मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांना आता तरी लाज वाटू दे.! सादिक कपूर आत्महत्या प्रकरणात राजकीय गिधाडांचा वावर !

पुणे | ज्या मातीत माणुसकी फुलायला हवी, तिथे आज राजकारणाचे विषारी तण माजले आहे! सादिक कपूर यांच्या आत्महत्येने आधीच पुण्याच्या वातावरणात सुतक पसरलेले असताना, आता या प्रकरणाला जो ‘राजकीय’ रंग दिला जातोय, तो पाहून अंगाचा तिळपापड झाल्याशिवाय राहत नाही. अहो, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं आम्ही पाहिली होती, पण मृताच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी ही नवी ‘राजकीय जमात’ कुठून पैदा झाली?
दोन दिवसांची मेहेरबानी की शिक्षा?
फारुक इनामदार यांना प्रचारासाठी फक्त दोन दिवसांची मुभा मिळाली आहे. पण या दोन दिवसांत त्यांनी प्रचारापेक्षा प्रकरणाला ‘राजकीय वळण’ देण्याचा जो काही अश्लाघ्य प्रयत्न केला, त्याचा पंचनामा सादिक कपूर यांच्या मुलाने, मुलीने आणि त्यांच्या वकिलांनी भरचौकात केला आहे. कोर्टाने दिलेली सवलत ही कामासाठी असते, कुणाच्या तरी जखमेवर मीठ चोळण्यासाठी नसते, याचे भान या महाशयांना राहिलेले दिसत नाही!
मेलेल्या माणसाचं चरित्र हनन..? काय चाललंय काय?
सादिक कपूर आज आपल्यात नाहीत. जे माणूस स्वतःचं अस्तित्व संपवून टाकतं, त्याच्या वेदनेची दाहकता किती असेल याची कल्पनाच केलेली बरी. पण इथे तर वेगळंच सुरू आहे! इनामदार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पीडित वडिलांच्या आत्महत्येला राजकीय रंग देण्याचा जो घाट घातला, त्यावर कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. “मेलेल्या व्यक्तीचे चरित्र हनन करण्याचा हा प्रयत्न आहे,” असा टाहो पीडित कुटुंबाने फोडला आहे. अरे, किमान मृत्यूचं तरी गांभीर्य ठेवा! राजकारण करायला अख्खं आयुष्य पडलंय, पण एका गेलेल्या माणसाच्या अब्रूशी खेळताना तुमचे हात कसे थरथरत नाहीत?
वकिलांचा कडाका! या अन्यायाविरुद्ध आता कायद्याची फौज उभी ठाकली आहे. पीडित कुटुंबाची बाजू मांडण्यासाठी ॲड. साजिद शाह, ॲड. वाजिद खान आणि ॲड. हबीब खान यांनी कंबर कसली आहे. “आमच्या अशिलाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आणि त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,” असा पवित्रा या त्रिमूर्तींनी घेतला आहे.
आमचा सवाल… आमचा सवाल थेट आहे—एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, तिथे सहानुभूतीचे दोन शब्द बोलण्याऐवजी आरोपांच्या फैरी झाडणे, ही कोणती संस्कृती? सादिक कपूर यांच्या आत्महत्येचा तपास निष्पक्ष व्हायला हवाच, पण त्या आडून जे कोणी ‘राजकीय पोळ्या’ भाजण्याचा प्रयत्न करत असतील, त्यांनी एक लक्षात ठेवावं… जनतेचा न्याय निवाडा हा देवाच्या घरापेक्षाही कडक असतो!
बघूया, आता या प्रकरणातील ‘सत्य’ बाहेर येतंय की राजकारणाच्या धुराड्यात तेही गुदमरून जातंय!



























