सह्याद्री एक्सप्रेससह इतर गाड्यांच्या थांब्याबाबत प्रशासन विचाराधीन; ईश्वर अगरवाल यांच्या पाठपुराव्याला यश

देहूरोड | प्रतिनिधी: चंद्रशेखर पात्रे
देहूरोड विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य आणि पुणे प्रवासी संघाचे प्रतिनिधी ईश्वर अगरवाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. मुंबई येथे पार पडलेल्या रेल्वे सल्लागार समितीच्या १२७ व्या बैठकीत देहूरोड स्थानकावरील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत रेल्वे प्रशासनाने देहूरोड येथे रेल्वे आरक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली असून, इतर मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे.

सात मुद्द्यांवर आक्रमक मांडणी
कोविड काळात बंद करण्यात आलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी आणि देहूरोड स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळण्यासाठी ईश्वर अगरवाल यांनी रेल्वे महाप्रबंधक कार्यालय, मुंबई यांच्याकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत त्यांना विशेष निमंत्रित म्हणून बैठकीत बोलावण्यात आले होते. यावेळी अगरवाल यांनी सात प्रमुख मुद्दे मांडले:
१. दुपारच्या वेळेतील पुणे-लोणावळा लोकल पुन्हा सुरू करणे.
२. जलद गतीच्या गाड्यांना देहूरोडवर थांबा देणे.
३. सह्याद्री एक्सप्रेस आणि कर्जत पॅसेंजर पुन्हा सुरू करणे.
४. विजापूर-कर्नाटक एक्सप्रेस पूर्ववत करणे.
५. देहूरोड स्थानकावर आरक्षण तिकीट खिडकी सुरू करणे.
६. तीर्थक्षेत्र देहू-आळंदीमुळे वाढती भाविकांची संख्या लक्षात घेता सुविधा वाढवणे.
७. प्लॅटफॉर्मची मर्यादा आणि प्रवाशांच्या गरजांची पूर्तता करणे.
रेल्वे प्रशासनाची भूमिका
बैठकीत रेल्वे प्रशासनाने विविध तांत्रिक बाबींवर स्पष्टीकरण दिले. पुणे-लोणावळा विभागात सकाळी १०:५० ते दुपारी २:५० या वेळेत रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचे (Maintenance) काम चालते, त्यामुळे दुपारच्या वेळेत लोकल सेवा सुरू करण्यात अडचणी असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच, देहूरोड येथील प्लॅटफॉर्मच्या मर्यादेमुळे सध्या सर्वच जलद गाड्यांना थांबा देणे व्यवहार्य नसल्याचे सांगण्यात आले.
तथापि, प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन देहूरोड स्थानकावर आरक्षण केंद्राची चाचणी घेतली जाईल आणि लवकरच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले आहे. सध्या तळेगाव किंवा चिंचवडला जावे लागणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
तीर्थक्षेत्राचे महत्त्व अधोरेखित
“देहूरोड ही संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने गाड्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे,” असे मत ईश्वर अगरवाल यांनी बैठकीत मांडले.
कोविड काळापासून बंद असलेल्या मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर आणि सह्याद्री एक्सप्रेसबाबत सध्या प्रक्रिया सुरू असून, आगामी काळात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. ईश्वर अगरवाल यांनी दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीमुळे देहूरोड परिसरातील रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


























