वळसे-पाटलांचा प्रस्ताव, भुजबळांचे अनुमोदन ; सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ !
अजितदादांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे पाऊल ; महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री..!

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘झंझावात’ अशी ओळख असलेले अजितदादा पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला होता. पण हा महाराष्ट्र थकत नाही आणि पवारांचा वारसा झुकत नाही, हेच आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाने आज एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत सुनेत्रा वहिनी पवार यांची गटनेतेपदी निवड केली आणि त्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
विधिमंडळात एकमताचा जयघोष..!
आज सकाळी विधानभवनाच्या समिती कक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तातडीची बैठक पार पडली. अजितदादांच्या निधनानंतर आता नेतृत्व कोणाकडे? हा प्रश्न साऱ्या राज्याला पडला होता. मात्र, अत्यंत शांत आणि संयमी नेते दिलीप वळसे-पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. वळसे-पाटलांच्या या प्रस्तावाला राजकारणातील ‘तोफ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छगन भुजबळ यांनी खणखणीत आवाजात अनुमोदन दिले. पक्षातील सर्वच आमदारांनी बाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले आणि सुनेत्राताईंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले.
राजभवनावर मंगल सोहळा..!
दुपारी राजभवनाच्या प्रांगणात हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल महोदयांनी सुनेत्राताईंना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. जेव्हा सुनेत्राताईंनी “मी, सुनेत्रा अजित पवार…” असे शब्द उच्चारले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांतून अजितदादांच्या आठवणीने पाणी तरारले, पण त्याचवेळी एका खंबीर नेतृत्वाच्या उदयाने चेहऱ्यावर समाधानही दिसले.
टिपणी :
“लोकहो, राजकारण हे भावनांवर चालत नसते, ते कर्तव्यावर चालते! अजितदादांचे जाणे हा राज्याच्या छातीवर बसलेला घाव आहे, पण त्यांच्या पत्नीने – सुनेत्राताईंनी – ज्या धैर्याने आज ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली, त्याला दाद द्यायलाच हवी. ही केवळ एका पदाची शपथ नाही, तर दादांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची ती एक प्रतिज्ञा आहे. वळसे-पाटील आणि भुजबळांनी दाखवलेली ही एकी म्हणजे विरोधकांसाठी एक धोक्याची घंटाच म्हणावी लागेल!”




























