येळकोट ! येळकोट! कामगारांच्या घामाचा बाजार मांडणाऱ्या धनदांडग्यांचा खंडेरायाच्या पायरीवर धिक्कार!

चंद्रशेखर पात्रे :
पुणे : जेजुरीचा खंडोबा म्हणजे अन्यायाचा निपात करणारा देव! पण आज त्याच मार्तंडाच्या साक्षीने, जेजुरीच्या पायऱ्यांवर महाराष्ट्राच्या औद्योगिक संस्कृतीला काळीमा फासणारा एक प्रकार घडला. स्वतःला जागतिक कीर्तीचे म्हणवून घेणाऱ्या ‘किर्लोस्कर फेरस’ कंपनीच्या मालकांनी ३०० कामगारांना रस्त्यावर फेकून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. ज्या हातांनी रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून कंपनीचं लोखंड सोन्यासारखं चकाकवलं, त्याच हातांत आज ‘भिख मागो’ आंदोलनाची पत्रावळ आली आहे. काय म्हणावं या निर्दयी आणि कृतघ्न कारभाराला?

मालकांची ‘फेरस’ वृत्ती आणि कामगारांची होरपळ..!
अहो, ३०० कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता, एका फटक्यात कामावरून काढून टाकणं हा कोणता न्याय? संक्रांतीचा सण समोर असताना, कामगारांच्या घरात सुख-समृद्धीचे तीळगूळ जाण्याऐवजी मालकांनी त्यांच्या पदरात अन्यायाचे निखारे टाकले आहेत. कामगारांनी ‘राष्ट्रीय मजदूर संघा’चं निशाण हाती धरलं, हाच काय तो त्यांचा गुन्हा? लोकशाहीत संघटना बांधणं हा जर गुन्हा असेल, तर मग मालकांनी आपल्या नावापुढचा लोकशाहीचा बुरखा आता फाडून फेकून द्यावा!
गुलामगिरीचा नवा अवतार!
या कंपनीच्या भिंतींच्या आड जे चालतं, ते ऐकून कोणाही सुसंस्कृत माणसाचं डोकं ठिकाणावर राहणार नाही.
कायद्याच्या रजा नाहीत, पगार वेळेवर नाही!
पीएफ आणि ईएसआयसीच्या पैशांचा पत्ता नाही!
जेवणापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत कामगारांमध्ये भेदाभेद..!
अरे, हे कारखाने चालवतायत की गुलामगिरीच्या नव्या पेढ्या? मालक आणि कंत्राटदार मिळून कामगारांच्या घामाची चोळी-लुगडं करतायत आणि वरून शहाणपणा शिकवतायत की “संघटना सोडा, तरच कामावर घेऊ!” ही तर शुद्ध दादागिरी आहे. कामगारांच्या पोटावर पाय देऊन त्यांना वाकवू पाहणाऱ्या या धनदांडग्यांची मस्ती आता उतरायलाच हवी!
खंडेराया, या पाषाणहृदयी मालकांना सद्बुद्धी दे!
आज जेजुरीच्या गडावर विदारक दृश्य होतं. शेकडो कामगार गडाच्या पायरीवर पोटासाठी झोळी पसरून बसले होते. भाविकांनी दिलेल्या दानातून ते आपली भूक भागवत नव्हते, तर ते या ‘किर्लोस्कर’ नावाच्या महाकाय अजगराचा निषेध करत होते. कामगार नेते सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा आक्रोश म्हणजे भविष्यातल्या एका मोठ्या ज्वालामुखीची नांदी आहे.
“लक्षात ठेवा, ज्यांच्या घामावर तुमचे महाल उभे आहेत, त्यांनाच भीक मागायला लावण्याचं पाप तुम्हाला कधीच सुखी ठेवणार नाही. खंडेरायाचा हा ‘येळकोट’ आता तुमच्या अन्यायाचा निकाल लावल्याशिवाय थांबणार नाही!”
लढा आता शेवटपर्यंत..!
सुनील शिंदे, सीताराम चव्हाण आणि हनुमंत मस्के यांनी फुंकलेलं हे रणशिंग आता शांत होणार नाही. कामगारांची एकजूट हीच त्यांची ताकद आहे. कंपनीने जर आपली अडमुठी भूमिका सोडली नाही, तर जेजुरीच्या पायऱ्यांवरून सुरू झालेलं हे आंदोलन कंपनीच्या गेटपर्यंत धडकल्याशिवाय राहणार नाही.
किर्लोस्करच्या कारभाऱ्यांनो, अजूनही वेळ गेली नाही! कामगारांना सन्मानाने परत घ्या, नाहीतर हा ‘भिख मागो’ आंदोलनाचा वणवा तुमच्या सत्तेच्या खुर्च्या जाळल्याशिवाय शांत होणार नाही!




























