“कोटद्वारच्या अमानुषतेचा पुण्यात संताप; लोकशाहीच्या मारेकऱ्यांविरुद्ध अंजुम इनामदारांचा ‘नगाडा’!
पुणे | : “ज्या देशात दुकानाच्या पाटीवर ‘बाबा’ नाव लिहिले म्हणून एखाद्याचा गळा आवळला जातो, त्या देशात लोकशाही जिवंत आहे असे म्हणणे म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे! हा देश संविधानाने चालतो की या ‘बजरंगबट्टूंच्या’ मग्रुरीने?” अशा जळजळीत आणि टोकदार शब्दांत मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी आज पुण्याच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर सरकारचे वाभाडे काढले. उत्तराखंडमधील कोटद्वार येथे घडलेल्या त्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यात संतापाचा ज्वालामुखी उसळला होता.
धर्मांधतेचा हा कसला नंगानाच.?
एका मुस्लिम दुकानदाराने आपल्या दुकानाला ‘बाबा’ नाव दिले, तर या धर्मांधांच्या पोटात गोळा का यावा? नाव बदलण्यासाठी धमकावणे, दहशत निर्माण करणे आणि कायदा हातात घेणे, हा कोणत्या संस्कृतीचा भाग आहे? ही कसली आलीय तुमची ‘संस्कृती’ आणि ही कसली तुमची ‘भक्ती’? या गुंडांनी केवळ दुकानदारालाच धमकावले नाही, तर माणुसकीचा धर्म जपणाऱ्या दीपक कुमार नावाच्या सच्च्या भारतीयावरही हल्ला केला. “माझं नाव मोहम्मद दीपक आहे,” असे छातीठोकपणे सांगणाऱ्या दीपक कुमारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणजे या देशाच्या मुळावर उठलेला घाव आहे!
सरकारचे ‘मौन’ की गुंडांना ‘अभय’?
उत्तराखंडमध्ये अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले आता सवयीचे झाले आहेत का? असा संतप्त सवाल विचारताना इनामदार म्हणाले, “दीपक कुमारांच्या मुलीला शाळेतून काढले जाते, पत्रकारांची लेखणी रोखली जाते, तरीही सरकार ढिम्म हलत नाही. ही मूकसंमती नाही तर काय आहे? आज जर या धर्मांध शक्तींना आवरले नाही, तर उद्या हा देश हेच लोक पेटवून देतील!”
पुण्यात मागण्यांचा ‘एल्गार.’!
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या धरणे आंदोलनात अंजुम इनामदार यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे खालील रोखठोक मागण्या केल्या:
बजरंग दल या संघटनेवर देशात तात्काळ आणि कायमस्वरूपी बंदी घाला.!
संविधानासाठी लढणाऱ्या दीपक कुमार यांच्यावरील सर्व खोटे गुन्हे मागे घ्या. त्यांच्या मुलीचे शालेय शिक्षण पुन्हा सुरू करून तिला संरक्षण द्या.
कोटद्वारमधील पत्रकारांवर लादलेली ‘दहशतीची’ बंदी त्वरित उठवा.
एकतेचे दर्शन: या आंदोलनात केवळ घोषणा नव्हत्या, तर अन्यायाविरुद्धची एकी होती. गुरुद्वारा गणेश पेठचे अध्यक्ष भोला सिंग अरोरा, ईसाई महासंघाचे राजन नायर, भीम आर्मीचे तोसीफ शेख आणि अनेक कार्यकर्त्यांनी या लढ्याला पाठिंबा दिला.
“धर्मांध दहशत बंद करा! संविधान वाचवा!” अशा गगनभेदी घोषणांनी पुण्याचा परिसर दणाणून गेला होता. आता सरकार या ‘बजरंगबट्टूंच्या’ मुसक्या आवळणार की लोकशाहीचा बळी घेणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
प्रसिद्धीप्रमुख: मा. अंजुम इनामदार






























