आमदार सुनील शेळके यांचा देहूरोडमध्ये दणका! ‘जनता दरबारात’ गार्हाण्यांची जंत्री; अधिकाऱ्यांना जागेवरच फर्मान


आमदार सुनील शेळके यांचा देहूरोडमध्ये दणका! ‘जनता दरबारात’ गार्हाण्यांची जंत्री; अधिकाऱ्यांना जागेवरच फर्मान

चंद्रशेखर पात्रे :

देहूरोड : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या देहूरोड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालयात आयोजित ‘जनता दरबाराला’ नागरिकांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजल्यापासूनच शहरातील विविध भागांतून नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी कार्यालयात गर्दी केली होती.

या जनता दरबारात सर्वसामान्यांच्या तक्रारी ऐकून घेत आमदारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जागेवरच आदेश दिले. तसेच या दरबाराला शहर पोलीस अधिकाऱ्यांची देखील हजेरी लागली होती. कार्यालयात आगमन झाल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी सर्वप्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अॅड. प्रवीण झेंडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनीही अभिवादन केले. त्यानंतर आमदारांनी दालनात बसून प्रत्येक नागरिकाची समस्या सविस्तर जाणून घेतली.

यावेळी ‘जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चे संचालक डॉ. महेश कुदळे यांनी रुग्णालयाच्या पाठीमागील गंभीर ड्रेनेज समस्येकडे आमदारांचे लक्ष वेधले. रुग्णालयाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाला लाखो रुपयांचा कर दिला जात असतानाही ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे तिथे घाण पाणी तुंबून दुर्गंधी पसरली असून गंभीर रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर आमदार शेळके यांनी, लवकरच आमदार निधीतून उपाययोजना करून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच ‘मानव आधार सामाजिक संघा’चे राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेठकर यांनी गांधीनगर परिसरातील विदारक चित्र आमदारांसमोर मांडले. मुख्य गटार, पाण्याच्या टाकीपासून ते डोंगर पायथ्यापर्यंतची गटार पाईपलाईन पूर्णपणे खराब झाली आहे. निधी नसल्याचे कारण देत कॅन्टोन्मेंट बोर्डाने दोन वर्षांपासून काम बंद पाडले आहे. मैला शुद्धीकरण प्रकल्प नसल्याने टेलिफोन एक्सचेंजच्या मागे घाण साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर आमदार शेळके यांनी संबंधित पीए आणि अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देत, या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणू, तुम्ही काम तातडीने सुरू करा, अशी सूचना केली.

दरम्यान, ‘बेटी बचाव बेटी पढाओ’चे प्रणेते व ‘नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांनी देहूरोड पोलिसांविरोधात तक्रार मांडली. एका नेत्याविरोधात तक्रार देऊनही पोलीस दखल घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमदार शेळके यांनी देहूरोड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तात्काळ जनता दरबारात बोलावून घेतले. पोलिसांनी या प्रकरणात क्लीन चिट दिल्याचे सांगताच, आमदारांनी पोलिसांना धारेवर धरत, “काहीही असो, त्यांनी दिलेल्या तक्रारीची नोंद तुम्ही का घेतली नाही? तक्रार दाखल करून घ्या,” असे खडे बोल सुनावले. आमदारांच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी लवकरच तक्रार दाखल करून घेण्याचे आश्वासन दिले. आमदारांनी अगरवाल यांना निश्चिंत राहण्याचा आणि न्याय नक्की मिळवून देण्याचा विश्वास दिला. आमदार सुनील शेळके यांनी स्वतः उपस्थित राहून सर्वसामान्यांचे प्रश्न थेट ऐकल्याने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना जागेवरच आदेश देऊन तात्काळ तोडगा काढल्याने उपस्थित नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या जनता दरबारात शहरातील अनेक नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि पक्षकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!