गुंडेवाडीचा गुलाल कुणाचा..? मिरजेच्या रांगड्या मातीत लोकशाहीचा महासंग्राम..!


गुंडेवाडीचा गुलाल कुणाचा..? मिरजेच्या रांगड्या मातीत लोकशाहीचा महासंग्राम!

सांगली  जिल्हा अशोक मासाळ :

सांगली | “रणांगण निवडणुकीचं असो वा युद्धाचं, मिरजेची माणसं कधीच मागे हटत नाहीत!” याचीच प्रचिती आज गुंडेवाडीत आली. २०२६ सालच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या सार्वत्रिक निवडणुकीत गुंडेवाडीच्या मतदारांनी जो ‘इंगा’ दाखवला आहे, तो पाहून भल्याभल्यांची मती गुंग व्हावी!

लोकशाहीचा ‘होम’ आणि मतदारांचा ‘जोम’!
सकाळचा सूर्य डोक्यावर येण्याआधीच गुंडेवाडीच्या मतदान केंद्रांवर मतदारांनी अशा काही रांगा लावल्या होत्या की, जणू पंढरीची वारीच तिथे अवतरली आहे. लोकशाहीच्या या महाकुंभात प्रत्येक जण आपली ‘आहुती’ देण्यासाठी सज्ज होता. तीन खोल्यांमध्ये विभागलेल्या या रणमैदानात आकड्यांचा खेळही तसाच रंगला.

खोली क्रमांक १ मध्ये ७५१ वाघांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

खोली क्रमांक २ मध्ये ७१३ जणांनी लोकशाहीची मशाल पेटवली.

खोली क्रमांक ३ मध्ये ४५७ मतदारांनी मतपेटीचा कौल नोंदवला.

पावणे सातपर्यंत ‘रणकंदन’!

खोली क्रमांक एक मध्ये तर संध्याकाळी साडेपाच वाजता वेगळंच नाट्य पाहायला मिळालं. वेळ संपली तरी मतदारांचा ओघ संपेना! लोकशाहीवरची ही निष्ठा पाहून प्रशासनालाही नमते घ्यावे लागले. अखेर ८५ मतदारांना चिठ्ठ्या देण्यात आल्या. जोपर्यंत शेवटचा ‘गडी’ मतदान करत नाही, तोपर्यंत निवडणूक अधिकारी हलले नाहीत. रात्री ६:४५ वाजता जेव्हा शेवटचे मतदान पडले, तेव्हाच या महासंग्रामाचा पहिला अंक शांत झाला!

कुणीही विचलित झाला नाही..!

एकीकडे राजकारणात उन्हाच्या वाफा असताना, दुसरीकडे पोलीस प्रशासन आणि निवडणूक अधिकारी मात्र बर्फासारखे शांत राहून आपले कर्तव्य बजावत होते. गावकरी, पोलीस आणि प्रशासन यांच्यात असा काही ताळमेळ होता की, एकाही ठिकाणी साधी बाचाबाची झाली नाही. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची! गुंडेवाडीची ही शांतता कोणाच्या विजयाची ‘नांदी’ आहे आणि कोणाच्या पराभवाचा ‘नगारा’, हे लवकरच स्पष्ट होईल!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!