विद्येच्या माहेरघरात नीटचा ‘बाजार’; ब्युटी पार्लरवाल्या ताई आणि इंजिनिअरिंगचा पठ्ठ्या सीबीआयच्या जाळ्यात!


विद्येच्या माहेरघरात नीटचा ‘बाजार’; ब्युटी पार्लरवाल्या ताई आणि इंजिनिअरिंगचा पठ्ठ्या सीबीआयच्या जाळ्यात !

पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून मिरवणाऱ्या  पुण्यात सध्या सरस्वतीच्या चरणी फुले वाहण्याऐवजी, लक्ष्मीच्या पावलांनी नीटचा ‘बाजार’ मांडला गेल्याचं उघड झालं आहे. ज्या शहराने देशाला थोर विचारवंत आणि निष्णात डॉक्टर दिले, त्याच शहरात आता पेपरफुटीचे ‘दलाल’ गल्लोगल्ली फुटले आहेत की काय, असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. नीट पेपरफुटीची ही विषवल्ली आता थेट पुण्यातील बिबवेवाडी आणि वाघोलीपर्यंत पसरली असून, सीबीआयने या प्रकरणाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे.

बिबवेवाडीतील मनीषा वाघमारे नावाच्या एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि साऱ्यांचेच डोळे पांढरे झाले. या ताईंच्या पार्लरमध्ये चेहऱ्याचा मेकअप व्हायचा की विद्यार्थ्यांच्या नशिबाचा, हे आता तपासात स्पष्ट होईलच. पण गजब म्हणजे, नीटच्या परीक्षेच्या काळातच यांच्या बँक खात्यात १० लाख रुपयांची ‘लाली’ चढली! नवऱ्याचा व्यवसाय दात कोरण्याचा आणि पत्नीचा पराक्रम विद्यार्थ्यांचे खिसे कोरण्याचा, असा हा विचित्र कौटुंबिक योग पुण्यात पाहायला मिळतोय. गेल्या तीन वर्षांपासून या माऊलींचे धागेदोरे मुख्य संशयित धनंजय लोखंडेशी जोडलेले होते, हे पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

या नाटकातला दुसरा अंक म्हणजे शेषराव सोळंकी हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. तरुण वयात देश घडवण्याचे आकडेमोड करायचे सोडून हा पठ्ठ्या नीटसाठी ‘बकरी’ म्हणजेच विद्यार्थी शोधण्याचं मार्केटिंग करत होता. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भोळ्या पालकांना जाळ्यात ओढायचं आणि लोखंडेच्या चरणी अर्पण करायचं, ही या तरुणाची ड्युटी! वाघोलीत लपून बसलेला लोखंडे पोलिसांची चाहूल लागताच पळाला खरा, पण राहुरीत सीबीआयने त्याच्या मुसक्या आवळल्याच.

मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी ‘शॉर्टकट’ शोधणाऱ्या पालकांनो, आता तरी डोळे उघडून बघा! या दलालांच्या ब्युटी पार्लरमध्ये तुमच्या कष्टाच्या पैशाचा ‘फेशिअल’ केला जातोय. सीबीआयने आता मोबाईलचे रेकॉर्ड्स आणि डिलीट केलेले मेसेजेस उकरून काढायला सुरुवात केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेला हा इशारा म्हणजे केवळ चौकशी नाही, तर विद्येचा बाजार मांडणाऱ्यांच्या थोबाडीत लगावलेली एक सणसणीत चपराक आहे. शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्यात जर असे ‘कंस’ जन्माला येत असतील, तर उद्याच्या पिढीचं रक्षण कुणी करायचं? हा केवळ पेपर फुटीचा घोटाळा नसून, गुणवत्तेचा केलेला निर्घृण खून आहे!


कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

42
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!