आजची अग्रलेखीय तोफ : महाराष्ट्राची ‘राजकीय’ हास्यजत्रा!


आजची अग्रलेखीय तोफ : महाराष्ट्राची ‘राजकीय’ हास्यजत्रा !

एकेकाळी टिळक-आगरकरांच्या लेखणीने आणि शिवरायांच्या तलवारीने तळपलेला हा महाराष्ट्र आज काय पाहतोय? तर सत्तेसाठी लाळ घोटणाऱ्या, तत्त्वांची थडगी बांधणाऱ्या आणि निष्ठेचा लिलाव मांडणाऱ्या राजकारण्यांची एक अक्राळ विक्राळ ‘हास्यजत्रा’! अहो, या राजकारण्यांना पाहून आता सर्कशीतले विदूषकही सुट्टीवर गेले आहेत; कारण खरी ‘कॉमेडी’ तर आता मंत्रालयाच्या पायऱ्यांवर आणि विधानसभेच्या व्हरांड्यात सुरू आहे!

निष्ठांचा ‘ऑक्शन’ आणि पक्षांची ‘मिसळ’!

आजच्या महाराष्ट्रात कोणता नेता कोणत्या पक्षात आहे, हे ओळखण्यासाठी आता ‘राजकीय हवामान खात्या’ची गरज भासू लागली आहे. सकाळी एकाच्या ‘वर्षा’वर चहा पिणारा नेता दुपारी दुसऱ्याच्या ‘सागर’वर जेवतो आणि रात्री तिसऱ्याच्याच ‘मातोश्री’वर जाऊन निष्ठेचे पाढे वाचतो! ही निष्ठा आहे की वाण्याच्या दुकानातली साखर, जी कुणीही पैसे फेकून विकत घ्यावी?

आमदार की भाजीपाला..?: आजकाल आमदारांना हॉटेलात कोंडून ठेवावं लागतं. जणू काही हे लोकप्रतिनिधी नसून ‘कत्तलखान्याकडे’ नेणारी जनावरं आहेत! गुवाहाटीचे डोंगर काय, गोव्याचे समुद्र काय…

लोकशाहीचा असा ‘हनिमून’

यापूर्वी महाराष्ट्राने कधीच पाहिला नव्हता. ‘काय झाडी, काय डोंगर’ म्हणत स्वतःच्याच इभ्रतीचे वाभाडे काढणाऱ्या या नतद्रष्टांना पाहून सह्याद्रीलाही आज घाम फुटला असेल!

बापाचा पक्ष आणि पोराची सत्ता: ज्या बापाने रक्ताचं पाणी करून पक्ष उभा केला, त्याच बापाला घराबाहेर काढून “पक्ष माझाच” म्हणणारी ही कार्टी पाहून ‘नटसम्राट’मधल्या गणपतराव बेलवलकरांच्या दुःखाची आठवण येते. “कुणी घर देता का घर?” अशी आर्त हाक आज महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘जनक’ मारत आहेत, पण सत्तेच्या नशेत धुंद झालेल्या अभिमन्यूंना फक्त ‘कौरवांच्या’ छावणीत शिरण्यातच रस उरला आहे!

ईडीची ‘एसी’ आणि चौकशीची ‘फेरी ‘!

या हास्यजत्रेचा सगळ्यात मोठा ‘रिंगमास्टर’ दिल्लीत बसला आहे. तिकडून नुसती ‘ईडी’ची काठी फिरली की, इकडच्या वाघांचे मांजर व्हायला वेळ लागत नाही! ज्यांच्या नावावर कालपर्यंत भ्रष्टाचाराचे एफआयआर फाटत होते, ते आज सत्तेच्या गंगेत न्हाऊन निघून ‘पुण्यवान’ झाले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे आता या नेत्यांसाठी ‘प्रसाद’ झाला आहे. “तुरुंगात गेलो तरच नेता मोठा होतो,” या विकृत समजुतीपायी ही मंडळी आता कायद्यालाही आपल्या पायाची टाच समजू लागली आहेत.

जनतेची ‘एक्झिट’ आणि नेत्यांची ‘एन्ट्री’!

शेतकरी बांधावर मरतोय, तरुणांच्या पदव्या कचऱ्याच्या डब्यात पडल्या आहेत, पण आमचे ‘महाराज’ मात्र एकमेकांचे उखाणे काढण्यात मग्न आहेत. टीव्हीवरच्या चर्चा पाहिल्या की वाटतं, आपण एखादं ‘गालीप्रदान’ संमेलनच पाहत आहोत. भाषेचा स्तर इतका खाली घसरला आहे की, गटारातील पाणीही त्यापुढे शुद्ध वाटेल! एकमेकांना ‘रे’ तु रे’ करणे आणि जातीपातीची विषारी बीजं पेरणं, हेच काय ते आजचं प्रगत महाराष्ट्राचं प्रगत राजकारण?

“पूर्वीचे नेते जनतेच्या डोळ्यातील पाणी पुसायचे, आजचे नेते जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःचं भविष्य उजळवत आहेत!”

आता तरी ‘पडदा’ पाडा..!

अहो, ही महाराष्ट्राची ‘हास्यजत्रा’ नाही, तर हे लोकशाहीचं विडंबन आहे! जनतेने मत दिलं एकाला, सत्ता मिळाली दुसऱ्याला आणि मजा मारतोय तिसराच! हा मतदारांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राच्या मातीचा द्रोह आहे. जर हीच सोंगाडी राजकारणाची पद्धत राहिली, तर उद्याचा इतिहास तुम्हाला ‘नेते’ म्हणून नाही, तर ‘महाराष्ट्र लुटणारे दलाल’ म्हणून ओळखेल!

आत तरी जागे व्हा! ही राजकीय सर्कस थांबवा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणं बंद करा. अन्यथा, जनता जेव्हा ‘मतपेटीचा वरवंटा’ तुमच्या डोक्यावरून फिरवेल, तेव्हा तुमचे सगळे ‘विनोद’ तुमच्याच घशात अडकल्याशिवाय राहणार नाहीत!


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!