवश्यक आहे. जर शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांना न्याय दिला नाही, तर देशाच्या भविष्यासमोर उभा असलेला हा सर्वात मोठा धोका ठरेल. तरुणाईचा व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी या भ्रष्ट साखळीला मुळासकट उखडून टाकण्याची वेळ आता आली आहे.



























