पुण्यात रणरागिणींचा गौरव ; आता कात्रजच्या भूमीवर फडकणार स्त्री-शिक्षणाची विजयी पताका!
पुणे | ज्या समाजात स्त्रीचा सन्मान होतो आणि जिथे शिक्षणाची गंगा वाहते, तोच समाज प्रगतीचे शिखर गाठतो, हा विचार कृतीत उतरवत ‘शिक्षण हक्क डेव्हलपमेंट रिसर्च अँड प्रमोशन मंच’च्या वतीने पुण्यात एक देदीप्यमान सोहळा संपन्न झाला. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या रणरागिणींचा सन्मान करतानाच, कात्रजच्या भूमीवर ‘भारतातील पहिले अल्पसंख्याक महिला विद्यापीठ’ उभारण्याचा ऐतिहासिक संकल्प यावेळी सोडण्यात आला!
रुपालीताईंचा रणहुंकार :
“विद्यापीठासाठी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत!” कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि आक्रमक नेत्या श्रीमती रुपालीताई पाटील (ठोमरे) यांनी आपल्या पहाडी आवाजात या संकल्पनेला जाहीर पाठिंबा दिला. कात्रज येथील वक्फ संपत्तीवर हे विद्यापीठ उभे राहावे, ही केवळ काळाची गरज नसून ते एक स्वप्न आहे, असे त्या म्हणाल्या. “या विद्यापीठाच्या वाटेत येणारा कोणताही अडथळा दूर करण्यासाठी आणि हे ज्ञानमंदिर उभे करण्यासाठी मी शेवटपर्यंत तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिनी,” अशी ग्वाही देताच सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
मतीन मुजावर यांचा ‘शिक्षणाचा मंत्र’ “शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे आणि त्याशिवाय समाजाचा उद्धार शक्य नाही,” या अत्रेछाप विचारांचा वारसा पुढे नेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. मतीन मुजावर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुस्लिम समाजातील स्त्री-शिक्षणाचे महत्त्व विषद करताना ते पोटतिडकीने म्हणाले की, “जर उद्याचा समाज सुसंस्कृत हवा असेल, तर आजच्या कन्येला साक्षर नव्हे, तर उच्चशिक्षित करणे अनिवार्य आहे. मशिदींच्या माध्यमातूनही आता शैक्षणिक क्रांतीचे वारे वाहिले पाहिजेत!”
कर्तृत्ववान महिलांचा गौरव या सोहळ्यात पुणे शहर आणि परिसरातील अनेक महिला कार्यकर्त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शबाना इनामदार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती किरण शेख, श्रीमती शबाना खान आणि ॲड. अंजली रानाडे यांसारखी ‘विद्वत्तेची खाण’ असणारी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चांदसाहेब बलबट्टी यांनी अत्यंत खुमासदार पद्धतीने केले.
“आपल्या पाल्यांना शिक्षित करा, कारण सक्षम होण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. समाजातील सुशिक्षित वर्गाने आता कंबर कसून मशिदींच्या माध्यमातून शैक्षणिक परिवर्तनाची मशाल पेटवली पाहिजे!”




























