सावधान! तुम्ही दारू पीत नाही, दारूच तुम्हाला पितेय ; हे काय बरोबर नाही..!


सावधान! तुम्ही दारू पीत नाही, दारूच तुम्हाला पितेय ; हे काय बरोबर नाही!

लेखक :  मेहबूब सर्जेखान ज्येष्ट पत्रकार 

 

काय म्हणता? “अहो  साहेब, थोडीशी घेतल्यावर काय होतं?” आणि तुमची ती ‘थोडीशी’ म्हणजे तरी किती? तर म्हणे ‘दोन क्वार्टर’! शाब्बास! हा तर अजबच न्याय झाला. बरं, वरून समर्थन काय, तर म्हणे ही ‘सरकारमान्य’ आहे! अहो, सरकारने तर विषारी औषधांच्या बाटल्यांवरही ‘मान्यता’ दिलेली असते, मग काय ती अमृतासारखी रिचवणार का? परवाना दारू पिण्याचा मिळालाय, माणुसकी सोडण्याचा नाही! आणि अशाने तुमची जी राखरांगोळी होतेय ना, ते काय बरोबर नाही!

पगार दारूत आणि पोरं वाऱ्यावर !

अहो, महिनाभर घाम गाळून जो पगार मिळतो, तो घराच्या बरकतीसाठी असण्याऐजी जर थेट दारूच्या गुत्त्यावर आणि ‘चकण्यात’ जिरत असेल, तर हे काय बरोबर नाही! तिकडे घरात पोरं पुस्तकाला मोताद आणि इकडे तुम्ही चिवडा-शेंगदाण्यात गुंग! ज्या पैशाने घराचं सोनं व्हायला हवं, त्या पैशाने तुम्ही स्वतःच्या काळजाचं कोळसं करताय, हे काय बरोबर नाही!

सरकारी ‘किक’ आणि तुमचा ‘तोल’!

काही बहाद्दर म्हणतात, “स्वस्त आणि मस्त सरकारमान्य दारूने लगेच ‘किक’ बसते!” अरे मूर्खांनो, ती ‘किक’ तुम्हाला प्रगतीकडे नेण्याऐवजी अधोगतीकडे ढकलताना तुमचा ‘तोल’ घालवते, हे काय बरोबर नाही! ज्या पायांनी ताठ मानेने चालायचं, ते पाय गटारात लोळायला लागतात. स्वतःच्या पायावर उभं राहण्याऐवजी दुसऱ्याच्या खांद्यावर लोळणं, हे काय बरोबर नाही!

नशामुक्त भारत आणि तुमची साथ

आता सर्वात महत्त्वाची गोष्ट… देश मोठा होतो तो अशा झिंगलेल्या लोकांमुळे नाही, तर शुद्धीवर असलेल्या पराक्रमी तरुणांमुळे! आज सरकार ‘नशा मुक्त भारत’ अभियान राबवत आहे, पण हे अभियान म्हणजे काय सरकारी कागदावरचा घोडा नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून दारू पिणं सोडत नाही, तोपर्यंत या देशाला नशेच्या विळख्यातून कोणीही वाचवू शकणार नाही! तुम्ही एक एक पाऊल मागे घेतलात, तरच ‘नशा मुक्त भारत’ अभियानाला खरी बळकटी येणार आहे. भारताला महासत्ता बनवायचं असेल, तर हातामध्ये रिकाम्या बाटल्या नकोत, तर कष्टाची अवजारं आणि ज्ञानाची पुस्तकं हवीत. तुम्ही स्वतःला नशेच्या गुलामगिरीतून मुक्त केलंत, तरच हा देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार आहे!

उठा आणि जागे व्हा..!

पगार दारूत घालवणं चूक आहे, तोल घालवणं त्याहून मोठी चूक आहे, म्हणून ‘दारू पिणे कायमचे बंद करणे’ हेच शंभर टक्के बरोबर आहे! तुमच्या बायकोच्या डोळ्यांतलं पाणी पुसा आणि मुलांच्या आयुष्यात प्रकाशाची पणती लावा.

लक्षात ठेवा, बाटलीतलं मद्य संपलं की बाटली भंगारात जाते, पण तुम्ही जर संपलात, तर तुमचं अख्खं घरच भंगार होऊन जाईल. आता सांगा, तुम्हाला देशाचे सैनिक बनायचंय की बाटलीचे गुलाम?

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!