खालापूरच्या मातीत मलिदा खाणारे ‘ते’ अधिकारी आणि ‘अदृश्य’ चोरांचा हैदोस..!
— सुनील पाटील
खालापूर/रायगड:
आमच्या रायगडच्या पवित्र मातीला आता चोरांच्या नजरा लागल्या आहेत, असे म्हटले तर ते चुकीचे ठरेल. कारण इथे चोरांपेक्षा ‘चोर सोडून संन्यासाला फाशी’ देणारे आणि डोळ्यावर गांधारीसारखी पट्टी बांधलेले आमचे महसूल अधिकारीच जास्त धन्य आहेत! मौजे अंबिवली तर्फे तुंगारतान येथे सध्या मातीचा जो ‘नग्न नाच’ सुरू आहे, तो पाहून कुणाचेही काळीज हेलावून जाईल, पण आमच्या साहेबांची कातडी गेंड्याची आहे, त्याला आम्ही काय करणार?
अधिकारी की ‘कॅमेरामन’?
प्रकरण असे की, या माती चोरीची माहिती पुराव्यासह, फोटोंसह आणि लोकेशनसह मंडल अधिकारी श्रीनिवास खेडकर यांच्या कानावर घातली गेली. साहेबांनी मोठ्या औदार्याने सांगितले की, “मी तलाठ्यांना सांगतो असे सांगितले !” पुढे तलाठी बलभीत लते यांनी तर त्याहून थोर उत्तर दिले. “मी जागेवर जाऊन पंचनामा करतो,” असे त्यांनी फर्मान सोडले. पण तो ‘पंचनामा’ अजूनही ‘नामा’तच अडकला आहे की काय, हे समजत नाही. दिवस गेले, रात्री गेल्या, हजारो ब्रास माती लंपास झाली, पण साहेबांच्या पायाला अजून ‘जागेवर’ जाण्याचे श्रम घेता आले नाहीत.
रात्रीचा ‘रास’ आणि ओव्हरलोडचा ‘त्रास’!
दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या काळोखात कोणतीही रॉयल्टी नसताना, एमआयडीसीच्या उरावर बसून ही माती चोरी सुरू आहे.
बिननंबरी हैदोस : उत्खनन करणारी जेसीबी यंत्रे बिन नंबरी आहेत. का? तर ओळख पटू नये..!
मृत्यूचे डंपर : रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने धावणारे ओव्हरलोड डंपर म्हणजे चालते-फिरते काळच ठरत आहेत.
नागरिकांचे जीणे हराम: ज्या रस्त्यावर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले फिरतात, तिथे या राक्षसी डंपरनी धुमाकूळ घातला आहे. उद्या एखादा अपघात झाला की हेच अधिकारी मग ‘शोक’ व्यक्त करायला पुढे येतील, हे मात्र नक्की!
निसर्गाचा खून आणि महसुलाचा चुना..!
पावसाळ्यात पूर येईल, शेती वाहून जाईल, मातीची धूप होईल—हे सर्व सांगायला काय ज्योतिषाची गरज आहे? पण प्रशासनाला याचे सोयरसुतक नाही. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे, रॉयल्टीचा पत्ता नाही आणि अधिकारी मात्र ‘कानाडोळा’ नावाचा नवा खेळ खेळत आहेत.
आमचा थेट सवाल आहे:
“काय हो खेडकर साहेब, काय हो लते साहेब… ही माती नेमकी कुणाच्या आशीर्वादाने वाहत आहे? चोरांचे हात कोणापर्यंत पोहोचले आहेत? तुम्हाला फोटो पाठवूनही जर कृती होत नसेल, तर आम्ही असे समजायचे का की तुमची ‘नजर’ फक्त मलिद्यावरच आहे?”
तात्काळ कारवाई करा, अन्यथा…
या बेकायदेशीर उत्खननामुळे भविष्यात जर ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला, तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे ‘सुस्त’ प्रशासन असेल. आता तरी जाग या, की अजून कुणाच्या बलिदानाची वाट पाहत आहात?


























