लावालावी करायची तर झाडांची करा, माणसांची नको..!
नमस्कार वाचकहो..!
आपल्या महाराष्ट्राला संतांची, विद्वानांची आणि मोठ्या मनाच्या माणसांची भूमी म्हणतात. पण आजकालच्या दिवसांत जर आमच्या या लाडक्या समाजात कोणता खेळ गल्लीबोळापासून कट्ट्यांपर्यंत सगळ्यात जास्त लोकप्रिय झाला असेल, तर तो म्हणजे **‘लावलावी करणे’**! या खेळाचं वैशिष्ट्य असं की, यासाठी कोणतीही फी भरावी लागत नाही की वयाची अट नसते.

अहो, समाजात अशी काही हुशार मंडळी आहेत ज्यांना पाहून वाटतं की, माणसांमाणसांत लावलावी करण्यासाठी कोणतीही मोठी पदवी घेण्याची गरज नसते! हे ज्ञान तर लोकांना गाऊन-वाजून उपजतच मिळतं. एखादी मोठी पदवी हातामध्ये नसली, तरी या कलेत अनेक जण थेट महाविद्वान असल्यासारखेच वावरत असतात आणि स्वतःचा सल्ला मोफत वाटत असतात.
या कलेचे काही साधे आणि सोपे नियम असतात. सकाळी चहाच्या कपावर किंवा संध्याकाळी कट्ट्यावर मित्राच्या कानात दुसऱ्याबद्दल हळूच काहीतरी फुंकायचं की, “भाऊ, तो तुझा मित्र तुझ्याबद्दल म्हणत होता की, तुझा स्वभाव जरा तापटच आहे आणि तू विश्वास ठेवण्याजोगा नाहीस!” की झाला समोरचा गृहस्थ सुरू! एकदा का पहिली ठिणगी पडली, की मग आपले हे पदवी नसलेले ‘कलाकार’ बाजूला होऊन अगदी शांतपणे, चेहऱ्यावर निष्पाप भाव आणून कोपऱ्यात उभे राहतात. दोघं भांडायला लागली की हेच पुढे होऊन म्हणतात, “अहो, भांडू नका हो! शांत घ्या!” आणि मनात म्हणतात, अजून दोन वाक्य बोला की
पण वाचकहो, ही लावलावी जेव्हा आमच्या सुखी संसारात शिरते, तेव्हा मोठा अनर्थ होतो. शांत चाललेल्या संसारात एखादी अशीच हौशी व्यक्ती येते आणि हळूच घरच्यांच्या कानात सांगते, “तुमची घरची माणसं दुपारी तुमच्या नावाने शेजाऱ्यांकडे काहीतरी वाईट बोलत होती!” झालं! मग त्या घरात जी ‘कुरुक्षेत्राची’ मालिका सुरू होते, तिला टीव्हीवरचे दिग्दर्शकही लाजतील! कुठलीही खातरजमा न करता केवळ तिसऱ्या माणसाने कानात सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळे, वर्षानुवर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आणि प्रेमळ कुटुंबं एका झटक्यात हवेत उडतात. घरात लागलेली ही आग दुरून बघण्यातच या लावलावी बहाद्दरांना एखादा विनोदी सिनेमा पाहिल्यासारखा आनंद मिळतो!
संसाराप्रमाणेच या रोगाचा मोठा फटका बसतो तो पवित्र अशा **मैत्रीच्या नात्याला**! “तुझा तो जिगरी दोस्त आहे ना, तो काल दुसऱ्या ग्रूपसोबत बसून तुझ्याच नावाने खडे फोडत होता,” अशी एक लहानशी लावलावी दोन जीवलग मित्रांना एकमेकांचे शत्रू बनवायला पुरेशी ठरते. जो मित्र सुख-दुःखात एकत्र धावून यायचा, त्याच्याच कडे संशयाने पाहिले जाऊ लागते. केवळ एका ऐकीव वाक्यामुळे वर्षांची मैत्री क्षणात विरघळून जाते, आणि बिचारा माणूस विचार करतो, “आता याच्याशी बोलायचं की नाही?”
पूर्वीच्या काळी माणसं एकमेकांच्या सुखासाठी एकत्र यायची, आता मात्र केवळ अशा ऐकीव गोष्टीवरून माणसांची मनं दुरावतात. आज गळ्यात गळे घालून फिरणारे मित्र उद्या एकमेकांचे तोंड पाहायचे बंद करतात, याला काय म्हणावे?
म्हणूनच शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की, माणसांमाणसांत भांडण लावणारी ही फालतू ‘लावलावी’ करण्यासाठी बुद्धी खर्च करण्यापेक्षा, निसर्गाला समृद्ध करणारी झाडांची ‘लावलावी’ करावी! माणसांची डोकी फिरवण्याऐवजी मातीत छानशी रोपे लावावीत. झाडे लावली तर ती मोठी होऊन समाजाला सावली देतील, आंबे-फळे देतील. पण माणसांची लावलावी केली तर फक्त संशयाचे काटेच हाती येतील आणि स्वतःचेच कपाळ मोकळे होईल.
जोपर्यंत ऐकणारे कान समाजात जिवंत आहेत, तोपर्यंत लावणारे ओठ तयारच राहणार. त्यामुळे कोणी तुमच्या कानात काही सांगायला आलं, तर त्याला तिथेच थांबवा आणि म्हणा, **”थांब भाऊ, आपण त्यालाच फोन लावून विचारूया!”** बघा, पुढच्याच क्षणी तो लावलावी करणारा माणूस “नाही नाही, माझं जरा काम आहे…” असं म्हणून तिथून असा पळ काढेल की धावपटूही मागे पडेल!


























