पॉईंट टू बी नोटेड..! कौसर बागेत काँग्रेसचा ‘हात’ जोरात; विरोधकांच्या तोंडचं पळालंय पाणी अनं पोटात गोळा!


पॉईंट टू बी नोटेड..!

कौसर बागेत काँग्रेसचा ‘हात’ जोरात ; विरोधकांच्या तोंडचं पळालंय पाणी अनं पोटात गोळा!

 

अहो, राजकारण म्हणजे काय? तो काही येऱ्या-गबाळ्याचा खेळ नव्हे.! पण सध्या पुण्याच्या कौसर बागेत जे काही सुरू आहे, त्याला युद्ध म्हणावं की विरोधकांची ‘फजिती’, हेच कळेनासं झालंय! सगळीकडे एकच चर्चा— “अहो, काँग्रेसची हवा आहे!” पण मी म्हणतो, ही फक्त हवा नाही, हा तर विरोधकांच्या तंबूचे वासे फिरवणारा ‘तुफान’ आहे!

नकोत तेच ते चेहरे; आता हवा नवा बदल.!

अहो, किती दिवस तेच ते चेहरे बघायचे? तीच ती गुळगुळीत आश्वासनं आणि तेच ते पोकळ दावे! जनतेला आता तोच तोचपणा पाहून ‘राजकीय मळमळ’ होऊ लागली आहे. कौसर बागेतल्या गल्लीत फिरताना एक तरुण मतदार तावातावानं म्हणाला, “अत्रे साहेब, टीव्हीवरचा तोच तोच कार्यक्रम आपण जसा बदलतो, तसंच आता राजकारणातलं हे जुनं ‘कॅलेंडर’ बदलायची वेळ आली आहे!”

आणि इकडे एक ‘पॉईंट टू बी नोटेड‘!
जनतेला यंदा काहीतरी ‘वेगळं’ करून दाखवायचं आहे. ज्यांनी वर्षानुवर्षे खुर्च्या उबवल्या, ज्यांनी फक्त आपल्याच चेहऱ्याचे फ्लेक्स लावून शहर विद्रुप केलं, त्यांना आता घरी बसवण्याचा विडा जनतेनं उचलला आहे. यंदा ‘चेहरा’ नाही, तर ‘बदल’ महत्त्वाचा आहे, हे विरोधकांनी विसरू नये!
अंतर्गत कलहाचा राडा अनं काँग्रेसची चंगळ.!

आता तिकडे बघा—महायुती नावाचा एक मोठा ‘प्रयोग’ सुरू आहे. कुणी इकडून आलंय, कुणी तिकडून पळालंय! भाजप आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत भांडणांनी तर कळस गाठलाय. यांच्या घरात विस्तव पेटलाय आणि त्या विस्तवावर काँग्रेस आपलं विकासाचं ‘भाकरी’ भाजून घेताना दिसतेय. इकडे दोन बोके भांडतायत आणि तिकडे काँग्रेसची ही ‘लेडीज पॅनेल’ची फौज मतदारांच्या मनात घर करतेय!

सेक्युलरवादाची ‘मोट’ आणि विकासाचा ‘हात’!

दुसरा ‘पॉईंट टू बी नोटेड’ असा की, काँग्रेसने यंदा मुस्लीम आणि दलित मतांची अशी काही घट्ट वीण विणली आहे की, तिला तोडणं म्हणजे लोखंडाचे चणे चघळण्यासारखं आहे. कौसर बागेच्या चहाच्या टपरीवर “आम्ही कोणालाही मतदान करू, पण विकासाचा हात सोडणार नाही,” असा सूर उमटतोय. हा ‘सेक्युलर चेहरा’ म्हणजे केवळ मुखवटा नाही, तर तो एक विश्वासाचा धागा आहे. तोच तोच चेहरा पाहून कंटाळलेली जनता आता काँग्रेसच्या या ‘नव्या जोमाच्या’ हाताला बळकटी द्यायला सज्ज झाली आहे.

शेवटचा टोला:

अहो, ज्यांच्याकडे नवीन काही सांगण्यासारखं उरलेलं नाही, त्यांनी आता गाशा गुंडाळलेलाच बरा! कौसर बागेत यंदा ‘हाता’चा असा काही दणका बसणार आहे की, निवडणूक निकालानंतर अनेकांना ‘राजकीय अज्ञातवासात’ जावं लागेल. जनतेला बदल हवा आहे, आणि हा बदल म्हणजे काँग्रेसचा ‘विजय’ आहे!

विरोधकांनो, आता तरी सावध व्हा; कारण कौसर बागेत आता ‘हात’ सुसाट आहे आणि तुमची मात्र पार ‘फाट’ आहे!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!