सत्ताधाऱ्यांचा ‘लाड’ अन् दलितांच्या हक्कावर ‘दरोडा’; आझाद मैदानात पँथर आर्मीचा रणसंग्राम!

मुंबई : ज्या महाराष्ट्राने जगाला समतेचा मंत्र दिला, ज्या मातीने छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे बाळकडू पाजले, त्याच महाराष्ट्राच्या राजधानीत आज ‘न्यायाचा’ गळा घोटला जात आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली मतांचा जोगवा मागणारे हे सरकार प्रत्यक्षात मागासवर्गीयांच्या हक्काच्या भाकरीवर डल्ला मारत आहे, हे पाहून आज महाराष्ट्राच्या अब्रूचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. अनुसूचित जाती उपयोजनेचा ५०८.७५ कोटींचा निधी जाहिरातबाजीसाठी वळवणे, हा ‘आर्थिक दरोडा’ नसून दुसरं काय आहे? या अन्यायाविरुद्ध आज ‘पँथर आर्मी’ने आझाद मैदानात जो ‘भीमगर्जना’ एल्गार पुकारला, त्याने मंत्रालयातील खुर्च्यांनाही हादरे बसले असतील!
बहिणीचा लाड अन् भावाचा बळी !
एका बाजूला ‘बहीण लाडकी’ म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच बहिणीच्या दलित भावाच्या विकासाचा निधी पळवायचा, हा कसला अघोरी कारभार? “तोंडात महापुरुषांचे नाव आणि हातात कात्री,” अशी ही सरकारची वृत्ती आहे, अशा शब्दांत पँथर आर्मीचे संस्थापक प्रमुख संतोषजी आठवले यांनी सरकारची सालटी काढली. “सामाजिक न्याय विभागाचा हा निधी ६ मार्चच्या आत तिजोरीत परत आला नाही, तर हे सरकार टिकणार नाही,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
मागण्यांचा आसूड: १५०० नको, १५,००० द्या !
आंदोलकांनी सरकारला नुसतं धारेवर धरलं नाही, तर आरसाही दाखवला. जर आमचा निधी वापरून तुम्ही योजना राबवत असाल, तर आमच्या भगिनींना १५०० रुपयांची ‘भीक’ नको, तर १५,००० रुपयांचा विशेष सन्मान निधी द्या, ही मागणी म्हणजे सरकारच्या तोंडावर मारलेली चपराकच आहे.
आंदोलनातील मुख्य प्रहार :
निधी पळवापळवी थांबवा : कर्नाटक-आंध्रप्रमाणे निधी संरक्षणाचा कडक कायदा करा.
घरकुल की कुटी ? : रमाई आवास योजनेसाठी १० लाख रुपये द्या, गरिबांची चेष्टा थांबवा.
शेतजमीन व कर्जमाफी : भूमिहीनांना जमीन द्या आणि परदेशी शिकणाऱ्या मुलांचे शैक्षणिक ओझे उतरवा.
जातनिहाय जनगणना: २०२६-२७ मध्ये आरपारची लढाई करा, कोणाचं किती वजन आहे ते स्पष्ट करा!
मंत्रालयात घाम फुटला !
हजारो भीमसैनिकांच्या घोषणांनी जेव्हा आझाद मैदान दणाणून गेलं, तेव्हा सरकारचे दूत धावत आले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी निवेदनाची दखल घेत ‘अभिवचन’ दिलं खरं, पण “नुसती आश्वासनं नकोत, कृती हवी,” असा ठाम पवित्रा पँथर आर्मीने घेतला आहे.
उमेश जामसंडेकर, प्रा. अरुण मेढे, अमोल कुरणे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अंगार सांगत होता की, जर ६ मार्चपर्यंत हा हिशोब चुकता झाला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र ‘चक्काजाम’ होईल आणि हे सरकार ‘जेल भरो’च्या लाटेत वाहून जाईल!



























