कपात कटिंग अन् कामात सेटिंग… हीच तर आहे जगण्याची खरी बॅटिंग..!


कपात कटिंग अन् कामात सेटिंग… हीच तर आहे जगण्याची खरी बॅटिंग..!

नमस्कार मंडळी..!

ह्या भूतलावर अशा काही जीवघेण्या गोष्टी आहेत ज्यांच्याशिवाय आपल्या माणसाचं पान अजिबात हलत नाही! पहिली गोष्ट म्हणजे कडक ‘कटिंग चहा’, दुसरी गोष्ट म्हणजे कुठेही न अडकणारं ‘तगडं सेटिंग’ आणि या दोन्हींना स्वर्गीय सुख देणारी तिसरी गोष्ट म्हणजे अंगठ्यावर चुना चोळून गालात दाबलेली ‘गायछापची किक’!

खरा अस्सल चहाप्रेमी टपरीवर जाऊन उजव्या हाताची दोन बोटं हवेत नाचवत जेव्हा म्हणतो—”भाऊ, एक कटिंग!” आणि गालात गायछापची किक बसते, तेव्हा जगाच्या अर्थकारणापासून ते गल्लीतल्या सुख-दुःखांपर्यंतच्या सर्व विषयांवर जी सुंदर चर्चा रंगते, ती मोठ्या वातानुकूलित सभागृहातही कधी रंगणार नाही!

आता वळूयात दुसऱ्या महामंत्राकडे—तो म्हणजे ‘सेटिंग’! आजच्या काळात काम कोणतेही असो, तिथं योग्य ‘सेटिंग’ असणं फार महत्त्वाचं आहे बघा! पण इथं ‘सेटिंग’ म्हणजे कोणताही गैरप्रकार किंवा बेकायदेशीर लाचलुचपत मुळीच नाही, तर आपल्या कामातील सुटसुटीतपणा, उत्तम जनसंपर्क आणि कायदेशीर चौकटीत राहून केलेला व्यावहारिक सुसंवाद असा आहे. आजकालच्या धावपळीच्या युगात वेळेवर काम करून घेण्यासाठी कुठेतरी कायदेशीर व्यवस्था लावावीच लागते, हा या जीवनशैलीचा एक अपरिहार्य नियम बनला आहे.

माणूस आजारी पडला की हॉस्पिटलमध्ये उपचारांचे मोठेमोठे कागद समोर येतात. अशा वेळी “तिथं काय सेटिंग आहे?” या एकाच विचाराने रुग्णाचा अर्धा आजार आणि नातेवाईकांचे कायदेशीर टेन्शन पळून जाते. मुलाला चांगल्या नामांकित शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून द्यायचा असेल, तर केवळ गुणांचे रिपोर्ट कार्ड दाखवून भागत नाही. तिथेही नियमांच्या अधीन राहून मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशासाठी काही कायदेशीर ‘सेटिंग’ किंवा सुसंवाद पाहावाच लागतो.

सामान्यांनी बँकेत गृहकर्ज किंवा उद्योगधंद्यासाठी कर्ज काढायचं म्हटलं, की कागदपत्रांचे डोंगर उभे राहतात. पण तिथं जर बँकेच्या नियमांच्या परिघात राहून एखाद्या अधिकाऱ्याशी तुमचं ‘तगडं सेटिंग’ म्हणजेच योग्य कागदपत्रांची पूर्तता असेल, तर फाईल कशा कायदेशीर मार्गाने पटापट मंजूर होते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. कधी गाडी नो-पार्किंगमध्ये उचलली गेली, की तिथं प्रशासकीय अधिकाऱ्यांशी कायदेशीर वाद घालण्यापेक्षा, चूक मान्य करून अधिकृत दंडाची पावती फाडणे म्हणजेच ‘जागीच कायदेशीर सेटिंग’ करणे, हे पाकिटाला आणि वेळेला जास्त आराम देतं.

निवडणुका जवळ आल्या की खरी कमाल पडद्यामागे चालणाऱ्या पक्षांतर्गत ‘सेटिंग’चीच असते. कोण कोणत्या पक्षात जाणार, कोणाला कोणती उमेदवारी मिळणार, हे सगळे खेळ संविधानाच्या चौकटीत राहून केवळ तगड्या राजकीय ‘सेटिंग’वरच चालतात. ज्याचं गणित पक्कं, त्याचाच विजय नक्की!

बरं, बाहेरचं जग बाजूला ठेवा, माणसाला सुखाने संसार करत असताना सुद्धा ‘अंतर्गत सेटिंग’ अत्यंत महत्त्वाचं असतं बघा! गृहमंत्री म्हणजेच धर्मपत्नीचा मूड कधी खराब होईल याचा नेम नसतो. त्यामुळे स्वयंपाकघरापासून ते सासरच्या मंडळींना खुश ठेवण्यापर्यंत नवऱ्याला जे काही अंतर्गत ‘नियोजन’ करावं लागतं, त्यालाच आपण ‘संसारातलं सुंदर सेटिंग’ म्हणतो. हे कोलमडलं, तर मग ‘कटिंग’ चहा मिळणंही दुरापास्त होतं!

ज्याप्रमाणे कटिंग चहा आणि गायछापच्या किकशिवाय टपरीवरची चर्चा रंगत नाही, त्याचप्रमाणे आयुष्याच्या प्रवासात व्यावहारिक ताळमेळ राखल्याशिवाय कुठलीही गाडी पुढे सरकत नाही. आपण तर अत्यंत सौम्य आणि सुसंस्कृत भाषेत याला ‘परस्पर सहकार्य’, ‘कायदेशीर सुसंवाद’ किंवा ‘अडचणीच्या वेळी काढलेला सुवर्णमध्य’ म्हणतो.

त्यामुळेच शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं… कपात कटिंग अन् कामात सेटिंग… हीच तर आहे जगण्याची खरी बॅटिंग!

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!