पिणाऱ्याला ‘मार’ आणि बनवणाऱ्याला ‘हार’; राजमान्य दारूचा हाच खरा व्यभिचार..!

सध्याच्या या कलियुगात न्यायाचे तराजू इतके वाकडे झाले आहेत की, साक्षात चित्रगुप्तालाही आपला हिशोबाचा खर्डा फाडून टाकावा लागेल! कोणीतरी सोशल मीडियाच्या पारावर एक जळजळीत सवाल टाकलाय— “भारत हा असा एकमेव देश आहे का, जिथे दारू पिणाऱ्याला गुन्हेगार ठरवून पोलीस झोडपतात, पण तीच दारू बनवणाऱ्याला मात्र सरकार ‘लायसन्स’ देऊन त्याचे ओवाळणी घातले जाते?”

हे वाचले आणि आम्हाला आमच्या जुन्या दिवसांची आठवण झाली. हा केवळ विरोधाभास नाही, तर समाजाच्या काळजाला पडलेले हे एक मोठे भगदाड आहे.

१. ‘महसूल’ की ‘माणुसकी’?

सरकारला विचारले की, “बाबांनो, दारूची दुकाने का वाढवताय?” तर उत्तर येते- “राज्याचा महसूल वाढवायचा आहे!” काय हा अजब तर्क! ज्या पैशातून रस्ते बांधले जातात, ते पैसे जर गोरगरिबांच्या घराची राखरांगोळी करून आले असतील, तर त्या रस्त्यांवरून चालताना समाजाला पाझर फुटणार नाही का? एका बाजूला ‘व्यसनमुक्ती’च्या जाहिरातींवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते आणि दुसरीकडे नवीन मद्यनिर्मितीच्या कारखान्यांना ‘परवाना’ बहाल करताना यांच्या चेहऱ्यावर जे ‘बत्तीसी’ पाडणारे हसू असते, ते पाहून साक्षात कुबेरालाही लाज वाटेल.


॥ ‘बाटली’त अडकलेले सरकार ॥
  • दुटप्पीपणा: बाटलीवर लिहायचे “मद्यपान आरोग्यास हानिकारक” आणि गल्लीत दुकान उघडायला द्यायचे ‘परवाना’!

  • विकास की विनाश?: गरीबाच्या घराची चूल विझवून राज्याचा दिवा उजळणे, याला ‘विकास’ म्हणायचे की ‘नैतिक दिवाळखोरी’?

  • खरा गुन्हेगार कोण?: पिणारा हा समाजाचा ‘बळी’ आहे, पण ‘लायसन्स’ देऊन प्यायला लावणारी व्यवस्था ही खरी ‘गुन्हेगार’ आहे!

  •  सवाल: ज्या हातांनी तरुणांना रोजगाराचे पत्र द्यायला हवे होते, तेच हात आज मद्यनिर्मितीचे परवाने का वाटत आहेत?


२. ‘तळीराम’ विरुद्ध ‘ब्रॅन्डेड’ सावकार!

या व्यवस्थेतला विनोद पाहा— जो बिचारा दोन घोट पोटात गेल्यावर रस्त्यावर ‘नागीण डान्स’ करतो, त्याला पोलीस कोठडीत ढकलतात. पण जो ही ‘विशारी’ बाटलीबंद करून मोठ्या दिमाखात विकतो, त्याला सरकार ‘प्रतिष्ठित उद्योजक’ मानते! पिणाऱ्याच्या नशिबात पोलिसांची लाठी आणि बनवणाऱ्याच्या नशिबात सत्तेची गाठी, हाच आजचा ‘राजमान्य’ न्याय आहे.

३. जनतेनेही आता ‘आरसा’ पाहावा!

पण थांबा! केवळ सरकारला शिव्या घालून भागणार नाही. जनतेनेही आता अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. आपण म्हणतो सरकार परवाने का देते? पण ज्या दिवशी जनता मद्याच्या दुकानांकडे पाठ फिरवेल, त्या दिवशी कोणत्या मद्यसम्राटाची हिंमत होईल दुकान उघडण्याची?

सर्वात मोठा विनोद तर निवडणुकीच्या काळात घडतो! पाच वर्षे सरकारला दारूवरून शिव्या घालणारी जनता, मतदानाच्या आदल्या रात्री जेव्हा ‘क्वाटर’वर आपले भविष्य विकते, तेव्हा लोकशाहीचा खरा पराभव होतो. “रात्रीची नशा आणि सकाळी मतदान” हाच जर आपला शिरस्ता असेल, तर उद्याच्या पिढीला आपण कोणते तोंड दाखवणार?

शेवटचा बोळा!

जोपर्यंत सरकार आपल्या ‘महसुलाच्या नशे’तून बाहेर पडत नाही आणि जनता स्वतःच्या विवेकापेक्षा ‘बाटली’ला जवळ करते, तोपर्यंत हे चक्र थांबणार नाही. “दारू पिणे हे वैयक्तिक पाप असू शकते, पण दारू पाजणे हा कायदेशीर धंदा असणे आणि जनतेने तो लाचारीने स्वीकारणे हा समाजावरचा सर्वात मोठा क्रूर विनोद आहे!”


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!