पुणे-बेंगळुरू हायवेचे ‘सहापदरीकरण’ की यमराजाचे ‘निमंत्रण’?


स्पीड कॅमेरे चोख चाललेत, पण रस्त्यावरील डबक्यांचे काय? दुचाकीस्वारांना हायवेवरच ‘गंगास्नान’!

ईश्वरपूर \ प्रतिनिधी:

आपल्या देशात रस्ते कसे असावेत, याचे शास्त्र अजून कुणाला अवगत झालेले दिसत नाही. **Press Media Live** ने घेतलेल्या आढाव्यानुसार, पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे ‘सहापदरीकरण’ सध्या अंतिम टप्प्यात आले आहे, असे सरकार मोठ्या दिमाखाने सांगते. ठिकठिकाणी देखणे दिशादर्शक फलक लागले आहेत, सुंदर स्पीड कॅमेरे बसवले आहेत. कॅमेऱ्यांचे काम चोख सुरू आहे—तुम्ही वेगाने गेलात की पावती फाडणार! पण कॅमेरा बसवणाऱ्या साहेबांना रस्त्यावरील खड्डे आणि पाण्याचे डबके टिपणारा कॅमेरा बसवण्याचे मात्र भान राहिलेले दिसत नाही!

कासेगाव ते नेर्ले दरम्यान, विशेषतः त्या सीएनजी गॅस पंपासमोर, सध्या महामार्ग नसून जणू ‘जलतरण तलाव’ सुरू झाला आहे. डांबरी रस्ता इतका गुळगुळीत केलाय की त्यावर पाण्याचा उत्तम साठा होतो. तिथून जेव्हा एखादी आलिशान कार किंवा अवजड ट्रक ‘सूंऽऽ सूंऽऽ’ करत शंभरच्या स्पीडने धावतो, तेव्हा बाजूने जाणाऱ्या बिचाऱ्या दुचाकीस्वाराची अवस्था ‘गंगास्नान’ केल्यासारखी होते. रात्रीच्या वेळी तर पाठीमागून येणाऱ्या वाहनाने उडवलेले पाणी चेहऱ्यावर आले की दुचाकीस्वाराला दोन सेकंद ‘ब्रह्मज्ञान’ प्राप्त होते—म्हणजे डोळ्यांसमोर नुसता अंधार! या अंधारात रस्ता शोधायचा की यमराज, असा प्रश्न पडतो.

चिखल, खडी आणि अपूर्णतेचा ‘महा’सोहळा !

रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांमधून डांबर आणि खडीचे ‘ठिपके’ पडत आहेत, तर हायवेच्या कडेला असलेल्या हॉटेल्समधून बाहेर पडणाऱ्या गाड्या आपल्यासोबत शुद्ध अस्सल चिखल आणून हायवेवर माखत आहेत. हे कमी म्हणून की काय, सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) अजूनही अपूर्णच आहेत. त्यामुळे बिचारे स्थानिक शेतकरी, पादचारी आणि दुचाकीस्वार थेट मुख्य हायवेवरच आपले नशीब आजमावायला उतरतात.

आमचा प्रशासनाला साष्टांग नमस्कार !

दिशादर्शक फलक लावून ‘पुणे इतके किलोमीटर’ सांगण्यापेक्षा, ‘मृत्यू किती किलोमीटरवर आहे’ याचा फलक लावल्यास वाहनचालक अधिक सावध राहतील. संबंधित खात्याच्या पांढरपेशा अधिकाऱ्यांनी एसी गाडीतून खाली उतरून, एकदा पावसाळ्यात या रस्त्यावरून दुचाकी चालवून पाहावी, म्हणजे त्यांना जनतेच्या ‘ओल्या’ दुःखाची जाणीव होईल.

वेळेत पाण्याचा निचरा केला, सेवा रस्ते पूर्ण केले, तर अपघात टळतील. अन्यथा, हे सहापदरीकरण वाहनचालकांच्या फायद्याचे ठरण्याऐवजी, यमराजाच्या दरबाराचा हायवे ठरायला वेळ लागणार नाही. आता तरी प्रशासनाला जाग येईल का, की नेहमीप्रमाणे ‘अपघात झाल्यावर पाहू’ हीच भूमिका घेतली जाईल?

 

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!