पाणी कपातीची टांगती तलवार : महापालिका आयुक्तांच्या टेबलावर ‘प्रलया’चा अहवाल !


पाणी कपातीची टांगती तलवार : महापालिका आयुक्तांच्या टेबलावर ‘प्रलया’चा अहवाल !

पुणे : आधीच पुण्याच्या हवेत इतका कोरडेपणा आहे की, माणसाने हसावे म्हटले तरी ओठ फाटतात, त्यात आता हवामान खात्याने ‘अल-निनो’ नावाचे कुठले तरी अस्मानी अरिष्ट पुण्याच्या उरावर आणून ठेवले आहे. वरुणराजाने यंदा ‘दांडी’ मारण्याचे ठरवल्यामुळे खडकवासल्याचा पाणीसाठा आता मुंग्यांच्या पावलाने खर्च करावा लागणार आहे. परिणामी, महापालिकेच्या दरबारी आता १५ टक्के पाणीकपातीचा जो काही ‘कडू काढा’ तयार झाला आहे, तो पुणेकरांना पाजण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांच्या टेबलावर अहवाल रूपाने फणा काढून बसला आहे!

प्रशासनाने दिलेले पर्याय पाहून तर साक्षात बृहस्पतीची ही मती गुंग व्हावी. पहिला पर्याय म्हणतो, ‘कपात टाळा’. अहो, हे म्हणजे लग्नात जेवण नाही पण पाहुणे वाढवा, असे म्हणण्यासारखे आहे! पुण्याच्या चढ-उताराच्या भूगोलामुळे पर्वतीवर राहणाऱ्या पुणेकराला नळातून पाणी मिळण्याऐवजी फक्त गरम वाफाच मिळतील आणि खाली राहणाऱ्यांच्या अंगणात विनाकारण गंगा वाहू लागेल.

दुसरा पर्याय म्हणजे आठवड्यातून एक दिवस पाणी बंद! पुण्यात एकदा पाणी बंद झाले की, नळाचे ‘नारदमुनी’ व्हायला वेळ लागत नाही. दुसऱ्या दिवशी प्रेशर वाढवण्यासाठी एवढे पाणी लागते की, कपातीचा मूळ उद्देशच ‘खडकवासल्यात’ बुडून जातो. त्यात पुन्हा दोन दिवस नळाला पाणी येण्याऐवजी जो काही केविलवाणा आवाज येतो, तो ऐकून एखादा संगीतकारही आत्महत्त्या करेल!

तिसरा पर्याय ‘दिवसाआड’ पाणी! हा तर पुणेकरांच्या संयमाचा अंतच. म्हणजे आज आंघोळ केली, की उद्या फक्त देवासमोर आचमन करूनच समाधान मानावे लागणार. प्रशासनाला वाटते की तक्रारी कमी येतील, पण पुणेकरांच्या जिभेला जेवढी धार आहे, तेवढी नळाच्या धारेला नसल्यावर काय अनर्थ होईल, याची कल्पनाच केलेली बरी.

आता चेंडू आयुक्तांच्या कोर्टात आहे. ते ‘राम’ पावणार की पुणेकरांना ‘डोईवर हंडा’ घेऊन फिरण्याचे भाग्य लाभणार, हे लवकरच कळेल. तोपर्यंत ‘पाणी जपून वापरा’ असा उपदेश देणारे पालिकेचे फलक वाचून पुणेकरांनी आपला घसा ओला ठेवावा, इतकेच!

प्रेस मीडिया लाईव्ह

#PuneWaterCut #PuneNews #MuniCorpPune #WaterScarcity # #KhadakwaslaDam #PuneCitizen #MaharashtraNews #PressMediaLive #पाणीकपात #पुणेकर #महापालिका #खडकवासला #पाणीबचत


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!