अमळनेर पोलिसांची सुस्ती , पण वकिलांची ‘तीक्ष्ण’ बुद्धी.! जादूटोण्याने गंडवणाऱ्या टोळीला न्यायालयाचा तडाखा ; ११ लाखांच्या फसवणुकीचे ‘पिल्लू’ अखेर बाहेर !

अमळनेर : अहो, कलियुगात देव तारील की नाही माहीत नाही, पण हे ‘भामटे’ मात्र नक्कीच मारतील! मंत्राच्या जोरावर नोटांचे बंडल दुप्पट करण्याचा अघोरी प्रयोग अमळनेरच्या मातीत झाला आणि एका कष्टकरी फळविक्रेत्याचे ११ लाख रुपये धुरासारखे हवेत विरले. पण म्हणतात ना, ‘कायद्याचे हात लांब असतात’, तसेच ते ‘धारदार’ही असतात, याचा प्रत्यय अमळनेरच्या मेहरबान कोर्टाने दिला आहे.
जादूटोण्याचा ‘फिल्मी’ बनाव
लोहार गल्लीतील फळविक्रेते आसिफ छोटू बागवान यांना सात जणांच्या टोळीने गाठले. “आम्ही तुमचे पैसे दुप्पट करून देतो,” अशी भुलथाप मारून त्यांना जाळ्यात ओढले. गरिबाने रक्ताचे पाणी करून जमवलेली पुंजी आणि पत्नीचे सोने गहाण ठेवून जमवलेले ११ लाख रुपये या भामट्यांच्या समोर ठेवले. मग सुरू झाला ‘विधी’चा खेळ! “हा विधी जीवघेणा आहे, तुम्ही दुसऱ्या खोलीत जा,” असे सांगून घरात धुराचे लोट उठवले गेले. जॅकेटमधून खेळण्यातल्या नोटा काढल्या, वर-खाली खरी नोट लावली आणि आसिफ यांना गंडवून हे ‘जादूगार’ पसार झाले.
पोलिसांची ‘ढिम्म’ वृत्ती अन् वकिलांचा ‘युक्तिवाद’
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आसिफ यांनी पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले, पण तिथल्या ‘खाकी’ वर्दीला कदाचित या गरिबाच्या आसवांचा गंध आला नाही. तक्रार देऊनही कारवाई होईना, तेव्हा अॅड. सलमान ब. शाह, अॅड. साजिद ब. शाह आणि अॅड. जुनेद शेख या त्रिमूर्तींनी कायद्याचे शस्त्र उपसले. त्यांनी मेहरबान कोर्टात ‘खाजगी खटला’ दाखल केला. या वकिलांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने आणि धारदार युक्तिवादाने न्यायालयाला विचार करायला भाग पाडले.
न्यायालयाचा दणका !
मेहरबान कोर्टाने वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शेख मुजाहिद, अकबर मेवाती, प्रकाश गायकवाड, नंदू जाधव यांच्यासह सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
खरे तर अशा भामट्यांना भर चौकात उभे करून त्यांच्याच मंत्रांनी त्यांना गायब करायला हवे होते! पण कायद्याने त्यांना आता जे जेरबंद केले आहे, तोच खरा ‘चमत्कार’ आहे. कष्टकऱ्याच्या घामाचा पैसा लुटणाऱ्या या पाखंडी टोळीला आता तुरुंगाची भाकरीच तोडावी लागणार, हे नक्की!




























