चाणक्य हरले, नियोजक जिंकले..! कोल्हापूरच्या मातीत ‘डाव’ पडला अन् ‘पैलवान’ मुश्रीफांनी अख्खं मैदानच मारलं..!


चाणक्य हरले, नियोजक जिंकले..! कोल्हापूरच्या मातीत ‘डाव’ पडला अन् ‘पैलवान’ मुश्रीफांनी अख्खं मैदानच मारलं..!

कोल्हापूर म्हणजे कुस्तीचं माहेरघर, पण यावेळची कुस्ती तालीमखान्यात नाही, तर राजकारणाच्या आखाड्यात रंगली होती. ज्यांना वाटत होतं की आम्ही दिल्लीचे ‘चाणक्य’ आहोत, त्यांच्या रणनीतीच्या चिंधड्या उडवत हसन मुश्रीफ नावाच्या एका ‘नियोजकाने’ कोल्हापूरच्या मिनी मंत्रालयावर राष्ट्रवादीचा झेंडा रोवला आहे. पन्हाळा आणि शाहूवाडीच्या डोंगराळ भागात मुश्रीफांनी जी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केली, ती पाहून विनय कोरेंसारख्या दिग्गजांचे बालेकिल्ले अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आहेत!

हे तर मुश्रीफांचे राजकीय ‘मॅजिक.’! मुळात ही निवडणूक कोणाची होती? कुणी म्हणत होतं ही चंद्रकांत दादांची प्रतिष्ठा आहे, कुणी म्हणत होतं हे सतेज पाटलांचं अस्तित्व आहे. पण निकालाने सिद्ध केलं की, कोल्हापूरच्या राजकारणाचा खरा रिमोट कंट्रोल हसन मुश्रीफांच्या खिशात आहे. भाजपाला १२ जागांवर रोखून धरणं आणि स्वतः २० जागांचा टप्पा पार करणं, हे काही येड्यागबाळ्याचं काम नाही. मुश्रीफांनी केवळ उमेदवार उभे केले नाहीत, तर त्यांनी मतदारांच्या मनात असं काही ‘इंजेक्शन’ टोचलं की, लोकं फक्त घड्याळाच्या काट्यावरच नाचली!

पन्हाळा-शाहूवाडीत मुसंडी ; कोरे झाले कोरे..!

आश्चर्य म्हणजे, जनसुराज्यचे संस्थापक विनय कोरे जिथे स्वतःला ‘किंगमेकर’ समजतात, तिथे मुश्रीफांनी थेट शिरकाव केला. पन्हाळ्याच्या तटबंदीत भेगा पाडून त्यांनी आपले शिलेदार निवडून आणले. ही किमया पाहून भल्याभल्यांना आता ‘राजकीय संन्यास’ घेण्याची वेळ आली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

भाजपाचा बाणा म्यान, शिंदेंची शिवसेना घायाळ..!

महायुती जिंकली, हे कागदावर खरं असलं तरी सत्तेचा खरा वाटा कोणाचा? भाजपा १२ वर अडकली आणि शिंदे गट ८ वर. या आकड्यांनी दाखवून दिलंय की, कोल्हापुरात भाजपाच्या ‘चाणक्यनीती’पेक्षा मुश्रीफांची ‘मॅनेजमेंट’ वरचढ ठरली. सतेज पाटलांनी १५ जागा मिळवून झुंज दिली खरी, पण मुश्रीफांच्या वादळापुढे त्यांचा ‘बंटी’ही थोडा कमीच पडला.

आता पुढे काय? आता कोल्हापूरच्या गादीवर राष्ट्रवादीचाच माणूस बसणार हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. चाणक्यांच्या पोथ्या बाजूला पडल्या आहेत आणि मुश्रीफांच्या नियोजनाची गाथा जिल्ह्याच्या घराघरात पोहोचली आहे. कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की, इथं हुशारी चालत नाही, इथं फक्त ‘माणसं’ जोडणारा आणि ‘मैदान’ मारणाराच राजा असतो!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!