नाशिकच्या दरबारात नामदारांची ‘मती’ गुंग ; संविधानाच्या जनकाचा विसर अन् एका रणरागिणीचा कडकडाट !


नाशिकच्या दरबारात नामदारांची ‘मती’ गुंग ; संविधानाच्या जनकाचा विसर अन् एका रणरागिणीचा कडकडाट!

सत्तांधांच्या स्मृतीवर वनविभागाच्या वाघिणीचे आसूड; प्रजासत्ताक दिनीच संविधानाच्या जनकाचा अपमान करण्याचा नामदारांचा ‘महा’पराक्रम !

नाशिक: काल नाशिकच्या मातीत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला. पण हा सोहळा सरकारी थाटापेक्षा एका मंत्र्यांच्या ‘विस्मृती’मुळे आणि एका सामान्य महिला कर्मचाऱ्याच्या ‘विद्रोहामुळे’ अधिक गाजला. राज्याचे संकटमोचक म्हणवून घेणारे नामदार गिरीशभाऊ महाजन भाषणाला उभे राहिले आणि काय आश्चर्य! महापुरुषांची नावे घेताना त्यांनी चक्क विश्ववंदनिय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरच फुली मारली. ज्या संविधानाच्या जोरावर ही नामदार मंडळी लाल दिव्याच्या गाड्यांतून मिरवतात, त्याच संविधानाच्या जनकाचे नाव घेण्याचे भान गिरीशभाऊंना राहू नये, याला ‘मलिदा’ संस्कृतीची धुंदी म्हणावी की निव्वळ कृतघ्नपणा?

पण नामदारांच्या या विस्मृतीला ‘वनविभागाच्या’ एका रणरागिणीने भर सभेत सुरुंग लावला. मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच, संविधानावर निष्ठा ठेवणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याने निधड्या छातीने उभे राहून मंत्र्यांना थेट जाब विचारला— “बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही?” मंत्र्यांच्या तोंडाला फेस यावा असा हा सवाल होता!

मंत्र्यांची दातखिळी अन् सत्तेची मस्ती!

गिरीशभाऊंचे भाषण म्हणजे एरवी शब्दांचा बुडबुडा असतो, पण काल एका साध्या महिला कर्मचाऱ्याच्या एका प्रश्नाने या बुडबुड्याची हवाच काढून टाकली. मंत्र्यांची दातखिळी बसली, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चेहरे पांढरे पडले आणि उपस्थित जनता या ‘संविधानप्रेमी’ माऊलीच्या धाडसाचे कौतुक करू लागली. ज्या देशात मंत्र्यांना त्यांच्या कर्तव्याची आणि इतिहासाची आठवण एका महिला कर्मचाऱ्याला करून द्यावी लागते, तिथे लोकशाहीची विटंबना सुरू आहे असेच म्हणावे लागेल.

आता तरी डोळे उघडणार का..?

आज या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखा पेटला आहे. संपूर्ण महाराष्ट्र संतापाने लाल झाला आहे. “नेत्यांनो, खुर्च्या उबवताना ज्यांच्यामुळे तिथे बसलात, त्यांना विसरण्याची चूक करू नका,” असा स्पष्ट इशाराच जणू या महिलेने दिला आहे. नाशिकच्या त्या वनदुर्गेने केवळ एका मंत्र्याला टोकले नाही, तर सत्तेच्या गुर्मीत असलेल्या प्रत्येक नेत्याच्या कानशिलात हा सणसणीत चपराक लगावला आहे!

“अहो, स्वतःला ‘महाजन’ म्हणवता आणि महापुरुषांचाच विसर पडतो? गिरीशभाऊ, हे राजकारण नव्हे, ही तर वैचारिक दिवाळखोरी आहे! तुमच्या या विस्मरणाचा हिशोब जनता नक्कीच चुकता करेल.”

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!