‘माजी’ झाले आता ‘ताजी’ करण्यासाठी सज्ज; जिल्हा परिषदेच्या आखाड्यात जुन्याच मल्लांचा शड्डू!
“नऊ वर्षे ! साधी सुधी नव्हेत, तर नऊ वर्षे हे सत्तेचे सिंहासन रिकामे पडले होते. ज्यांनी नऊ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या गालिच्यावर लोळण घेतली होती, त्यांच्या अंगाला आता पुन्हा एकदा सत्तेची खाज सुटली आहे. कालपर्यंत जे ‘माजी’ म्हणून कोपऱ्यात बसून माश्या मारत होते, ते आता निवडणुकीच्या वासाने एकदम ‘ताजी’ तवानी होऊन मैदानावर शड्डू ठोकून उभे राहिले आहेत!”
जिल्ह्यात सध्या लोकशाहीचा नाही, तर ‘बड्या असामींचा’ मेळा भरला आहे. मिनी मंत्रालयाची स्वप्ने पाहणाऱ्या ५९८ शिलेदारांनी उमेदवारीचे अर्ज भरून जणू रणांगणच गाजवायला सुरुवात केली आहे. यात कोण आहे? तर तेच जुने चेहरे, तेच जुने सभापती आणि तेच प्रस्थापित पदाधिकारी, ज्यांना वाटते की जिल्हा परिषद ही त्यांच्या बापाची जहागिरी आहे!
नऊ वर्षांचा ‘राजकीय उपवास’ सुटणार..!
नऊ वर्षे निवडणुका नसल्याने अनेकांचे राजकीय दुकान बंद पडले होते. काहींची चरबी उतरली होती, तर काहींना विस्मृतीचा रोग जडला होता. पण आता डमरू वाजला आहे! या निवडणुकीच्या निमित्ताने हे जुने मल्ल आपल्या जुन्याच ‘लंगोट्या’ कसून आखाड्यात उतरले आहेत. अनुभवी चेहऱ्यांचा हा भरणा पाहून गल्लीतले पोरही आता विचारू लागले आहेत— “नऊ वर्षे कुठे होतात महाराज..?”
२७ जानेवारी: कोणाचा ‘गेम’ होणार..?
अर्ज तर ५९८ आले आहेत, पण २७ जानेवारी ही तारीख म्हणजे खऱ्या अर्थाने ‘गळतीचा हंगाम’ आहे. या दिवशी कोणाला ‘अर्थपूर्ण’ समजावून घरी बसवले जाते आणि कोणाची उमेदवारी कापली जाते, हे पाहणे मनोरंजक ठरेल. अनेक दिग्गजांनी आपल्या वारसांना आणि मेहुण्या-पाहुण्यांनाही रिंगणात उतरवले आहे. जणू जिल्हा परिषद नसून हा एखाद्या घराण्याचा ‘कुलवृत्तांत’ लिहायचा कार्यक्रम आहे!
“नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जो तमाशा आपण पाहिला, त्यापेक्षा भयंकर राडा आता ग्रामीण भागात होणार आहे. प्रस्थापित नेत्यांच्या खुर्च्या आता डळमळू लागल्या आहेत आणि नवे समीकरणे मांडणारे तरुण तुर्क जुन्यांच्या छाताडावर नाचायला तयार आहेत. आता फक्त पाहायचे की, या निवडणुकीच्या धुळवडीत कोणाचे तोंड काळे होते आणि कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते!”



























