हाऊ इंडिया गिव्हज

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
शुक्रवार ता.२० फेब्रुवारी २०२६ रोजी अशोका विद्यापीठाच्या सामाजिक परिणाम व दातृत्व केंद्राच्या वतीने (सेंटर फॉर सोशल इम्पॅक्ट अँड फिलान्थ्रॉपी )” हाऊ इंडिया गिव्हज २०२५-२६”हा यावर्षीचा अहवाल प्रकाशित केला आहे. वीस राज्यांमधील सात हजारांवर प्रतिनिधिक सर्वेक्षणे करून उपभोगविषयक आकडेवारीवर आधारित ” भारत कसे दान देतो ” हा अभ्यास रोख, वस्तू आणि स्वयंसेवा यांच्या माध्यमातून सामान्य भारतीय समाजकारणासाठी कसा हातभार लावतात याविषयीची माहिती यात दिली आहे. या अहवालानुसार भारतीय माणसे वर्षाला देणगी रूपात चौपन्न हजार कोटी रुपये देत असतात. त्यामध्ये धार्मिक संस्थांचा वाटा ४५.९ टक्के तर भिकाऱ्यांचा वाटा ४१.८ टक्के आहे. उर्वरित १४.९ टक्के रक्कम इतर सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचत असते. या अहवालात इतरही अनेक बाबी दिलेल्या आहेत. पण देणग्यांमधील हा वाटा विचारप्रवृत्त करणारा आहे. हे देणगीदार केवळ श्रीमंत वर्गातले नाहीत.तर मध्यमवर्गीय ,सर्वसामान्य व्यक्ती व कुटुंबेही यात आहेत. बहुतांश देणगीदारांनी धार्मिक कर्तव्याची भावना ही देणगी मागील मूळ प्रेरणा आहे ,तसेच नैतिक बंधनातून सुद्धा देणगी देत असतो असे म्हटले आहे. भारतीय दातृत्व सामूहभावना, नातेसंबंध ,स्थळकाळ अशाही घटकांवर अवलंबून असते असे हा अहवाल स्पष्ट करतो.
भारतीय संस्कृतीमध्ये दानाचे महत्त्व मोठे आहे. प्राचीन ग्रंथापासून संतसाहित्यापर्यंत सर्वत्र दानाचे महत्त्व सांगितलेले आहे. त्यामुळे दान ,देणगी हा समाज जीवनातील एक स्वभाव व समाजभावच आहे. दानाचा अर्थ आपल्या कुवतीनुसार स्वार्थरहित भावनेने गरजेच्या ठिकाणी पैसा, वस्तू वगैरे देणगीरूपाने देणे. यामध्ये परतफेडीची अपेक्षा असू नये. दान हे एक आत्मिक समाधानाचे साधनही आहे.अर्थात दान हे केवळ धार्मिक नसून सामाजिक समता निर्माण करण्यामध्येही महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे सर्वांगीण समानता,समाज परिवर्तन, समाज प्रबोधन, भारतीय संविधानिक मूल्ये रुजवण्याचे काम अशा स्वरूपाच्या राष्ट्राला उन्नत करणाऱ्या कामांसाठी दान अथवा देणगी देण्याला अग्रक्रम दान देऊ इच्छिणाऱ्या मंडळींनी दिला पाहिजे. आत्मिक समाधान म्हणजे नेमके काय याचाही विचार ज्याचा त्याने केला पाहिजे. दान नेहमीच सत्पात्री असावे हे पाहणे गरजेचे असते. भारतासारख्या देशात वर्षाला चौपन्न हजार कोटी रुपये दान व देणगीच्या स्वरूपात दिली जात असतील तर ती फार मोठी आनंद, अभिमान याबरोबरच विचारप्रवृत्त करणारीही बाब आहे असे वाटते.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली सदतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ते म्हणून सुपरिचित आहेत.)




























