पुणे महापालिकेचा दिवाळखोरपणा : सायकलींच्या छाताडावर पीएमपीएलचे वरवंटे!
पुणे | प्रतिनिधी पुणे महानगरपालिकेच्या कारभाराची कीर्ती आता त्रैलोक्यात गाजणार यात शंका नाही! ज्या शहराला ‘सायकलचे शहर’ म्हणून जगात ओळखले जात होते, त्याच शहरात आता सायकलस्वारांच्या नशिबी ‘अंतिम संस्कार’ करण्याची वेळ आली आहे. पालिकेच्या नियोजनशून्यतेचा आणि दिवाळखोर बुद्धीचा यापेक्षा जळजळीत पुरावा तो कोणता?
सायकल ट्रॅकवर पी.एम.पी.एम.एल. ने बस स्टॉप आणि पास केंद्रे उभारून सायकलींच्या छाताडावर जे वरवंटे फिरवले आहेत, त्यातून पालिकेच्या अक्कलशून्यतेचे दर्शन घडते. पण एवढ्यावरच हे संकट थांबत नाही, पुण्याच्या फुटपाथची अवस्था तर त्याहून भयंकर झाली आहे!
॥ फुटपाथ की कुत्र्यांची हागणदरी? ॥
“पुणेकरहो, फुटपाथवरून चालताना आता डोके वर ठेवून चालण्याची चूक करू नका! कारण पालिकेच्या मेहेरबानीने पुण्याचे फुटपाथ आता ‘श्वान-शौचालय’ झाले आहेत. एका बाजूला सायकल ट्रॅकवर बसचे आक्रमण आणि दुसऱ्या बाजूला फुटपाथवर कुत्र्यांची हागणदरी! सांगा, पुणेकराने पाय ठेवायचा कुठे? पालिकेच्या स्वच्छतेच्या गप्पा म्हणजे केवळ कागदी घोडे नाचवणे आहे. जोपर्यंत हे फुटपाथ कुत्र्यांपासून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत कसली आलीय स्मार्ट सिटी?”
अतिक्रमण की अधिकृत गुंडगिरी?
सामान्य माणसाने रस्त्यावर हातगाडी लावली तर पालिकेचा ताफा दंडुका घेऊन धावतो. पण इथे तर पालिकेच्याच एका विभागाने दुसऱ्या विभागाच्या जागेवर उघड उघड डल्ला मारला आहे. सायकल ट्रॅकवर बस स्टॉप बांधणे, म्हणजे चक्क गळ्यातील ताईत काढून पायात बांधण्यासारखा हा प्रकार आहे. सायकलस्वारांनी आता सायकल चालवायची कोठून? की बस स्टॉपच्या छतावरून उड्या मारत जायचे?
आता या सरकारी अतिक्रमणावर कारवाई करण्याचे धाडस कोणाकडे आहे? तोडफोड विभाग आपल्याच भावाचे घर पाडणार का? पालिकेच्या या ‘अंधेर नगरी’त सायकल चालवणे किंवा फुटपाथवरून चालणे म्हणजे मृत्यूला किंवा घाणीला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे.
पुण्याच्या इतिहासात पालिकेचा हा ‘वरवंटा’ आणि ही ‘घाण’ काळ्या अक्षराने लिहिली जाईल. सायकलींच्या छाताडावर बस स्टॉप उभारणाऱ्या आणि फुटपाथची हागणदरी करणाऱ्या या व्यवस्थेला ‘मूर्खपणाचे सुवर्णपदक’ द्यायला हवे!


























