खिशात ‘जीएसटी’, गाडीला ‘रोड टॅक्स’ अन् नाक्यावर ‘टोलचा फास’ – हा लोकशाहीचा रस्ता की लूटशाहीचा महामार्ग?


खिशात ‘जीएसटी’, गाडीला ‘रोड टॅक्स’ अन् नाक्यावर ‘टोलचा फास’ – हा लोकशाहीचा रस्ता की लूटशाहीचा महामार्ग?

अहो, आजकाल या देशात सामान्य माणसाने श्वास घेतला तरी त्यावर ‘ऑक्सिजन टॅक्स’ लावायचा की काय, अशी भीती वाटायला लागली आहे! आमचे राघव चड्ढा ओरडून सांगतायत, “टोल बंद करा!” आणि आम्ही म्हणतो, चड्ढाजी, तुम्ही उशिरा बोललात पण काय ‘लाख मोलाचं’ बोललात! हा टोल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जनतेच्या खिशात हात घालून केलेली अधिकृत ‘वाटमारी’ आहे!

एकाच लग्नात दोनदा हुंडा?

अहो, गाडी शोरूममधून बाहेर काढायच्या आधी सरकार ‘जीएसटी’चा घास घेतं. मग ती गाडी रस्त्यावर धावणार म्हणून ‘रोड टॅक्स’चा हप्ता भरला जातो. बरं, गाडी रिकामी तर चालणार नाही, म्हणून त्यात तेल ओतलं की तिथे ‘इंधन टॅक्स’चा डोंगर उभा असतो. म्हणजे पोरगा जन्माला यायच्या आधीच त्याच्या लग्नाची आणि म्हातारपणाची सोय सरकारने टॅक्सच्या रूपाने करून ठेवली आहे. मग आता हा ‘टोल’ नावाचा तिसरा डोळा कोणासाठी उघडलाय? हा तर एकाच लग्नात दोनदा हुंडा मागण्याचा प्रकार झाला!

रस्ते की मरणाचे फास?

रस्त्यांची अवस्था बघितली तर असं वाटतं की, आपण चंद्रावरच्या खड्ड्यांतून गाडी चालवतोय की काय? ‘समृद्धी’चे स्वप्न दाखवून सामान्य माणसाच्या आयुष्याची ‘माती’ करायची आणि वरून त्याच खडबडीत रस्त्यावरून जाण्यासाठी शंभर-दोनशे रुपयांचा दंड (टोल) आकारायचा? हा कोणता न्याय?

गाडीवर कर: दिलेला आहे!

रस्त्यावर कर: भरलेला आहे!

पेट्रोलवर कर : ओतलेला आहे!

मग टोल: हा काय तुमच्या घराचा उंबरा आहे का रे, ओलांडला की पैसे द्यायला?

लोकशाहीचा ‘टोल’वाटमारी!

जनतेच्या पैशातून रस्ते बांधायचे आणि त्याच जनतेला ‘रस्ता वापरला’ म्हणून लुबाडायचं, यालाच जर तुम्ही ‘विकास’ म्हणत असाल, तर मग ‘विनाश’ कोणाला म्हणायचं? हा तर साक्षात ‘मोगलाई’चा अवतार आहे. लोकशाहीत जनता मालक असते, पण इथे तर मालकालाच आपल्या हक्काच्या रस्त्यावर ‘दरवाजा’ लावून अडवलं जातंय!

“रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हे शोधता शोधता माणसाचं कंबरडं मोडतंय आणि टोल नाक्यावर खिसा फाटतोय!”

आमचा रोखठोक इशारा!

सरकारला आमचं सांगणं आहे, ही ‘लूटशाही’ आता थांबवा. जर गाडी विकताना आणि इंधन भरताना तुम्ही टॅक्स घेताय, तर टोल नाके हे उद्याच्या उद्या ‘इतिहास’ जमा झाले पाहिजेत. नाहीतर जनता तुम्हाला असा ‘टोल’ लगावेल की तुमची सत्तेची गाडी पुन्हा कधीच रुळावर येणार नाही!

चड्ढाजी, तुमच्या या सुरात आम्ही आमचा ‘ आवाज मिसळतोय – कारण हा प्रश्न फक्त पैशाचा नाही, तर सर्वसामान्यांच्या स्वाभिमानाचा आणि हक्काचा आहे!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!