पुण्याचे ‘जल’सम्राट आता ‘ओटीपी’च्या पिंजऱ्यात..!


पुण्याचे ‘जल’सम्राट आता ‘ओटीपी’च्या पिंजऱ्यात..!

पुण्यात सध्या दोनच गोष्टींचा सुकाळ आहे. एक म्हणजे ‘उन्हाचा तडाखा’ आणि दुसरे म्हणजे रस्त्या-रस्त्यावर यमदूतासारखे धावणारे ‘पाण्याचे टँकर’. पुण्यातल्या नळांना पाणी येवो न येवो, पण टँकरवाल्यांच्या खिशात पैशांचा पूर मात्र कायम असतो. ‘पाणी हेच जीवन’ असं आपण पुस्तकात वाचलंय, पण पुण्यातल्या टँकर लॉबीने ‘पाणी हेच उत्पन्न’ असा नवा सिद्धांत मांडला होता. पण आता जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी या टँकर बहादरांच्या नाकावर अशी काही टिचकी मारली आहे की, टँकरचा गियर बदलण्याआधीच माफियांचा थरकाप उडाला असेल!

काय आहे हा ‘हिसका’?

जिल्हाधिकाऱ्यांनी आता ‘ओटीपी’ (OTP) नावाचं अस्त्र बाहेर काढलंय. आतापर्यंत टँकर म्हणजे काय? तर ‘आलो तर आलो, नाहीतर तुमचं नशीब!’ अशी यांची वृत्ती. पाणी कुणाला मिळालं? किती मिळालं? आणि कधी मिळालं? याचा हिशोब फक्त त्या टँकर ड्रायव्हरच्या डायरीत किंवा टँकर मालकाच्या मर्जीवर अवलंबून असायचा. पण आता ओटीपी आल्यामुळे, जोपर्यंत नागरिक आपल्या मोबाईलवर आलेला आकडा सांगत नाही, तोपर्यंत टँकरचं तोंड उघडणार नाही!

काय दिवस आले बघा! ज्या पुण्यात विद्येचे माहेरघर म्हणतात, तिथे आता पाण्यासाठी मोबाईलच्या मेसेजची वाट पाहावी लागणार. अहो, पुण्यात पूर्वी पाहुणा आला की पाणी विचारलं जायचं, आता पाहुणा आला की विचारतात, ‘तुमच्याकडे ओटीपी आलाय का?’

टँकरवाल्यांची ‘मना’सारखी वारी थांबली..!

या टँकर लॉबीने आजवर पुणेकरांना इतकं छळलंय की, एखाद्याने प्रेयसीची वाट पाहिली नसेल इतकी वाट पुणेकर टँकरची पाहतो. टँकर कधी येईल? सकाळी सहा की रात्री बारा? याचा काहीही पत्ता नसायचा. तक्रारींचा डोंगर असा साचला होता की, मुळा-मुठा नदी कोरडी पडली तरी प्रशासनाकडे जाणाऱ्या गाऱ्हाण्यांचा ओघ कमी होत नव्हता.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या या ‘जल’सम्राटांनी पाण्याचा असा बाजार मांडला होता की, गल्लीतल्या दादापासून ते पालिकेच्या उंबरठ्यापर्यंत सगळ्यांचे हात ओले होत होते. पण आता जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्यांच्या ‘हप्तेखोरी’वरच ‘पाणी’ ओतलं आहे.

बोजवारा उडालेल्या यंत्रणेला ‘डिजिटल’ चपराक

शहरात पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला असताना प्रशासनाने उगारलेला हा बडगा म्हणजे उशिरा सुचलेलं पण जबरदस्त शहाणपण आहे.

अनियमित फेऱ्या..? – आता ओटीपीमुळे थेट रेकॉर्डवर येणार!

वेळेचा पत्ता नाही..? – आता प्रत्येक खेपेचं ट्रॅकिंग होणार!

स्वतःचे खिसे भरणे..? – आता प्रत्येक लिटरचा हिशोब द्यावा लागणार!

पुणेकरांनो, आता सावध राहा. उद्या जर टँकरवाला आला आणि त्याने विचारलं, “काका, ओटीपी सांगा,” तर चुकून आपल्या बँकेचा ओटीपी देऊ नका! नाहीतर टँकरचं पाणी घरात येण्याऐवजी बँक खात्यातलं पाणी ‘बाहेर’ जायला वेळ लागणार नाही.

जिल्हाधिकारी महोदयांनी हा जो ‘डोस’ दिलाय, तो फक्त टँकरवाल्यांसाठी नाही, तर पाणी चोरणाऱ्या प्रत्येक पांढरपेशा माफियासाठी आहे. “जिल्ह्यात आता कोणताही टँकर मनमानी करू शकणार नाही,” हे वाक्य ऐकायला गोड वाटतंय खरं, पण अंमलबजावणी नीट झाली नाही, तर हा ‘ओटीपी’ सुद्धा ‘ओन्ली फॉर टँकरवाल्यांचा प्रॉफिट’ ठरायला नको.!

पुण्याच्या ‘तहानलेल्या’ राजकारणावर आता प्रशासनाने ‘डिजिटल’ पाणी शिंपडलं आहे. आता किमान सामान्य पुणेकरांच्या तोंडाला तरी पाणी पुसलं जाईल, अशी आशा करूया..!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!