मी खुर्ची बोलतेय : जिथे शाळा संपते, तिथे माझा महिमा सुरू होतो !


मी खुर्ची बोलतेय : जिथे शाळा संपते, तिथे माझा महिमा सुरू होतो !

लेखक: प्रेस मीडिया लाईव्ह :

अहो, नमस्कार! ओळखलंत का मला? मी ती ‘खुर्ची’ आहे, जिच्यासाठी आजवर कित्येकांचे धोतर सुटले आणि कित्येकांनी आपल्या इमानाचा बाजार मांडला. पण हल्ली या खुर्चीसाठी काय काय ‘खेळ’ करावे लागतात, हे बघून माझं लाकूडही शरमेनं पाणी-पाणी व्हायची वेळ आली आहे!

आजकालच्या माणसाचं तर नवलच वाटतं. बाहेरून थकून-भागून घरात आला की, लेकराबाळांची खुशाली विचारण्याऐजी हा महाभाग विचारतो— “काय ग, माझी खुर्ची कुठे आहे?” जणू काही याच्या संपूर्ण अस्तित्वाचा आधार आणि विसावा त्या खुर्चीतच सामावलाय! एकदा का हा खुर्चीवर विरजमान झाला की याच्यासाठी जगातील इतर सर्व नाती आणि कर्तव्ये ‘शून्य’ होतात. खुर्ची पुढे सर्व काही फिके आहे बाबा!

खोटं कशाला सांगू? या खुर्चीमुळे जे ज्ञान मिळतं, ते कोणत्याही शाळेत किंवा विद्यापीठात मिळत नाही. शाळा शिकून माणूस शहाणा होतो की नाही कुणास ठाऊक, पण खुर्ची मिळाली की त्याला ‘राजकीय ज्ञान’ मात्र चटकन प्राप्त होतं. अहो, इथं खुर्चीला जी किंमत आहे, ती रक्तामांसाच्या माणसाला उरलेली नाही. माणूस गेला तरी त्याची जागा रिकामी राहते, पण खुर्ची रिकामी झाली की तिथं बसायला तासाभरात दहा जण रांगेत उभे राहतात. इथे माणसापेक्षा लाकडाला जास्त किंमत आहे!

लोक विचारतात, “राजकारणात निवृत्तीचं वय का नसतं?” अरे बाबांनो, त्याचं कारण मीच आहे! साध्या सरकारी नोकरीत साठ वर्ष झाली की माणूस पेन्शन घेऊन घरी बसतो, पण राजकारणात ‘निवृत्ती’ हा शब्दच डिक्शनरीतून बाद झालाय. शरीर साथ देईनासं झालं, दात पडले आणि ऐकू येणं बंद झालं तरी चालेल, पण खुर्ची सोडायला कुणीच तयार नसतं. जोपर्यंत खुर्चीला शेवटची खीळ ठोकली जात नाही, तोपर्यंत आमचे हे ‘तरुण’ नेते निवृत्त व्हायचं नाव काढत नाहीत!

जो बसतो तो गर्वाने म्हणतो— “ही खुर्ची माझी आहे!” पण मी मात्र मिश्किलपणे हसून म्हणते— “वेड्या, मी कोणाचीच नसते!” आज तू आहेस, उद्या तुझा पत्ता नसेल, पण मी तिथेच राहणार. सत्तेची ही वारीच अशी आहे, इथे दर पाच वर्षांनी वारकरी बदलावाच लागतो.

माणसाने खुर्चीसाठी कितीही ‘खेळ’ केले तरीही, मातीतून आलेला देह शेवटी मातीतच जाणार आहे. तिथे मात्र कोणतीही खुर्ची सोबत येत नाही! त्यामुळे जोवर तुम्ही माझ्यावर आहात, तोवर असे काही कर्तृत्व गाजवा की, उद्या तुम्ही खुर्चीवरून उतरलात तरी लोकांनी तुमची जागा आपल्या ‘हृदयात’ जपून ठेवावी.

कारण लक्षात ठेवा— खुर्ची आज आहे आणि उद्या नाही, पण माणसाने कमावलेले ‘माणूसपण’ मात्र चिरंतन टिकते. खुर्ची ही संधी आहे, अधिकार नाही; ती जबाबदारी आहे, अहंकार नाही! एक

“खुर्ची मिळवणे हे भाग्य असेल कदाचित, पण ती सन्मानाने सोडणे हेच खरे शौर्य आहे !”

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!