पुणे महापालिका निवडणुकीत ‘व्होट चोरी’चा आरोप ; CCV फुटेज सह महाविकास आघाडी आक्रमक


पुणे महापालिका निवडणुकीत ‘व्होट चोरी’चा आरोप ; CCV फुटेज सह महाविकास आघाडी आक्रमक !

पुणे: आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘व्होट चोरी’चा (मतदार यादीत फेरफार) गंभीर आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) लक्ष्य केले आहे. महाविकास आघाडीचे नेते, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) पक्षाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणारे वकील असीम सरोदे यांनी हा गंभीर दावा केला आहे. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज देखील सार्वजनिक केले आहे.

प्रारूप मतदार यादीवर आधीच ‘प्रचंड’ आक्षेप

पुणे महापालिका निवडणुकीसाठी नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीवर मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदवण्यात आले असून लवकरच अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुण्यामध्ये ‘व्होट चोरी’चा मोठा मुद्दा उपस्थित केला आहे.

नेमका आरोप काय आहे..?

काँग्रेसचे नेते संजय बालगुडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) पक्षाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि वकील असीम सरोदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत हा आरोप केला.

संजय बालगुडे आणि असीम सरोदे यांनी संयुक्तपणे म्हटले की, “भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रवेश करून मतदार याद्यांमध्ये फेरफार केला आहे. भाजपने मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ घातला आहे.”

सीसीटीव्ही फुटेजमुळे दावा अधिक मजबूत

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या दाव्याला बळ देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज सादर केले आहे.

पुराव्यानिशी दावा:

भाजपचे पदाधिकारी ज्या ठिकाणी या मतदार याद्या ठेवल्या आहेत, तेथे जाऊन या याद्या चाळताना आढळून आले आहेत.

वेळेचा उल्लेख:

उपलब्ध फुटेजनुसार, भाजपच्या नेत्यांनी तब्बल ४.३० तास क्षेत्रीय कार्यालयात बसून मतदार याद्यांमध्ये बदल केले असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

या गंभीर आरोपांमुळे पुणे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, भाजप यावर काय स्पष्टीकरण देते याकडे आता लक्ष लागले आहे.

 


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!