कोंढव्यात काँग्रेसची ‘कडाडणारी’ गर्जना! हसनभाईंच्या पुण्याईचे ‘कमेला’मध्ये मोहोळ उठले!
मते मागण्यासाठी नव्हे, तर बापाच्या सेवेची पावती घेण्यासाठी मोहसीन शेख मैदानात! ‘अल कुरेश’ संघटनेचा काँग्रेसला वज्रनिर्धार पाठिंबा!

पुणे | पुण्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, पण कोंढव्याच्या भूमीत आज जे घडलं, त्याला राजकारण म्हणण्यापेक्षा ‘ऋणानुबंधाचा सोहळा’ म्हणणंच जास्त सयुक्तिक ठरेल! निवडणूक येते आणि जाते, लोक आश्वासनांची खैरात करतात, पण एखाद्या कुटुंबाने रक्ताचं पाणी करून केलेल्या समाजसेवेची पावती जेव्हा जनता स्वतःहून देते, तेव्हा विरोधकांचे धाबे दणाणल्याशिवाय राहत नाहीत. प्रभाग क्रमांक १९ मध्ये आज हेच चित्र पाहायला मिळालं. पुणे अल कुरेश व्यापारी संघटनेने काँग्रेसच्या चारही उमेदवारांना आपला ‘एकेरी’ नव्हे, तर ‘वज्रमुठीचा’ पाठिंबा जाहीर करून निवडणुकीचा निकाल जणू आजच लिहून टाकला आहे!

बापाची पुण्याई आणि लेकाचा संघर्ष! व्यासपीठावर तरुण तडफदार नेतृत्व मोहसीन शेख उभे राहिले आणि वातावरण भारावून गेलं. डोळ्यांत आसवं होती, पण काळजात बापाचा वारसा होता! पै. हसन शेख यांनी आयुष्यभर अल कुरेश समाजासाठी काय केलं, हे सांगायला आज शब्दांची गरज उरली नाही. प्रशासकीय अडथळे असोत की व्यापाऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न, हसनभाई नेहमीच ‘ढाल’ बनून उभे राहिले. आज त्यांच्याच निधनानंतर, त्यांचा हा वारसा मोहसीन शेख तितक्याच ताकदीने पुढे नेत आहेत.
“दुःख विकून सत्ता मिळवायची नाही!” सभेत मोहसीन शेख यांनी काढलेले उद्गार अत्रेंच्या भाषेत सांगायचे तर ‘काव्यात्म आणि कणखर’ होते. “माझ्या वडिलांनी मला राजकारण नाही, माणुसकी शिकवली!” असं म्हणताना जेव्हा मोहसीन यांचा कंठ दाटून आला, तेव्हा समोर बसलेल्या प्रत्येक व्यापाऱ्याच्या डोळ्यांत पाणी होतं. पण ही हतबलता नव्हती, तर ती विश्वासाची ताकद होती. “बापाच्या आठवणींचा वापर मतांसाठी करणार नाही, संघर्ष करून विश्वास जिंकेन,” या त्यांच्या शब्दांनी केवळ सभाच जिंकली नाही, तर विरोधकांच्या छातीत धडकी भरवली!
राजकीय समीकरणे धडाधड बदलली! कमेला बिल्डिंग परिसरात झालेली ही सभा म्हणजे केवळ राजकीय मेळावा नव्हता, तर तो कृतज्ञतेचा महासागर होता. अल कुरेश व्यापारी संघटनेने जेव्हा ‘एकमुखी पाठिंबा’ जाहीर केला, तेव्हा कोंढव्याच्या राजकीय गणितांचे कागद फाडून हवेत उडाले. तस्लिम शेख यांच्यासह काँग्रेसच्या चारही उमेदवारांचे पारडे आता इतके जड झाले आहे की, समोरच्यांना आता केवळ ‘धुळवड’ पाहावी लागणार, हे स्पष्ट दिसत आहे.
ठसका: ज्यांनी लोकांसाठी घाम गाळला, त्यांच्यासाठी जनता रक्त आटवायला तयार असते, याचा प्रत्यय आज कोंढव्यात आला. पै. हसन शेख यांची सेवा आणि मोहसीन शेख यांचा संयम ही काँग्रेसची आजची सर्वात मोठी ‘रसद’ ठरली आहे. आता विरोधकांनी कितीही आदळआपट केली, तरी कोंढव्याच्या या ‘कुटुंबा’ला रोखणं कठीणच नव्हे, तर अशक्य आहे!































