विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांच्या ताटात ‘झुरळ’ उताणे ; प्रशासन की मेस चालकांचे पाळीव प्राणी?
पुणे | विद्येचे माहेरघर, विद्येचे नंदनवन अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या ज्ञानाच्या अमृतापेक्षा अन्नातील ‘विषा’चीच चर्चा अधिक सुरू आहे. ज्या विद्यापीठाने देशाला विद्वान आणि विचारवंत दिले, त्याच विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ९ मध्ये आता विद्यार्थ्यांच्या ताटात चक्क ‘झुरळ’ संस्कृतीचा उदय झाला आहे! हे विद्यापीठ आहे की झुरळांची पैदास केंद्र? असा संतप्त सवाल आज पुण्यातील तमाम विद्यार्थी विचारू लागले आहेत.
‘मुंगळा’ की ‘झुरळ’? मेस चालकांचा निर्लज्जपणा! घडला प्रकार असा की, अजय देशमुख हा विद्यार्थी आपल्या मित्रांसह मेसमध्ये जेवायला बसला होता. भुकेल्या पोटी दोन घास सुखाचे घ्यावेत, अशी त्याची माफक अपेक्षा होती. पण ताटात पडलेल्या अन्नासोबत साक्षात एक झुरळ त्याच्याकडे पाहत होते! अजयने ही बाब मेस चालकांच्या निदर्शनास आणून दिली, तेव्हा तर मेस चालकांनी बरळण्यात सर्व मर्यादा ओलांडल्या. “हे झुरळ नसून मुंगळा आहे,” असा जावईशोध त्यांनी लावला.
अहो, मुंगळा असो वा झुरळ, विद्यार्थ्यांच्या ताटात काय हे कीटक पाहुणे म्हणून बोलावले होते का? की विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आहारात ‘प्रोटिन्स’ वाढवण्यासाठी हा नवीन प्रयोग सुरू केला आहे? मुळात, विद्यार्थ्यांच्या ताटात मुंगळ्यांना तरी परवानगी आहे का? असा रोखठोक प्रश्न आता विचारला जात आहे.
प्रशासनाचा ढिम्मपणा आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य “विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि स्वच्छ अन्न मिळायला हवे, ही मागणी म्हणजे काही चंद्रावरची मागणी नाही,” अशा शब्दांत विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. पण येथील प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा मेस चालकांचे हित जास्त प्रिय दिसते आहे. वारंवार तक्रारी करूनही कुंभकर्णासारखे झोपलेले प्रशासन आता विद्यार्थ्याचा बळी गेल्यावरच जागे होणार का?
आमचा रोकठोक सवाल! पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमचा सवाल आहे की, जर तुमच्या स्वतःच्या ताटात असा ‘मुंगळा’ किंवा ‘झुरळ’ आला असता, तर तुम्ही तो ‘प्रसाद’ म्हणून खाल्ला असता का? जर नाही, तर मग गरिबांच्या मुलांच्या जीवाशी हा जीवघेणा खेळ कशासाठी?
या मुजोर मेस चालकांवर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा हे विद्यार्थी आता शांत बसणार नाहीत. अन्नातील या घाणीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले, तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे ढिम्म प्रशासनच असेल, हे त्यांनी पक्के लक्षात ठेवावे!
“प्रशासनाचा मेंदू की मेसचा डबा ; नक्की सडलंय काय?”
“आम्ही मेसमध्ये आढळलेल्या झुरळांबाबत प्रशासनाकडे वारंवार दाद मागितली, पण आमची तक्रार म्हणजे जणू ‘अरण्यरुदन’ ठरत आहे! अन्नपदार्थांमध्ये कधी आळ्या, कधी कीटक तर कधी झुरळे सापडणे ही आता विद्यापीठात नित्याचीच बाब झाली आहे. तरीही प्रशासन ढिम्म आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी हा खेळ खेळला जात आहे, पण कुणालाही त्याचे सोयरसुतक नाही. ही अन्नातील घाण नाही, तर प्रशासकीय व्यवस्थेला लागलेली कीड आहे!”
— अजय देशमुख (पिडीत विद्यार्थी, पुणे विद्यापीठ)




























