यह तो सिर्फ ट्रेलर है’ म्हणत रावेतच्या फर्निचर मॉलवर गोळीबार करणाऱ्या बिश्नोई गँगच्या ३ जणांना उत्तराखंडमधून अटक
पिंपरी-चिंचवड गुंडा विरोधी पथकाची धडक कारवाई
चंद्रशेखर पात्रे :
पिंपरी : “यह तो सिर्फ ट्रेलर है…” अशी धमकी देत रावेत येथील ‘ए जे फर्निचर मॉल’वर अंधाधुंद गोळीबार करून परिसरात दहशत माजविणाऱ्या तीन आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने उत्तराखंडमधून बेड्या ठोकल्या आहेत. एका मोठ्या व्यापाऱ्याला धमकवण्यासाठी थेट बिश्नोई गँगच्या नावाने हा गोळीबार करण्यात आला होता. या धडक कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
मागील शुक्रवारी रात्री रावेत येथील प्रसिद्ध ‘ए जे फर्निचर मॉल’वर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक धाव घेत अंधाधुंद तब्बल ६ राऊंड गोळ्या झाडल्या होत्या. भरवस्तीत झालेल्या या थरारक गोळीबारामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. हा गोळीबार कुख्यात अराजू बिश्नोई याच्याशी संबंधित असलेल्या गुंडांनी केल्याचे तपासात समोर आले. आरोपींचा माग काढत गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने थेट उत्तराखंड गाठले आणि तिथून तिघांना शिताफीने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रवीण राम निवासे (वय २३, रा. हरियाणा), पंकज कुलदीप रहाठी (वय २१, रा. हरियाणा) आणि सागर अजय पाल (वय २१, रा. हरियाणा) या तिघांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना आज रात्री उशिरापर्यंत पुण्यात आणण्यात येणार आहे. या गोळीबारामागे मुख्य सूत्रधार कोण आहे आणि बिश्नोई गँगचे पुण्यात आणखी कुठे जाळे पसरले आहे का, या दृष्टीने पोलीस कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी काही मोठे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची दाट शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.


























